टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत -

टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत
अबलख माझा घोडा - 
आई बाबा आजी आजोबा
सरका रस्ता सोडा !

दोनच पायांच्या घोड्याची
घरभर भरभर घाई   
पटपट झुरळे दूर पांगती
खुषीत येते आई !

हातांचा हा लगाम धरुनी
वेगाला मी आवरतो
ऐटित मागे पुढे डोलुनी
घर-मैदानी वावरतो ! 

घोडोबा मी घरी लाडका
खेळायाला पुढे पुढे - 
शंभर टक्के परीक्षेत गुण
अभ्यासातहि सदा पुढे !   

तबेल्यात बेजार हा घोडा
आठवड्यातले दिवस सहा -
चंगळ घोड्याची रविवारी
हैराण हे घरदार पहा !!