ऎसी ज्ञानियाची ओवी । तिला कैवल्याची ओढ ।
ब्रह्मचैतन्याची फोड । तिने सांगावी जना ॥१॥
ऎसे अगाध चैतन्य । कैसे शब्दांत बांधावे ।
एका दुव्यात सांधावे । कैसे गगन धरा ॥२॥
शब्द अविद्येचे माझे । एका अनुभूतिवीण ।
त्याच्या ओळीओळींतून । नित्य सोहं वसे ॥३॥
मुक्या म्हणे आम्ही भाट । घाट शब्दांचे घालतो ।
एका ओवीत बोलतो । ज्ञाना ब्रह्म कसे ॥४॥