चिमुकल्याचे मनोगत

मिठीत नाही बाबा माझ्या
कुशीत घेण्या नाही आई
अगतिकता सांगू कोणा
घरात नाही आजोबा आणि आजी

बाबा जातो कमविण्या पैसे माझ्यासाठी
आईची चालते कसरत टिकविण्या संसाराच्या गाठी
लक्ष नाही कोणाचे भावनांकडे माझ्या
आतातर सांगण्यासाठी सुद्धा घरात
नाहीत दादा किंवा ताई

मस्ती करतो म्हणून बसतो धपाटा
हट्ट करतो म्हणून मारतात फटका
समजवत नाही कोणी वागावे कसे
कोणी प्रेमाने जवळ घेतलेच नाही
तर कळणार तरी कसे

Day  Care झाले आता घर माझे
तिथेच मिळतात मग नवीन भावंडे
सुट्टीला आई बाबा काढतात थोडा वेळ
कळत नाही हा कसला औपचारिकतेचा खेळ

लहानपण जाते विरून समजुतीच्या आड
भावना मात्र डोकावतात दडून गोड चेहऱ्याआड
बाप्पा माझ्या भावना त्यांना कळल्या असत्या
तर किती बरे झाले असते
कधीतरी माझ्या शिक्षणाचा आणि खाऊचा
विचार बाजूला सारून मलाही महत्व मिळाले असते