माझ्या आईच्या डोळ्यात
श्रावणाची रिमझिम
बारा सणांचे सोहळे
चाले तळ्यात मळ्यात.....!
डोईवरचा आधार
जसे साडीला ठिगळ
तिच्या कुशीमधे मिळे
उब मायेची अपार .......!
जसे श्रावण शिरवे
तसे आईचे बोलणे
डोळ्यामधे धाक सारा
राग मनात जिरवे ......!
कसे जनात वागावे
आईनेच शिकविले
बालपणीचे हिंदोळे
तिच्याकडून मागावे ......!
जसा श्रावण मनात
जातो देऊनिया देणे
कधी सुख कधी दुःख
माय मांगल्याचे लेणे .....!!
कविराज विजय यशवंत सातपुते,
यशश्री, पुणे - ९