"ना आसवे उरली"
काय रडावे रडणाऱ्याने, आसवे आता संपली।
मरण बघता स्फोटामधले, गात्रे सारी थिजली॥ध्रु॥
विखुरली सारी प्रेते, रक्ताचे थारोळ्यात।
कुणाचे तुटले पाय, कुणाचे तुटले हात॥
मदतीला धावे जनता, सरकार बसे निवांत।;
हा आक्रोश पाहण्याला, ना नाते कुठली उरली॥ध्रु॥१॥
खोटया मदतीच्या घोषणेचे, पेव आता फुटले।
अजून ना मिळाली मदत, जे मागे पांगळे झाले॥
जगती पाहा बिचारे,आशेचे पांघरून शेले।;
लाल फितीत मदत ही, पाहा आडकून गेली॥ध्रु॥२॥
शव मागण्या शवागारात, नातेवाईक जेव्हा जाती।
त्यांचेकडून भ्रष्ट यंत्रणा, पैशाची मागणी करती॥
जणू प्रेताच्या टाळूवरचे, लोणीच सारे खाती।;
ह्या म्हणी नुसार आज, ही व्यवस्था सारी झाली॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
१८।७।२०११.