स्वप्न

स्वप्न बघणे छंद आहे, स्वप्न माझे गाव आहे
स्वप्न माझा श्वास आणी अंतरीचा भाव आहे

स्वप्न मम संवेदना अन वेदनांचे रूप असते
काचते, सलते कधी तर, मस्त गंधित धूप असते
अंतरी झंकारण्याचे, स्वप्न दुसरे नाव आहे
स्वप्न माझा श्वास आणी अंतरीचा भाव आहे

अंबराला गवसणी अन, भेदणे पाताळ केंव्हा
शक्य तारे तोडणेही, पाहतो मी स्वप्न जेंव्हा
भेद ना स्वप्नास ठावे, रंक मी का राव आहे
स्वप्न माझा श्वास आणी अंतरीचा भाव आहे

नांदतो, स्वप्नात बघतो, उमलणार्‍या त्या कळ्यांना
मोहरावे मी बघूनी, हासणार्‍या पा़कळ्यांना
जीवनाचे बिंब स्वप्नी, धूप केंव्हा छाव आहे
स्वप्न माझा श्वास आणी अंतरीचा भाव आहे

स्वप्न होउन गीत माझे, निर्झरासम झुळझुळावे
सूर देण्या, ताल धरण्या, मग नदीने खळखळावे
स्वप्न बाजी जीवनाची, जिंकणारा डाव आहे
स्वप्न माझा श्वास आणी अंतरीचा भाव आहे

कोण आले? कोण गेले? स्वप्नवत या जीवनीहो
स्वप्न छॉटे पण तरीही, वाटले संजीवनीहो
लोप प्रतिभेचा जिव्हारी, शायराच्या घाव आहे
स्वप्न माझा श्वास आणी अंतरीचा भाव आहे

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

E Mail---  nishides1944@yqhoo.com