मोकळी होता मिठी
आयुष्य झाले मोकळे
मोकळेपण जीवघेणे
नेईल कोठे ना कळे
मोकळ्या विश्वात माझ्या
गा बसंती राग ना!
मी अबोली, जे हवे ते
तूच मजला माग ना!
सजविते मी क्षितिज जेंव्हा
कोवळ्या किरणासवे
ऊंच उडती पंख लावुन
विविध स्वप्नांचे थवे
मी अशी स्वप्नात जगते
तू जरासा जाग ना!
मी अबोली, जे हवे ते
तूच मजला माग ना!
उमलण्याचे दिवस आले
मोहरुन गेली कळी
झुळूक येता मंद हसली
गोड गालावर खळी
भ्रमर पिती गंध जेथे
दाखवी मज बाग ना!
मी अबोली, जे हवे ते
तूच मजला माग ना!
लाजर्या बुजर्या मनी रे
बंदिस्त झाल्या भावना
पाहुनी डोळ्यात माझ्या
अर्थ त्यांचा लाव ना!
भावना दुथडी वाहते
वल्हवू चल नाव ना!
मी अबोली, जे हवे ते
तूच मजला माग ना!
निशिकांत देशपांडे मो. क्र. --९८९०७ ९९०२३