नशीब भाग - ७६

२००७ साला पर्यंत आधुनिक शाळेचे कार्य व त्याचे परिणाम बाहेरून जाणवत होते पण एका परदेशी पद्धतीच्या शाळेत मला काम करण्याची संधी मिळाली, शिक्षणाच्या घोळाचे व तिथे चालणार्‍या लुटालुटीचे अनुभव फार जवळून अनुभवले. हे असेच असते, असणार व चालणार हे मान्य असणारे महानुभाव जवळून बघण्याची संधी मिळाली. अहो पेटीतला एखादा अंबा खराब असतो हे मान्य करण्यापेक्षा एक अंबा कदाचित बरा असण्याची शक्यता असावी हेच जास्त योग्य वाटले व पटले.

प्रथम चाचणी मुख्याध्यापकाने घेतली. कॉम्प्युटर ग्राफिक शिक्षकाची जरूर शाळेला होती, मला महिन्याचे घरभाडे सहज देण्याची एक संधी होती. माझा शिक्षण क्षेत्रातील अनुभव इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयाचा १९७२ - ७५ चा होता. कॉम्प्युटर ग्राफिक्स हा मस्कत, ओमानला माझा स्वतंत्र व्यवसाय होता. पण व्यवसाय व शिक्षणाचा सुतराम संबंध नाही असा विश्वास मुख्याध्यापकापासून ते शाळेचा हिशोब सांभाळणारा एक कारकून ह्या सगळ्यांचा होता, ते सगळेच माझ्या बाबतीत साशंक होते.

दुसरी चाचणी शाळेचे मालक, मुख्य अधिकारी व मुख्याध्यापक ह्यांनी घेतली. १०,००० रुपये पगार ठरला, करार पत्रातील नियमावलींचा समज दिला गेला व साशंक मनस्थितीतच कॉम्प्युटर ग्राफिक्स शिक्षक म्हणून माझी निवड करण्यात आली. त्या शाळेतील संगणक विभागात मला एका टेबलाची जागा मिळाली. तिथे एका तरुण शिक्षिकेचे माहिती तंत्रज्ञानाचे (आय.टी.) राज्य असल्या सारखा प्रकार लक्षात आला. मी एक फोटोग्राफर असून मला संगणकाचे ज्ञान कमी आहे म्हणून ग्राफिक्स विषय मला नवीन आहे अशी गोड गैरसमजूत त्या बयेची माझ्या बाबतीत होती. कारण मला विंडोज पि.सी. ऐवजी अ‍ॅपल संगणकाचा सराव जास्त होता व तिने अ‍ॅपल संगणक त्या दिवसापर्यंत ऐकला / बघितलेला नव्हता.

मुख्याध्यापकाने मला कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या अभ्यासक्रमाची सगळी मदत व माहिती तंत्रज्ञान शिक्षिका (आय.टी.) देईल असे आश्वासन दिले होते, त्या शिक्षिकेने ते स्वीकारण्याचे नाटक केले होते. प्रत्यक्षात सहा दिवस शोध केल्या नंतर कळले की त्या बयेने दिलेली सगळी माहिती अर्धवट व चुकीची होती. मी मुख्याध्यापकाला घडलेली परिस्थिती सांगितली, त्यानेच मला सरळ परदेशी संस्थेच्या संकेतस्थळाचा दुवा व पासवर्ड दिला. त्या दिवसापासून मी स्वतंत्रपणे अभ्यासक्रम शोध सुरू केला. त्याच बरोबर विंडोज संगणक पद्धतीचा अभ्यास व इंट्रानेट नेटवर्क पद्धतीचा अभ्यास सुरू केला त्यामुळे त्या शाळेतील संगणक पद्धतीचा गोंधळ समजून घेणे मला सहज जमले.

प्रथम कॉम्प्युटर ग्राफिक्स अभ्यासक्रम हा आर्ट आणि डिझाइन ह्या विभागातील एक भाग, त्याचे दोन उप विभाग आहेत. भाग एक ९-१०वी करता ए.एस. लेव्हल तर ११-१२वी करता ए लेव्हल हा दुसरा भाग. त्या परदेशी संस्थेच्या संकेत स्थळावर असलेल्या माहिती नुसार भाग एक मध्ये काय शिकवावे व भाग दोन मध्ये त्यात कोणता बदल असावा हे फार साध्या शब्दात दिलेले होते. परीक्षेतील प्रश्न काय असतील, त्या प्रश्नातून काय अपेक्षित आहे, त्यांची गूण विभागणी कशी असेल, ह्या सविस्तर माहितीचा मी अभ्यास केला. त्या परदेशी संस्थेने कॉम्प्युटर ग्राफिक्स अभ्यासक्रमाचे संगणक कसे असावे, संबंधीत साधने कोणती असावी, शाळेतील वाचनालयात कोणती पुस्तके असावी त्यांचा उपयोग कसा अपेक्षित आहे त्याची माहिती दिलेली होती. पण - - ह्या शाळेतील एकेक नग मुळात नगास नग असा असल्याने त्यांनी संगणक नगास नग ह्या पद्धतीनेच वापरले होते. परदेशी संस्थेने दिलेल्या माहितीकडे दुर्लक्ष केले होते.

मी शाळेत जेव्हां काम सुरू केले त्या महिन्याचा शेवटी शाळेला दोन महिन्याची सुट्टी सुरू झाली. मला परिस्थिती समजून घेण्याचा चांगला वेळ मिळाला. परदेशी संस्थेच्या माहिती पत्रका नुसार जे काही नव्हते त्याची यादी करून मी मुख्याध्यापकाला मुद्दाम माझ्या घरातून मेल पाठवली होती. दुसर्‍याच दिवशी त्या आय. टी. वाल्या बयेने अशी मेल पाठवून नका म्हणून दम भरण्याचा प्रयत्न केला. ती बया चहाचा चमचा नसून ढवळा ढवळ करणारी मोठी पळी होती हे मला समजले. शाळेतील संगणक दुरुस्तीचे काम पाहणार एक हार्डवेअर इंजिनियर होता त्याने संगणक पद्धतीत केलेले घोळ मी मुख्याध्यापकाच्या निदर्शनास आणून दिले व संगणक कसे असावे ह्याचे काही नमुने करून दाखवले. प्रत्येक विषयातील दर महिन्याच्या चाचणीच्या प्रश्न पत्रिका त्या विषयाच्या शिक्षिका ज्या संगणकांवर तयार करीत होत्या त्या संगणकांवरून विद्यार्थ्यांना त्या प्रश्न पत्रिका चाचणी पूर्वीच त्या इंजिनिअर मार्फत कळत होत्या. निकाल चांगला येत असल्याने सगळेच खूश होते. हे प्रकार माझ्यामुळे उघडकीला आले. त्या कारणांनी तो इंजिनिअर काम सोडून निघून गेला.

                              

त्या दोन महिन्याच्या सुट्टीचा मी खूप फायदा करून घेतला. इंट्रानेट चे कार्य चांगले समजून घेतले व त्यात योग्य ते बदल घडवून आणले. चित्रात दाखवलेल्या वस्तूंचा योग्य उपयोग करून शाळेच्या तीन मजली इमारतीतील ५६ संगणक आपसात सहज संपर्क साधू शकणारी इंट्रानेट पद्धती मी सुरू केली. (त्यात त्या आय.टी. वाल्या बयेने त्रास देण्याचा भरपूर प्रयत्न केला होता.) त्या कामाचा योग्य मोबदला देण्याचे आश्वासन मुख्याध्यापकाने मला दिले होते म्हणून मी ते काम केले होते. सहा महिन्यानंतर २००० रुपये एका पाकिटात घालून देण्यात आले ते मी शाळेच्या मालकाच्या हातात देऊन आलो. मी केलेले हे काम घरगड्याचे असल्या सारखे, त्याही पेक्षा कमी आहे असे तुम्हाला वाटत असल्यास हे काम पूर्ण बिघडवून टाकणे मला सहज शक्य आहे. तेव्हा योग्य मोबदला लवकरात लवकर द्या असे धमकी वजा बोलणे झाल्यावर ६० हजार रकमेतील (१०,००० रुपये महीना पूर्वीच्या त्या इंजिनिअरचा पगार सहा महिने त्याचे काम केल्या बद्दल) फक्त १२००० रुपये मी देऊ शकतो असे म्हणून त्याने रोख रक्कम माझ्या हातात दिली. त्या दिवसापासून कोणतेही काम सही शिक्का असलेला कागद हातात आल्या शिवाय करायचे नाही हे मी ठरवले.

कॉम्प्युटर ग्राफिक्स अभ्यासक्रमाचे तीन तेरा पुढील भागात.