ई-आंदोलन

   अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गांधीमार्गाबाबत जनमानसाचे औत्सुक्य चाळवले गेले आहे. काही प्रमाणात त्याचा प्रभावही जाणवत आहे. अहिंसेच्या मार्गाने पण चिकाटी न सोडता गेल्यास हवे ते मिळते, हे सिध्द झाले आहे. 
   गेले काही वर्षे मी असाच ई-अहिंसेचा मार्ग वापरून काही गोष्टी मिळवल्या. 
   एका कंपनीबरोबचे माझे सहा महिन्याचे कंत्राट संपले. माझ्या जागी नवी व्यक्ती येणार होती. या नव्या व्यक्तीला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.  प्रशिक्षण कालावधी वाढणार होता म्हणून त्या कालावधीचे वेगळे पैसे मिळतील का, अशी विनंती मी करणारच होतो तेवढ्यात माझ्या वरिष्ठाने आपणहून 'पैसे देऊ' असे लेखी कळवले.  मी प्रशिक्षण दिले व आठवड्याभराचा कालावधी संपून नव्या कंपनीत आलो. तेथून ई-मेलद्वारा  जुन्या बॉसला पैशांबाबत विचारणा केली. या जुन्या वरिष्ठानेच पैसे देण्याचे कबूल केले होते. सुरुवातीला प्रतिसादच आला नाही. दुसरी मेल लिहिली. तिलाही प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्या मेलनंतर 'या माणसाकडून त्या माणसाकडे' अशी टोलवाटोलवी सुरु राहिली.  संबंध नसलेली माणसे मध्ये आणून वेगवेगळ्या शंका काढून वेळखाऊपणा सुरु झाला.  'कधी कबूल केले होते', 'कोणी सांगितले होते', 'नंतर पाहू', 'मला अधिकार नाहीत' असे सर्व प्रकारचे शक्य बाण कंपनीच्या बाजूने सोडले गेले. काही दिवस जाऊ दिले. प्रत्यक्षात या प्रक्रियेत कंपनीमधील दोन व पैसे देणारा एक अशी तीनच माणसे सामील होती. पैसे देणारी व्यक्ती कंपनीबाहेरील एजन्सीची होती.कंपनीमधील दोघांशी बराच मेलसंवाद साधून झालेला होता. एक मोठी मेल या तिसऱ्या व्यक्तीला पाठवली. तिकडून एकदम सकारात्मक उत्तर आले- तुमचा पत्ता सांगा. धनादेश पाठवून देऊ. काही दिवसांनी धनादेश घरच्या पत्त्यावर आला. तो मिळाल्याची पोच देण्याचे मी टाळले नाही.  
    एकूण तीसपेक्षा जास्त मेल्स माझ्याकडून लिहिल्या गेल्या आणि अखेर या शांततापूर्ण मेल आंदोलनानंतर मला माझे पैसे मिळाले.
    दुसऱ्या उदाहरणात मेल मागोवाच होता. माझ्या ग्रंथालयातून एकाने एक पुस्तक नेले. काही दिवसांनी  स्मरणपत्र पाठवले.'शोधतो' असे उत्तर आले. काही दिवसांनी अजून एक स्मरणपत्र पाठवले. 'बघतो', असे उत्तर आले. काही दिवसांनी पुस्तक हरवल्याचा जबाब तिकडून आला. त्याला कळवले की, त्या पुस्तकाचे पैसे भरावे लागतील. 'भरतो', असे उत्तर आले. खूप दिवस गेले पण पैसे भरण्याचे नाव त्या घेणाऱ्याकडून काढले गेले नाही. नंतर माझ्याकडून मेलसंवाद सुरु झाला. संबंधिताला मेल पाठविताना त्याच्या वरिष्ठांना, सहकाऱ्यांनाही कार्बन कॉपी मधे ठेवत  गेलो.हा विषय सगळ्यांना कळाला आणि जागृतीही होत गेली. प्रत्येकजण आपापली पुस्तके जपू लागला. इथेही संबंधिताने 'उद्या भरतो', 'हा महिना जाऊ दे' इत्यादी प्रकार सुरु केले पण मी त्याला न बधता संवाद सुरुच ठेवला.
    शेवटी, बारा मेल्सनंतर  एक दिवस ती व्यक्ती हजर झाली व 'खूप दिवस झालेत, आता भरतोच पैसे' म्हणून पैसे दिले.
   या दोन्ही उदारणात अनेकदा त्रस्त झालो, रागावलो पण  भावनांवर नियंत्रण मिळवून चिकाटीने कार्य करीत राहिलो. विनम्रता सोडली नाही. आधीचे संदर्भ शक्य तेथे दिले. माझ्या सततच्या  मागोव्यामुळे सर्व संबधित 'हैराण' झाल्याचे दिसत होते पण  त्यांनीच दिलेला शब्द न पाळल्यामुळे मला माझे काम करणे भागच होते. 
    या एकंदर घटनांवरुन असे वाटते की, एकवेळ आपल्याला यश मिळणारही नाही कदाचित् पण किमान आपण प्रतिपक्षाला जेरीला आणू शकलो तरी चांगले आहे.