राधास्वप्न....
दूर शिखरावरती
शांत शांत ती निळाई
पात तृणाचीही गर्द
आज कशी ती सावळी
भास मना का गं होई
श्रांत कान्हा पहुडला
पुष्पे सुवर्ण कांतीची
शेला कटी मिरवला
शिरी शिखराच्या एक
वृक्ष भला बहरला
मोर पीस खोवी कैसे
जैसे मुरारी डोईला
मेघ नभींचे शिखरी
रुळे कुंतल कुरळे
वारा हळुवार सारी
दाही हाती त्या सावरे
उन मऊसे उतरे
मेघ थोडेसे सारून
स्मित रेखा हरी मुखी
क्षणी जाते उजळून
नाद कालिंदीचा कानी
किती हळुवार येई
हरी अधर स्पर्शाने
वेणू गोड निनादली (शहारली)
रुप श्रीरंगाचे सये
दोन्हीं नयनी मावेना
मिटू घेता नवलाई
कान्हा अंतरी ठाकला......