श्वास भरूनी उडण्याचा

ऊंच करूनी टाचा केला
प्रयत्न तारे खुडण्याचा
पंख न फुटता निश्चय केला
श्वास भरूनी उडण्याचा

खाचा खळगे खूप लागले
चालत आलो जिद्द करूनी
मात करूनी संकटावरी
विजय दावला सिध्द करूनी
एकच कित्ता गिरवित आलो
परिस्थितीशी लढण्याचा
पंख न फुटता निश्चय केला
श्वास भरूनी उडण्याचा

उन्नत ठेवुनी मान आपुली
जीवन सार्थक जगत राहिलो
वादळ वारे आले गेले
बेफिकिरीने बघत राहिलो
वृक्ष कधी का भीतो येता
मोसम पाने गळण्याचा
पंख न फुटता निश्चय केला
श्वास भरूनी उडण्याचा

जगतो आजच जीवन माझे
काल उद्या ठाऊक कुणा?
पदोपदी मजला आढळती
झगमगत्या पाऊलखुणा
सूर मारता मोत्यासाठी
भयगंड न शिवला बुडण्याचा
पंख न फुटता निश्चय केला
श्वास भरूनी उडण्याचा

कक्षा इतक्या रूंद असाव्या
क्षितिजापुढचे सर्व दिसावे
हरवुन जावे गूढ प्रदेशी
रूढ जीवना खूप हसावे
ध्यास असावा जीवास नेहमी
नाते प्रभूसी जुडण्याचा
पंख न फुटता निश्चय केला
श्वास भरूनी उडण्याचा

निशिकांत देशपांडे   मो. क्र.  ९८९०७ ९९०२३

E Mail---  nishides1944@yahoo.com