नकळत दिस मावळे (बैठकीची लावणी)

नकळत दिस मावळे । सांजही ढळे । टळेना रात ॥
सपनांत छळे साजण । फुले चांदणं । का अंधारात ॥ धृ.॥

हुरहुर जीव हा करी । शहारा उरी । गुलाबी गार ॥
सारखी बदलते कुशी । साहू मी कशी । विरह अंगार ॥
मलमली कसे काहूर । असे आतूर । झुले उरात ॥
नकळत दिस मावळे । सांजही ढळे । टळेना रात ॥ १ ॥

पापण्या मिटते मी जरी । दिसे का तरी । साजण छबी ॥
मग एक अनोखा गंध । करी बेधुंद । कुंद हा नभी ॥
अशी याद तयाची होई । जणु की जुई । फुले दारात ॥
नकळत दिस मावळे । सांजही ढळे । टळेना रात ॥ २ ॥

रात ही चढे जसजशी । वाढते तशी । अनोखी ओढ ॥
मखमली हळू वेढते । जणू ओढते । मिठीत गोड ॥
खिडकीशी कुणाचा भास । मंतरी श्वास । खुळ्या उरात॥
नकळत दिस मावळे । सांजही ढळे । टळेना रात ॥ ३ ॥

असे सहा लोटले मास । सोसते त्रास । कसा मी बाई ॥
छळती हे खुळे आभास । सांगू कोणास । कळेना काही ॥
मज ठेऊनिया एकटे । राहिला कुठे । कुण्या देशात ॥
नकळत दिस मावळे । सांजही ढळे । टळेना रात ॥ ४ ॥