प्रार्थना..... १

प्रार्थना..... १

डोळे मिटे प्रार्थनेत
मन सारे जग बघे
चित्त नसता थार्‍यासी
कशी प्रार्थना घडते १

हात जोडी प्रार्थनेला
मन चहू दिशा जाते
मन एकविध होता
खरी प्रार्थना घडते २

हात जोडी प्रार्थनेला
का ते जोडी मागण्याला
भाव जाणे देव साचा
जरी दगडाचा झाला ३

प्रभू वसे अंतर्यामी
जाणे मागणी प्रार्थना
स्वतःलाच स्वतः कोणी
कदा फसवू शकेना ४

नसे काही विधी तंत्र
जरी काही प्रार्थनेत
चित्त परि असू द्यावे
एक प्रभू चरणात ५

तुका प्रार्थना जाणतो
नामा विठूशी बोलतो
धन मान अन्न परि
पायी कदा न मागतो ६

भक्त जाणतो प्रार्थना
जन जाणतो मागणे
भिन्न भाव जनार्दन
जाणे परि अबोलणे ७

देव भक्त ह्रदयात
जन शोधिती बाजारी
जाता जन देवळात
तेथे व्यवहार करी ८

लाभ होतो देवाजीचा
खर्‍या प्रार्थनेत जाणा
माग मागूनिया नित्य
देवा का हो लाज आणा ९