प्रार्थना

तो
भ्रष्ट बुद्धीनं
कोत्या विचारानं
अमानुष वृत्तीनं
काळ्या आनंदाच्या
भोगासाठी हपापलेला...

तो
गरजू तारुण्याचा
निष्पाप जीवांचा
ईश्वरी ऐश्वर्याचा
नाहक बळी देऊन
भळभळणाऱ्या जखमांची आग
धगधगत ठेवू इच्छिणारा

तो
अवघ्या जगताला
थरथरत्या भयाचं
आवरण घालू इच्छिणारा
नृसिंहाचा आव आणणारा
नृशंसतेचा पुतळा

तो
स्वतःच्या अंतर्मनाला
धडधडणाऱ्या भयाचं
आवरण घालून
जगापासून दूर
कुठेतरी खबदाडात
तोंड लपविणारा

हे जगत्पालका
त्याला
मला
आम्हा साऱ्यांना
पुन्हा एकदा
मानव कर
निर्मळ चांदणसुखात
नांदू देत!!!