" असेन जरी नेता मी "
असेन जरी नेता मी ,
संशय उगी घेऊ नका ।
जमविली ही माया जरी ,
भ्रष्टाचारी मज म्हणू नका ॥ध्रु॥
घरात खाया नव्हती भाकरी ।
वण वण फिरलो दारोदारी ॥
माल धक्क्यावर केली चाकरी ।
जणू मेंढरे मुकी बिचारी ॥
केली जरी दादागिरी मी ,
उगीच भाई ठरवू नका ॥ध्रु॥१॥
अनेकांना घातले गंडे ।
तरी समाजात मी मोठा॥
उगीच करूनी कांगावा।
ठरवू नका मज खोटा ॥
वाटल्या पैशाच्या थैल्या जरी ।
लुच्चा मज म्हणू नका॥ध्रु॥२॥
आज पदावर विराजमान मी ।
तुमच्यामुळेच की, आहे ॥
एकीची धमक तुमच्यात नाही ।
अत्याचार हा मुकाट साहे ॥
स्व सन्मान करून घेता ।
भामटा मज म्हणू नका ॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
१७।१०। २०११.