एकलेपण पाहुनी

बाळ गेली सासराला
आठवणींना ठेउनी
गोठले आयुष्य सारे
एकलेपण पाहुनी

बंद डोळ्यातून आले
दोन ठिपके आसवांचे
वेळ जाता जात नाही
दिवस आले कासवाचे

नित्यनेमे रात्र येते
झोप कोठे हरवुनी?
गोठले आयुष्य सारे
एकलेपण पाहुनी

हास्यरेषा, आसवाने
झाकल्या जाऊ नका
खिन्नतेच्या सावल्यांनो
वाकुल्या दावू नका

ग्रस्त आहे मी बिचारा
विरह ओझे वाहुनी
गोठले आयुष्य सारे
एकलेपण पाहुनी

ओलसर ही जखम अजुनी
वेदना सहणार आहे
सवली सोडून गेली
तिमिरात मी जगणार आहे

गंध येवो, सुमनाकडे
पाठ अपुली फिरवुनी
गोठले आयुष्य सारे
एकलेपण पाहुनी

वेदनेचे संपलेले
आज हे भारूड आहे
कोपर्‍यामध्ये मनाच्या
आत्मजा आरूढ आहे

डाकिया येणार आहे
खबर हसरी घेवुनी
गोठले आयुष्य सारे
एकलेपण पाहुनी

कोकिळा बागेत माझ्या
मधुर स्वर गाणार आहे
पंचमी दसरा सणाला
लाडकी येणार आहे

पर्व हर्षाचे बघा मग
अंगणी मम येवुनी
गोठले आयुष्य सारे
एकलेपण पाहुनी

निशिकांत देशपांडे.   मो.क्र. ९८९०७ ९९०२३