तळे... (१)

सात सप्टेंबर सकाळी ९ वाजता जॉनाचा फोन खणखणला, तसे मी तिला सांगुनच ठेवले होते की सर्व पिल्लांचा जन्म झाला की लगेचच मला बोलाव. काही मिनिटांतच नव्हे, तर काही सेकंदातच मी भराभर पायऱ्या उतरून तळ्यावर पोहोचले. उखळीसारख्या दिसणाऱ्या लाकडी चौथऱ्याच्या आत ही नवीन जन्मलेली पिल्ले चिवचिवाट करत होती कारण की त्यांना बाहेर यायचे होते. जॉना व मी मिळून चौथरा पालथा पाडला आणि पटापट पिल्ले बाहेर पडली. एक, दोन, तीन चार नव्हे, तर दहा बारा पिल्ले होती. काही अंडी तशीच उबवायची राहून गेलेली दिसत होती. पिल्लांची चिवचिव, त्यांचे चालणे, पळणे, पळता पळता धडपडणे, उलटे होणे, आईबरोबर तळ्यावर जायला उत्सुक असणे हे सर्व काही नयनरम्य होते! हे क्षणच मला हवे होते आणि ते मला मिळाले!. त्यांचा चिवचिवाट परत परत ऐकावासा वाटत होता. त्यांना कॅमेरात टिपले. स्तब्ध व धावती चित्रे घेतली.

आमच्या अपार्टमेंट समोरच एक तळे आहे. या तळ्यात काय नाही?  सर्व काही आहे. उंच मानेची बदके, तपकिरी रंगाची बसकी बदके, मासे, कासवे, कोंबडीसारखी दिसणारी बदके, सर्व बदकांची पिल्ले, सीगल्स पक्षी, कावळे, साळुंक्या, वेगवेगळ्या रंगाचे पक्षी! तळ्याभोवती पससलेल्या गवतामध्ये सुद्धा सुंदर सुंदर फुले नीट बघितले तर उमललेली दिसतात. तळ्यात पडणारे बदलत्या आकाशाचे प्रतिबिंब सुरेख दिसते! आकाशातील बदलणारे रंग, ढगांचे वेगवेगळे आकार, प्रखर सूर्यप्रकाश, बर्फ, सर्व काही या तळ्यामध्ये मी पाहिलेले आहे. तळ्यावर लिहावे असे बरेच दिवस मनात घोळत होते पण मुहूर्त लागत नव्हता. या गोड गोड पिल्लांच्या जन्ममुहूर्तावरच तळ्यावर लिहायला सुरवात करावी असे ठरवले कारण की याच्यासारखा दुसरा सुंदर मुहूर्त नाही! तळ्याबद्दल लिहायचे झाले तर मला सहा वर्षे मागे जायला लागेल. आम्ही नुकतेच पहिले शहर सोडून नवीन शहरात आलो होतो.....

आमच्या समोरचे तळे पाहिले की मला म्हणावेसे वाटते की एका तळ्यात होती बदके पिले बरीच, होते सुरेख तान्हे पिल्लू तयात एक!    एक अतिशय सुंदर तान्हे पिल्लू की ज्याचा विसर पडणे शक्य नाही! सर्व बदकांमध्ये वेगळे! तळ्यात सर्व बदके काळ्या व करड्या रंगाची, त्यांचे पंख पण वेगवेगळे. कुणाची निळी शेड तर कुणाची करडी, कुणाची पांढरी तर कुणाची गडद काळीच! पण हे तान्हे तसे नाही. पांढरे शुभ्र! गोंडस! त्याचे डोळे काळेभोर जणू काही काळे मणी बसवले आहेत की काय असे वाटावे!

नवीन जागी रहायला आलो तेव्हा एकदा दार उघडून पाहिले तर अनेक छोटी मोठी बदके चालत चालत येताना दिसली. खूप गंमत वाटली. काही जण त्यांना ब्रेडचे छोटे तुकडे त्यांच्या दिशेने खाण्यासाठी फेकत होते. त्यात हे लक्ष वेधून घेणारे पांढरेशुभ्र बदकपिल्लू होते. खाली उतरले व त्यांच्या घोळक्यात गेले. मी त्यांना पकडेन की काय असे समजून ती बदके दूर व्हायला लागली पण हे छोटे बदकपिल्लू मात्र निरागसपणे माझ्याकडे बघत होते! मनात म्हणले याला भीती कशी काय नाही वाटत?!

आमच्या अपार्टमेंटच्या समोरच हे तळे आहे. त्यात अनेक छोटी मोठी बदके, त्यांची छोटी छोटी पिल्ले आहेत. त्यांना पाहण्याकरता माझी अधूनमधून चक्कर असतेच. संध्याकाळी ही सर्व बदके आळीपाळीने बाहेर चक्कर मारायला येतात. ते पांढरे बदकपिल्लू दिसले की मला खूप आनंद व्हायचा. त्याच्याकडे बघत बसावेसे वाटायचे. सर्व बदकांमध्ये ते खूपच उठून दिसायचे. तळ्यावर जाऊन तळ्यावरच्या लाटा पाहणे, पाण्यात पडलेले आकाशाचे वेगवेगळे प्रतिबिंब पाहणे, व ही बदके काय करतात, कुठे जातात याचे निरिक्षण करणे हा आता मला छंदच लागला आहे. काही बदके गवतातील किडे मुंग्या खाण्यासाठी येतात तर काही गवतात येऊन आपले पंख चोचीने साफ करतात. काही जण दुसऱ्या तळ्यावर जाताना चक्क चालत चालत रस्ता ओलांडून जातात. दिवस असेच भराभर जात होते. काही दिवसांनी मला त्या बदकांचा थोडा विसर पडला......

...... आणि एक दिवस! एक दिवस अचानक माझ्या लक्षात आले की अरेच्या! पांढरे बदकपिल्लू कसे काय दिसत नाही! कुठे गेले हे? जेव्हा जेव्हा म्हणून तळ्यावर जायचे तेव्हा शोधायचे त्याला. पण नाहीच! अरेरेरे!   आज माझ्याकडे त्या तळ्यातील सर्व छोटी मोठी बदके आहेत, पण ते सुरेख पांढरेशुभ्र पिल्लू नाही. बरेच वेळा विचार येतो की आजूबाजूच्या सर्व तळ्यांवर पाहून यावे कुठे दिसते का ते, पण तो फक्त विचारच राहतो. एक मात्र नक्की की माझ्या मनात त्याला मी पूर्णपणे साठवून ठेवले आहे. जेव्हा त्याची आठवण होते तेव्हा मनात साठवलेल्या या पिल्लाला  मी पाहते. मनाला खूपच हुरहुर लावून गेले हे गोंडस पिल्लू!!!

तळ्यावरील सर्व प्रकारची बदके,  त्यांची पिल्ले, कासवे, बगळे, सीगल्स, मासे या सर्वांच्या गमतीजमती, आठवणी पुढील भागात येत आहेतच, तूर्तास या गोड गोड बदकपिल्लांच्या विडिओ क्लिप्स बघा!!

..... पान नं २ लवकरच येत आहे.