उठले भल्या पहाटे अभ्यास करावयाचा म्हणून
कशी खोडसाळ ही उषा, टाकते बेत माझा हाणून
नेसली धुक्याची साडी, लावली चंद्राची टिकली
हाय! तीच ठरली घातक, चित्त घेऊन पळाली
कसा करू ग आता अभ्यास, बघ झाले जर नापास
दोष तुलाच तो देईन, नको ना अशी गोड दिसूस
उरले सुरले भानही पुरेच हरायला आले
आत्ताच का सुरू करावे गान कोयलेने आपले
डाव आहे काय तुमचा, कळू द्या निर्दयांनो
परीक्षा आली माझी जवळ जरा उमजू द्या गड्यांनो
सरा लक्षातून माझ्या, कृपा करुनिया थोडी
एकदा होऊ द्या परीक्षा, मग तुमचीच ही वेडी!