तू आणि मी

तू आणि मी म्हणजे
स्वप्न आणि सत्य
चंद्र आणि सूर्य जसे
असतात एकमेकांसाठी
पण भेट नाही जन्मोजन्मी

तू म्हणजे न संपणारे अखंड मृगजळ
मी स्वप्नाळलेले सत्य कायम
नाते आपले वाटी आणि समईसारखे
जळत राहणे कायम ठेऊन अंधार स्वतःकडे

हे नाते मात्र तेवत राहते
प्रेमाच्या मंद प्रकाशाआड
भावनांच्या पसाऱ्यात हरवतो तू आणि मी
नियती मात्र डोकावते अमान्य उजेडाआड

गरज मात्र उरेल कायम
प्रेमही राहील तसेच कायम
आयुष्याच्या कोणत्याही वळणावर
मागे वळून पाहा मी हि
असेन तसाच कायम

या नात्याला नाव नाही हक्क नाही
स्वप्न कधी सत्यात उतरणार नाही
तू कधीच बदलणार नाहीस याची
आहे मला खात्री
नशिबाच्या कात्रीने जोपर्यंत
तुटणार नाही माझ्या आयुष्याची दोरी