झाड तर प्रेमदिवाणे....

झाड तर प्रेमदिवाणे....

खांद्यावर पाखरांसंगे
ते मंजुळसे किलबिलते
वार्‍याच्या झुळकीसरसे
ते गीत अनामिक गाते

झेलताना पाऊसगाणे
ते होते अल्ल्डवाणे
वार्‍याची कुजबुज पानी
पानांच्या ओठी गाणे

शिशिराच्या साथीने ते
पान पान फेकून देते
कात का टाके जर्जर
नवतरुणपणाते ल्याते

ऋतुराज येता जवळी
अभिसारिका जशी ते खुलते
होउनिया बेधुंद
उरी शिरी कसे ते फुलते

ग्रीष्मी का होई चातक
कोकिळ वसंती झाले
मल्हार आळविताना
पानपान सुखावलेले

झाडाच्या ओठी गाणे
मोहरणे अन सळसळणे
झाडाचे असणे गाणे
झाड तर प्रेम दिवाणे