जरा हौस माझी (लावणी)

जरा हौस माझी येवढीशी पुरवा ।
राया मला होंडावर पुणं सारं फिरवा ॥ धृ.॥

घरामधीच वरिस गेलं सारं,
न्हाई वलांडलं म्होरलं बी दारं ।
राया टीवी बी पाहू सांगा किती?
दावा तळ्यातला गणपती ।
तिथं खोपच्यात पानीपुरी भरवा हो..
राया मला होंडावर पुणं सारं फिरवा ॥ १ ॥

शिंव्हगडावर पिठलं अन भजी,
चाखू डेक्कनला जरा पावभाजी ।
मग शनवारवाड्याला जाऊ,
मी मस्तानी तुमी माझे राऊ ।
तुळशीबागेत शॉपींगबी करवा हो..
राया मला होंडावर पुणं सारं फिरवा ॥ २ ॥

तुमी म्हनाल ती नेसीन साडी,
तुम्हा चिटकून बसीन जरा थोडी ।
दोघं खाऊ जरा पर्वतीची हवा,
पाहू शिनिमाबी थेटरात नवा ।
ह्या विक्येंडचा प्ल्यान हाच ठरवा हो…
राया मला होंडावर पुणं सारं फिरवा ॥ ३ ॥