त्यासीसदर कवितेतील 'सुषमा लेले' हे पात्र काल्पनिक असून त्याचं कोणत्याही व्यक्तिशी साम्य अढळल्यास निव्वळ योगयोग समजावा..
सुषमा लेले....
दिवस नवा... ड्रेस नवा... रोज मला हवा
नवीन साबण.. नवी अत्तरे नियमाने लावा.... १
नवी पॅंट अन नवीन शर्ट... त्यावर शोभे नवीन हॅट
आत ध्यान जरी जुने पुराणे... पायी हवा नवीन बूट.... २
केस जणू खोप विहंगी, त्यावर डोले बट नारिंगी
खिसा घेऊनी फिरती संगी, इवलीशी कंगी.... ३
डोळ्यावरी सदैव चष्मा, थंडी असो वा असेल उष्मा
चष्म्याआडून पाहतसे मी, लेल्यांची सुषमा.... ४
सुषमा लेले गोरी गोजिरी, जात्याची सुंदरी
देईन म्हणतो तिला सवारी, नवीन गाडीवरी.... ५
अथवा जावे घेऊनी तिजला, कॅफी द्यावी 'दुर्गा'त
स्वप्न पाहतसे गुंग होऊनी, गणिताच्या वर्गात.... ६
पुस्तक नावापुरते इकडे, पेन पाहिजे कुणा
हरेक पानावरती दिसती आता 'दिल' - 'बाणाच्या' खुणा... ७
असेच सरले दिन, मास अन वर्षही गेले सरून
परिक्षेच्या दिवशी सुषमा, हसली मज पाहून..... ८
नेमका होता त्याच दिवशी, गणिताचा पेपर
हरपूनी 'सुषमा' 'सुषमा' लिहीले सार्या पेपरभर.... ९
निकाल लागला आणि उडाले तोफेतून गोळे
गणिताच्या वेली लागले, मोठ्ठाले भोपळे.... १०
घरी जाहले जंगी स्वागत, हासडूनीया शिवी
तिर्थरुपांनी घेतली काढूनी गाडीची चावी
वर, केसही कापले, गाठोनी बरा न्हावी
अशीच कां बरं, बापासमोरी बदनामी व्हावी ? .... ११
हॅट गेली, बूट गेले, नवे अत्तर हवेत विरले
डोईवरचे केस कापले, कंगीचे मग काही नं उरले !
काय अवदसा सुचली मजला, पाहीली मी सुषमा लेले.... १२
- श्रीयुत पंत