कनकादित्य म्हणजे सूर्य. हा कनकादित्य गोळवलकरांसह अनेकांचे कुलदैवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी या गावी या कनकादित्याचे मंदिर आहे. अनेक पिढ्या मध्यप्रदेशात राहिल्यानंतर जेव्हा आपली पाळंमुळं शोधण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा कशेळीलाही गेले. सूर्यनारायणाची गंडकी शिळेतील मूर्ती माझ्या मनात कोरली गेली. तिथून परतल्यानंतर एका पहाटे साखरझोपेत जे काही सुचले त्याला वरील कोणत्याही काव्य प्रकारात टाकता येणार नाही म्हणूनच त्याची वर्णी प्रतिभा या प्रकारात लावली आहे.
~कनकादित्याची आरती~
(चाल - आरती कुंजबिहारी की)
आरती कनकादित्याची की जय जय कश्यप तनयाची ॥धृ॥
कोकण क्षेत्री सागर तिरी, रत्नागिरी रम्य नगरी
कशेळी ग्रामी एक गणिका, सुंदरी नाम असे कनका
सात्त्विक शुद्धमती बरवी, जळी स्थळी केवळ पाहे रवी
सूर्य मनी वसे, स्वप्नी जी दिसे, शंका मुळी नसे,
गवसली मूर्ती अश्माची, जय जय तेजोभास्कराची ।।१।।
तमोरी स्वयंप्रभ साचा, प्रतिदिन हिरण्यगर्भाचा
आत्मा - बुद्धी- ज्ञान - वाचा, शुद्धता लेष असे त्याचा
तेजमय अंगकांती सारी, प्रखर ती लाली मनोहारी
अतुलनीय गती, अरुण सारथी, सप्त हय (घोडे) रथी,
शोभते उषा सोबतीची, जय जय तेजोभास्कराची ।। २॥
प्रकाशित नभमंडळ झ्ळके, कंठी ग्रहमाला विलसे
ऋतूंचे सहा विविध परिवेष, दिनमणी तुझेच रूप विशेष
पृथ्वीवरी जे जे जीवन फुले, सुधाकर आलोकित तुजमुळे
प्रफुल्लित नलिनी, अंजली भरुनी, सुहासित वदनी
रमली रमा चरणासी, जय जय तेजोभास्कराची ॥३॥
ही केवळ भक्ती नसून सूर्य आणि पूर्वजांप्रती असलेली कृतज्ञता आहे.