अल्लड अवखळ वारा

मनी असावा सदासर्वदा अल्लड अवखळ वारा
मनात माझ्या मला दिसावा झुलता मोर पिसारा

धडधडते का काळिज ऐकुन चाहुल त्याची
रोमांचित होणे, गुणगुणने बाब असे नित्त्याची
रोज छेडतो ह्रदयीच्या तो क्षणोक्षणी का तारा?
मनात माझ्या मला दिसावा झुलता मोर पिसारा

गोफ गुंफुनी नात्यांचा मी हिंदोळावे
साजन येता दारी त्याला ओवाळावे
मिठीत त्याच्या मिळेल मजला शांत, निवांत निवारा
मनात माझ्या मला दिसावा झुलता मोर पिसारा

तरुण्याचे उफान आले दर्याही सळसळला
मीलनास का आवेगाने जीव असा तळमळला?

घेइन गोते खोल सागरी, हवा कुणास किनारा?
मनात माझ्या मला दिसावा झुलता मोर पिसारा

पंख मनाला लावुन वाटे क्षितिजा पुढती जावे
कोकिळकंठी जरा होवुनी गीत तुझे मी गावे
प्रेम सुरांनी उजळुन जावा आसमंत सारा
मनात माझ्या मला दिसावा झुलता मोर पिसारा

नवी पालवी फुटली बहरुन आली प्रेमकथा
हीच संपदा खरी जीवनी सरली त्रस्त व्यथा
भीक मागण्या झोळी घेवुन कुबेर येई दारा
मनात माझ्या मला दिसावा झुलता मोर पिसारा

निशिकांत देशपांडे  मों नं.   ९८९०७ ९९०२3
E Mail---  nishides1944@yahoo.com