कठोपनिषद।मराठी साकीबद्ध रुपांतर द्वितियवल्ली

माझ्या आजोबांनी लिहिलेले हे  कठोपनिषदाचे रूपांतराचे १९५०साली प्रकाशित झालेले पुस्तकावरून हे उतरत आहे व त्यासाठी मी आजोबांनी ज्या नावाने लिहिले होते तेच नाव महाराष्ट्रीय घेऊन लिहिले आहे

दृढनिश्चय हा नचिकेत्याचा पाहुनी यमराजाला   /

तोष वाटला. उपदेशाया मग तो प्रवृत्त झाला //१//

'अक्षय असे सुख मोक्षाचे त्यातें श्रेय म्हणावे /

अशाश्वतातें प्रेय बोलती दोन जाण ही नांवे //२//

श्रेय निराळे प्रेय निराळे असती निराळी परी दोनी  /

 साकल्ये तुज कळावयाला कथितों स्पष्ट वदोनी //३//

तत्प्राप्तीचीं तेवी साधने असती निराळी परी ती /

दोनी युनी मनुजापाशीं विनंती तयातें करिती //४//

 स्वीकारी जो श्रेय  त्यात जो जोडी  कल्याणासी /

प्रेयातें घे उचलुनी तो नीज पुरुषार्थातें नाशी //५//

दोनी येउनी मनुजापाशीं म्हणती स्वीकार करी /

तुला हवे सुख तरी घे त्याची सत्ता माझ्याच करी //६//

विवेक त्यांचा न कळे वदतां येउनी यापरी जवळी /

ऐहिक योगक्षेमा भुलुनी प्रेया मंदची कवळी //७//

इहलोकीचे स्वर्गींचें वा सुख ते अनित्य कळुनी /

धीर पुरुष तो घे श्रेयातें पाहे प्रेय न वळुनी /८//

प्रियकर मोहक कामही बघुनी कळले तुज नीज हित रे!   /

धैर्ये केला त्याग तयांचा, झालासी नमोहित रे //९//

प्रेयाचा त्या मार्ग हिरण्मय भुलुनी सारे जगती /

आश्रय त्याचाकरोनी जाती न कुणी अंती जगती //१०//

प्रेयाचा करी बोध अविद्या; विद्या ति श्रेयाचा /

दूर दूर त्या असती अगदी मार्गही भिन्न तयांचा //११//

विविध काम हे बघुनी राहिले निजहित भान /

खरी खरी रे दिसे लागली तुज विद्येची तान //१२//

किती  मौज तुज सांगू बाळा! जन सारे या लोकी /

अविद्यातमीं  रांगत फिरती त्यांची स्थिती अवलोकी //१३//

खरे ज्ञान मज म्हणती लाभले अज्ञानी  मी नाही /

 वाटे त्यातें स्वतां मागुनी यावे इतर जनांहीं //१४//

अंध निघावा पंथी अंधांची काठी धरोन हाती /

एका मागुनी एक मूढ  हे तैसे भ्रमत राहती //१५//

परलोक तसे तत्प्राप्तीचें दुसरे साधन काही /

न कळे मुढां मोहित झाले स्त्रीसुतधनादिकांहीं //१६//

इहलोक  तयां केवळ ठावा परलोका न पाहती /

पुनः पुन्हा ते जन्मा येउनी येती माझे हाती //१७//

जन्म मृत्यूची सर्वां मागे यापरी परंपरा ही /

त्या आत्म्याचे ज्ञान होय तो अखंड चालू राही //१८//

ज्ञानाचा तो दुर्लभ  बाळा! वक्ता श्रोताही तसा /

कुशल गुरुचे पासुनी ज्यातें बोध लाभला हितसा //१९//

श्रुतिगोचर हि यास्तव नोहे बहुतां, कोणा परी ते /

श्रवणाचाही लाभ होउनी बोध न हृदयी करितें //२०//

 स्वरूप त्याचे विविध सांगती स्वमतानुसार सारे /

सामान्य जनें, म्हणुनी, सांगता व्हावा बोध कसा रे? //२१//

अणूहूनही सूक्ष्म असे तो त्यातें प्रमाण नाही /

अद्वय भावही कथितां न कळे स्वरूप अनुमानां ही //२२//

न चले तेथे गती तर्काची लाभे ज्ञान न तेणें /

ज्ञानासाठी आचार्यांचा लागे आश्रय घेणे //२३//

तू तो बाळा! सत्यधृती खरा वाटे त्वन्मती बघुनी /

उदंड जन मज बोलायला तुजसम लाभोत गुणी //२४//

कर्मफले ती अनित्य आता कळते तत्त्व मला हो /

द्रव्ये अनित्य वेंचुनी नोहे नित्यवस्तुचा लाहो //२५//

त्या द्रव्यांहीं अग्नी उपासुनी आलो राजपदाला/

नित्यपदाचा लाभ परी तो ज्ञानेंची मला झाला //२६//

त्याच पदाचा आश्रय करुनी साऱ्या सृष्टी राहती /

सर्वकाम ते समाप्त होती येतां ते पद हाती //२७//

काम न उरतां, नोहे त्यातें कधी खिन्नता ठावी /

बळी त्रिभुवनी न दिसे कोणी जो त्या बळे दटावी //२८//

वर्णू जातां महत्त्व त्याचे माझी वाचा थकली /

वाग्देवताही साकल्ये जे वर्णन करू शकली //२९//

असे तयाची सत्ता बाळा! त्रिभुवनी साऱ्या भरली /

जावे तिकडे तेच आढळे गतीची सीमा सरली //३०//

अनुष्टितां क्रतुफलें अनंतची होती प्राप्त तयाला /

चिरकालें परी भोगुनी लागे पुनरपी परतायला //३१//

पद ते शाश्वत परितें लाभे ज्ञानिजनांला मात्र /

सुकृतें क्रत्वादिक नच करिती तेथ कुणाला पात्र //३२//

विवेक करुनी यापरी त्यजिले तुवां रोगसे भोग /

धन्य! धन्य! तू मीही धन्य!  की तुजशीं माझा योग //३३//

देव पुरातन गुरू असे तो साधारण यत्नांहीं /

क्लेश साहिल्याविणें तयाचें दर्शन होणे नाही //३४//

आत्मज्ञाने प्रज्ञा होता स्थिर तो तयास पाहे /

हर्ष शोक मग संसारींचा नच तो कदापि वाहे //३५//

आत्मज्ञान श्रवण करोनी ते नीज हृदयामाजीं /

नित्य चिंतितां ठसोनिजाई  सत्य वैखरी माझी //३६//

धर्मपरायण जीवात्मा तो त्यजितां नीज देहातें /

आनंदाने परमात्म्याला कवळी अपुलें हातें //३७//

मिळोनी जाई त्यातें जो की  आनंदाचाच घडा /

तुज पुढतीही दिसतो बाळा! तोच जाहला उघडा ' //३८// 

ऐकोनी या परी हांसुनी बोले मग तो बाळ यमातें /

'प्रसन्न झालां मजवरती तरी द्यावा हा वर मातें //३९//

कृताकृताहुनी धर्माधर्माहुनी वाजे की अन्य /

काले बाधित न जे तत्त्व ते कथुनी करा मज धन्य ' //४०//

निश्चय पाहुनी नचिकेत्याचा यम आनंदे डोले /

पूर्णं कराया इच्छा त्याची संबोधुनियां बोले //४१//

'श्रुती त्या साऱ्या तन्मय होउनी ज्याचे एकमताने /

कृपा जयाची संपादाया गात राहती गाणे //४२//

यत्पाप्तिस्तव मुनिवर मोठे विपिनीं तपत राहती /

ब्रह्मचर्य ते अखंड सेवुनी ज्याची वाट पाहती //४३//

देव कुठे तो तुला सांगतो त्याची उपासनाही /

प्रतिकाविणें तत्प्राप्तीचा सुगम मार्ग तो नाही //४४//

ब्रह्म म्हणती ज्या अनुशासितसे तेच सर्व हि सृष्टी /

उपासना करी ओंकारी तू ठेउनी अपुली दृष्टी //४५//

अक्षर म्हणती ब्रह्म कुणी हे ब्रह्म वा कुणी पर ते /

तया जाणतां उपासकाचे भावनेसी अनुसरते //४६//

ब्रम्हप्राप्तिस आलंबन हे श्रेष्ठ असे बुध म्हणती /

तयां जाणतां ब्रह्मलोकी जन त्यातें करिती प्रणती //४७//

पाहो जातां, आत्म्याला या नाही मृत्यू जरा वा /

कोणापासुनी किमर्थ तेणें अपुलाजन्म धरावा? //४८//

पूर्वी होता चिरकाल पुढे तैसा असावयाचा /

जाती येती देह किती तरी नाश न होय तयाचा //४९//

देह हाच तो आत्मा समजुनी करिती तयाचा घात /

आत्मा मेला म्हणती होता देहाचा त्या पात //५०//

बोलती या परी अज्ञानाने न कळे तत्त्व कुणाही/

न करी कोणी वध आत्म्याचा त्यातें नाशची नाही //५१//

पदार्थ सारा तयें व्यापिला नाही तो ठाव रिता /

सान थोर हा विवेक बाळा! त्यातें नाही वारितां //५२/

मोठा मोठा पदार्थ तेणें दिसे त्यापुढे पोर /

अणुरेणुंतुनी भरला म्हणुनी आणूही त्याहुनी थोर //५३//

जीवजंतू हे, त्यांचे हृदयी निवास करुनी राहे /

न परी कोणी त्यातें अपुल्या चर्मचचक्षुनी पाहे //५४//

काम जयाचा लया जाउनी प्रसन्न झाली करणे /

तेणेंच जगी आत्मदर्शनी आशा अंतरी करणे //५५//

हर्ष शोक ते न कधी येती स्पर्शी करावयास ।

आत्म्याचा जो महिमा त्याचा अनुभव येत तयास //५६//

बसल्या जागी बसोन तेणें दूरही निघोनी जावे/

स्वयें फिरावे सर्वत्र तसे इकडे स्वस्थ निजावे //५७//

हर्षित भासे, हर्ष रहितही, लागे शोध न सारा /

आश्चर्य पाहा! तयें व्यापिला अंगे सर्व पसारा //५८//

आत्म्याचे ते माझ्यावांचुनी स्वरूप कोणा ठावे?

अधिकाराविण कळले तरी ते हृदया केंवी पटावे? //५९//

दृश्य पसारा अस्थिर सारा त्यांत राहतो स्थिर तो /

येती जाती किती शरीरे तयासवें नच फिरतो //६०//

आत्मा व्यापुनी सर्वही राहे स्थिर चर कसे असो की /

आत्म्याचे हे स्वरूप जाणुनी पंडित न पडे शोकीं //६१//

तज्ज्ञानाचा लाभ कुणाला नोहे व्याख्यानांहीं /

बुद्धिमंत जन बुद्धी तयांची येथे कामा नाही //६२//

पढे श्रुती स्मृती आध्यात्मिक वा ग्रंथभार सारा ही /

वृथा वृथा श्रम ज्ञानामृत ते सारे दूरची राही //६३//

आत्मदर्शनीं आर्त जाहला साधक नर जो लोकी /

होतो आत्मा प्रसन्न त्यावरी तोच तया अवलोकी //६४//

आचरणी वा मनी न जोंवरी सुटली दुरिताचरणें /

आत्मदर्शनीं आशा न कुणी अंतरी तोंवरी करणे //६५//

 आत्मदर्शनीं यत्न करी परी इंद्रियगण तो रमला /

चंचल भावे विषयी तरी तो व्यर्थची वाटे श्रमला //६६/

सिद्धीसाठी  स्वमनाची जो एकतानता नाही/

न आत्मदर्शन घडे तोंवरी केवळ अध्ययनांहीं //६७//       

एकाग्रमनें चिंतन करी परी अंतरी अभिलाष धरी /

संपादुनियां ज्ञानही न पडे अनुभव त्याचे पदरी //६८//

संक्षेपें तुज कथितों आधी प्रभाव त्या देवाचा /

साकल्ये तो वर्णायाला निर्बल माझी वाचा //६९//

ब्राम्हण जे की तपःप्रभावें रक्षिती सर्व जनांसी /

क्षात्रगण तसा स्वबलें जो की जनतेचे भय नाशी //७०//

बलिष्ठ यापरी त्या उभयांतें गिळितो अन्नापरी तो /

सकळांचाही काळ त्या सवे तोंडीलावणे करितो //७१//

सर्व वेळ हा खेळ तयाचा अद्भुत की त्यास कला /

कोठे केस देव असे तो न कुणी जाणो शकला //७२//