अनामिक ...

जेव्हा
ते निराकार चैतन्य,
गोडगोजिरं रूप घेऊन
अवखळपणे
येऊन बसतं मांडीवर.
आणि नितळ हसऱ्या डोळ्यांनी
बघत राहतं टकमक…
त्याला काय नाव द्यावं,
कळतच नाही खरं..

काही कवितांचंही
असंच होतं काहीतरी..
आणि नावांच्या आड लपूनच
शिरतं त्यांच्या आत त्यांचं ’मी’पण...
म्हणून त्याला… आणि त्या कवितांना
अनामिक असलेलंच बरं…