गफलत

पुराणाचा अभ्यास हा माझा एकेकाळचा छंद पण आता तोच माझ्या पोटापाण्याचा
उद्योग झालाय. सध्या मला एक नाणावलेला पुराणवस्तु संशोधनकर्ता म्हणून
मान्यता मिळायची वेळ आलिये. पण मी नुसताच पुराणवस्तुंमधे गुंतून पडलेला
नाहीये. माझे आवडते मत म्हणजे ‘पुराणातली वांगी पुराणात ठेवू नका’ कारण
त्यात बरचसं तथ्य असतं हे आता शस्त्रसुद्धा मान्य करत. निव्वळ दंतकथा
म्हणून आपण काणाडोळा करतो पण मुळात या दंतकथा तयार कशा होतात? आपल्याकडे
म्हणतात ना ! ‘आग असल्या शिवाय धूर निघत नाही’ तसा विचार एकदा करून
पहा,............ थोडंफार पटतंय ना !

मी अश्या हजारो दंतकथा ऐकल्यात,
वाचल्यात आणि त्यांच्यामधले तथ्य शोधण्यासाठी भरमसाठ पायपीट केलीये. कधी
त्यातून काही निष्पन्न झाले तर कधी नाही, पण तरीही जे काही अनुभव मिळाले
त्याच्या तुलनेत फुकट गेलेल्या वाऱ्यांचे दुःख अजिबात नाही. आजही मी
कोणत्याही नव्या दंतकथेच्या शोधात पळतच असतो वेळात वेळ काढून.

सध्या
मी नीलगिरीच्या एका खेड्यात आहे झांबीडी नावाच्या ! आता मी इथे काय
करतोय? असा प्रश्न नक्कीच पडला असणार ना ! पण त्याचं उत्तर देण्याआधी मला
ज्या दंतकथेने इकडे यायला भाग पाडले ती दंतकथा सांगावीच लागेल, त्या
शिवाय माझ्या पुढच्या सांगण्याला अर्थ राहणार नाही.

‘ ही सत्ययुगा नंतर आणि द्वापारयुगाच्या आधी म्हणजे रामाच्या नंतर आणि कृष्णाच्या आधी घडलेली गोष्ट आहे.


शषाल आणि शेषाल असे दोन जुळे भाऊ एका महर्षींच्या आश्रयाला होते.
लहानपणापासून त्यांचे पालनपोषण आणि शिक्षण दोन्ही त्यांच्याकडेच झाले. जुळे
भाऊ म्हणून जरी दोघे एकसमान दिसत असले तरी त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक
होता. शषाल हा अतिशय मेहनती आणि जिद्द बाळगून असलेला होता, पण त्याच्या
तुलनेत शेषाल हा जरा आळशी आणि चटकन निराश होणारा, प्रयत्न सोडून देणारा.
दोघांनाही एकाच प्रकारचे प्रशिक्षण मिळाले पण शषाल प्रत्येक पातळीवर अफाट
मेहनत घेत यशस्वी होत गेला. तर शेषाल मध्येच प्रयत्न सोडून देत राहिला.
शेवटी जेव्हा त्यांचे प्रशिक्षण पूर्णं झाले तेव्हा प्रत्येक कलेत शषाल
पारंगत होता तर शेषाल चुका करत होता. एकदा त्या महर्षींच्या आश्रमावर
दुसर्‍या संस्कृतीच्या टोळीने हल्ला केला. दोघेही आपापल्या तंत्रशक्तीच्या
साहाय्याने प्राणपणाने लढले पण अखेर दोघेही एकाच ठिकाणी धारातीर्थी पडले.
लढाईत विजय मिळाल्यावर त्या ठिकाणी दोघांच्याही मूर्ती उभारल्या गेल्या.
'खरं तर हे थोडंसं वेगळं वाटतं कारण त्या काळात कुणाच्या मूर्ती वगैरे
उभारल्या जात नसत'. पण ठीक आहे थोडेफार प्रसंग वाढतातच असे मूळ घटनेमध्ये.
तर या दोघांच्या मूर्ती उभारल्या आणि त्यांना समस्त ऋषिमुनींनी चिरंजीव
शक्तीत्वाचा आशीर्वाद दिला. आता जर कुणी त्यांच्या मूर्तीसमोर काही
गार्‍हाणे मांडले तर आपल्या तंत्रसामर्थ्याच्या जोरावर त्यांच्या मूर्तीही
ते गार्‍हाणे दूर करू शकत होत्या.

मला शक्य तितक्या कमी शब्दात ती
दंतकथा लिहिलीय. बाकी ती कहाणी म्हणजे जवळपास पन्नास एक पानांचे बाड आहे
चक्क. तर या दोघांच्या मूर्ती या नीलगिरी मधल्या या झांबीडी गावाजवळ आहेत.
मी इथे त्यांच्या दंतकथेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आलोय. आता
आजूबाजूला चौकशी केल्यावर थोडीफार माहिती हाताला लागेलच माझ्या
पूर्वानुभवावरून मी हा अनुमान काढलाय.

त्या मूर्तीबद्दल जास्त
माहिती मिळवताना आणखी एक नवीन गोष्ट कळलीय. जरा चमत्कारिक आहे पण एकंदरीत
त्यात तथ्य असण्याची शक्यता जास्त वाटते. इथल्या लोकांना या मूर्तींच्या
शक्तींबद्दल माहिती आहे, पण त्याचा फायदा घेऊन इथे कुणी काही मिळवण्याचा
प्रयत्न करत नाही. या मागचे कारणही तितकेच चमत्कारिक आहे.

दोन्ही
मूर्ती शेजारी शेजारी आहेत. आपले गार्‍हाणे मांडताना त्या दोन्ही
मूर्तीसमोर मांडावे लागते. यथावकाश त्यांच्या तंत्रशक्तींचा प्रत्ययही
येतोच पण...........

यातला शषाल किंवा शेषाल दोन्हीपैकी कुणीही एकच
गार्‍हाणे घालणार्‍याची अडचण दूर करण्यासाठी आपली शक्ती वापरतो. यातल्या
शषालने आपली कृपादृष्टी टाकली तर ठीक पण जर शेषालने कृपादृष्टी टाकली तर
अगदी शंभर टक्के काही ना काही चुकीचे घडते.

हे सगळे ऐकल्यावर मला
तरी आश्चर्य वाटले नाही शेषाल मुळात आपले शिक्षण आपल्याच आळशी पणामुळे
पूर्णत्वास नेऊ शकला नव्हताच. त्याची तंत्रशक्ती अर्धवट होतीच त्यामुळे
त्याने टाकलेल्या कृपादृष्टीत याला आपण आशीर्वाद म्हणू काही ना काही
त्रुटी राहणारच होत्या. एकूणच वाचलेली दंतकथा ही खरोखर अस्तित्वात
असलेल्या शक्तींबद्दल होती यात शंका नाही आता त्या मूर्तीचे दर्शन घेणे
इतकेच काम बाकी आहे, अर्थात तिकडे नेण्यासाठी गावातले कुणी तयार होणार
नाही हे माहीत आहे म्हणा. कारण म्हणे तिथे जाऊन काहीही न मागताच परत आले
तरी काही ना काही भलंबुरं घडतंच. याबद्दल मी गावकऱ्यांना दोष देणार नाही
कारण एखाद्या अंधश्रद्धेचा पगडा मनावर बसला की तो सहजासहजी दूर होत नाही.

मूर्तींच्या समोर उभं राहिल्यावर खरंच त्या घडवणाऱ्या
कलाकाराला मनापासून दाद द्यावीशी वाटली. अगदी चेहर्‍यावरच्या हावभावांसहित
संपूर्ण मूर्ती म्हणजे अगदी समोर खरोखरच कुणी जिवंत व्यक्ती उभ्या
असाव्यात असे वाटण्या इतपत त्यावरचे काम अप्रतिम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे
इतक्या प्रचंड कालखंडाचा त्यांच्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
बाकी गावकरी म्हणतात त्याप्रमाणे एकाच वेळी दोघांसमोर आशीर्वाद मागावा
लागतो हे खरे आहे कारण या मूर्ती अगदी खेटून आहेत दोघाच्यामधून वाराही
जाणार नाही, वर त्या एकाच लहानश्या घुमटाकार देवळात आहेत. त्यांच्या समोर
उभे राहिल्यावर मनात एक चुकार विचार डोकावून गेलाच आपणही काही मागावे,
नाहीतरी माझ्या थिसिस बद्दल माझ्या सीनियर्सना कधी आपुलकी वाटलेली नाहीच
जर त्यांना माझ्या लिखाणाबद्दल आपुलकी वाटायला लागली त्यांनी जर मेहेरनजर
ठेवली तर मला जगप्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. पण कसाबसा मी हा विचार
मनातून झटकला. आणि समोरच्या मूर्तीचे फोटो घेण्याकडे लक्ष वळवले. हो !
लेखनाबरोबर फोटो असतील तर ते जरा जास्त परिणामकारक बनते असे माझ्या
वरिष्ठांना वाटते.

माझे इथले काम संपले आता मी या प्रवासाबद्दलचे
अनुभव आणि त्यातले रिझल्ट लिहून माझ्या वरिष्ठांकडे सोपवायचे काम तेवढे
राहिलेय. लेखन मला जातानाच्या प्रवासात पूर्णं करता येईल म्हणजे गेल्या
गेल्या मी आमच्या मंडळात हे सारे मांडू शकतो. त्यांना पटले म्हणजे झाले.

"
काय महाशय या असल्या चित्रविचित्र गोष्टी तुम्ही कधीपासून करायला लागलात?
तेही एक संशोधक असून? की तुम्ही सुद्धा या दंतकथांच्या शोधात फिरता फिरता
त्यात वाहवलात?"

माझे वरिष्ठ माझे लिहिलेले कागद माझ्यासमोर फडकावंत
मला म्हणत होते. मला काही कळेना हे असे का म्हणताहेत? मी तरी जे दिसले,
अनुभवले तेच तर लिहिले होते. यात कुठली चित्रविचित्र गोष्ट मी केली? निदान
मला तरी आठवत नव्हते.

" सर तुमची काहीतरी चूक होतेय मी नेहमी प्रमाणे पेपर्स दिलेयत तुमच्याकडे यात कोणतीच विचित्र गोष्ट नाहीये." गोंधळून मी म्हणालो.

" हो का ? मग हे काय आहे ? हे काळ्या मांजराचा फोटो?" लेखाच्या शेवटच्या ओळीखालच्या मोकळ्या जागी बोट आपटत माझे वरिष्ठ कडाडले.

"फोटो नेहमी लेखाच्या सोबत जोडायचे असतात लेखाच्या खाली नव्हे हे विसरलात की काय?"

" नाही सर, तिथे काहीच नाहीये" माझ्या स्वरातून माझा अविश्वास नक्कीच जाणवला असला पाहिजे.

"
मग आमचे डोळे काही चुकीचे दाखवतायत का? की तुमच्या थियरी प्रमाणे यातही
काही अतिमानवी शक्ती उतरली आहे?" त्यांच्या स्वरातला उपहास स्पष्ट जाणवत
होता.

गुपचुप त्यांच्या हातातले कागद घेऊन मी परत घराकडे निघालो,
जाता जाता कमीतकमी दहा-बारा वेळा तरी मी ते कागद पाहिले पण मला एकदाही
त्यात केवळ शब्द सोडून कोणतेही चित्र दिसले नाही.

हताश मनाने घरात येऊन आरामखुर्चीत अंग टाकले. ‘हे लोक खरंच बोलतायत की आपले मला वाटेला लावण्यासाठी असले काही बहाणे करतायत?’

‘असेलही
कदाचित, नाहीतरी या लोकांना असले काही संशोधन नकोच असते, कोणती तरी
मातीची मडकी उकरून त्यांच्या कार्बन डेटींगने त्या काळात एखादी संस्कृती
असावी वगैरे..., असले काहीतरी स्कुप हवे असते यांना. पण त्या काळात कोणती
संस्कृती असावी त्या गावाचे नाव काय असावे या साठी त्या ठिकाणी प्रचलित
दंतकथांचा आधार घेण्याची कल्पना त्यांना हास्यास्पद वाटते’. या असल्या
लोकांचा विश्वास काय बसणार माझ्या लेखावर? माझे या विषयावर डॉक्टरेट करायचे
स्वप्न स्वप्नच राहणार बहुतेक. मनातल्या काहुरात कधी झोप लागून गेली ते
कळलंच नाही.

दुसर्‍या दिवशीची सकाळ माझ्यासाठी फार मोठी बातमी घेऊन
आली. माझे ते तथाकथित वरिष्ठ एका अपघातात आपले पाय गमावून बसले. म्हणजे
नेहमी प्रमाणे ते घरी निघाले होते आणि ते त्यांच्या गाडीत बसत असताना
त्यांच्या गाडीला बाजूने जाणाऱ्या गाडीने धडक दिली. अर्धवट आत आणि अर्धवट
बाहेर असलेल्या त्यांच्या शरीरामुळे गाडीच्या दरवाजा बरोबर त्यांचे
पायही.............

खूप कठोर वागत असले तरी अखेरीस ते ही तुमच्या
आमच्यासारखे माणूसच होते. वाईट तर वाटणारच, पण त्यातही एक चोरटे दुःख
होतेच आता माझ्या लेखाचे भवितव्य पुरते अंधारले होते.

त्या घटनेला
बरेच दिवस होऊन गेलेत. आता त्या झांबिडीच्या लेखाचे काहीतरी करायला हवे हा
विचार अस्वस्थ करतोय. आजच एका संपादकाला भेटतोय निदान वर्तमानपत्रात तरी
हा लेख आला तर मला त्याचे समाधान वाटेल. प्रसिद्धी मिळाली तर कुणाला नको
असते? त्यातून या लेखात माझे भावानुबंध जुळले होते, तसे ते आजवरच्या
प्रत्येक लेखाशी जुळलेले आहेतच.

" फारच रोमांचक अनुभव आहे हो तुमचा" संपादक हातातल्या कागदांकडे उत्सुकतेने पाहतं म्हणाले.

नाही म्हटला तरी मनाला जरा शांतता लाभलीच.

"
आणि सोबत फोटो असल्यामुळे जरा जास्तच प्रभावी झालंय लेखन" संपादकांची
पुष्टी मिळाल्यावर आणखी बरे वाटले. मनातल्या मनात म्हटलं जर त्या
डॉक्टरेटच्या नादाला लागण्या ऐवजी जर असेच आपले लेख वर्तमानपत्रात दिले
असते तर एव्हाना तळागाळापर्यंत ते प्रसिद्ध झाले असते. कशाला त्या नावाआधी
डॉक्टर जोडायचा हव्यास करायला हवा होता?

" पण एक रोमांचक प्रवासवर्णन म्हणून हे लोकांच्या फारसे पचनी पडणार नाही"

" अं, काय म्हणालात?" तंद्री लागल्यामुळे मी त्यांचे बोलणे नीट ऐकलेच नाही आणि जेव्हा ऐकले तेव्हा माझ्या डोक्यात जणू स्फोट झाले.

" आहो पण फोटो दिले आहेत ना त्या ठिकाणचे तुमच्याकडे?"

"
नाही म्हणजे तसे त्या ठिकाणाचे फोटो आहेतच आपल्याकडे पण तुम्हाला माहीताय
त्यातून फारसे काही सिद्ध होत नाही. हे फक्त त्या ठिकाणाचे आहेत"

"मग? आणखी काय हवे ? "

" त्यातून तुम्हाला आलेल्या अनुभवांना सिद्ध करता येणार नाही ना! जर तुम्ही तिथल्या कुणाची मुलाखत आणली असती तर......... "

" म्हणजे याचा अर्थ तुम्ही हा लेख छापणार नाही तर"

" अहो! तुम्ही गैरसमज करून घेतलात की, मी असे नाही म्हणालो तुम्हाला"

" मग ?"

" आपण तो काल्पनिक, किंवा कथा म्हणून छापू शकतो ना ! "

" अहो, पण माझा अनुभव खरा आहे"

" हो पण हयात अनुभव असा काय आहे? फक्त तुम्ही तिथे जाऊन पडताळणी केलीत इतकाच बाकी त्या दंतकथेला काही पुरावे नाहीत ना ! "

"
अच्छा! म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे तर मग मला सांगा हो, रामायण
महाभारताचे पुरावे आहेत तुमच्याकडे ? श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता
सांगितल्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? तरी त्या दंतकथा म्हणता का हो
तुम्ही?" माझ्या दुखर्‍या नसेवर हात ठेवल्यामुळे मी संतापलो.

" चिडता काय हो, मी आपली सामान्य शंका काढली हो"

" मी ही तुम्हाला सामान्य उदाहरणेच दिली"

" तसे आपण छापू शकतो हे प्रवास वर्णन म्हणून अर्थात आमच्या अटीं नुसार"

" म्हणजे जे लिहिले आहे त्याच्याशी संपादकांचा संबंध नाही असेच काहीसे ना?"

यावर काही बोलण्याऐवजी संपादक कसेनुसे हसले. आणि मी काय ते समजून गेलो, आणि जाण्यासाठी उठलो.

"
आहो, एक विचारायचे राहून गेले, या लेखाच्या शेवटी असलेला हा काळ्या
मांजराचा फोटो तसाच छापायचा का ?" संपादक लेखाच्या शेवटी असलेल्या कोर्‍य़ा
जागेवर बोट ठेवत म्हणाले.

माझ्या डोक्यात पुन्हा एकदा स्फोट झाल्यासारखे वाटले, नेमके असेच माझे वरिष्ठ म्हणाले होते.

निमूटपणे
मी संपादकांच्या समोरून लेखाचे कागद उचलले आणि बाहेरचा रस्ता धरला. मागे
हाक मारून ते काय म्हणत होते तिकडे माझे लक्षच नव्हते.

दोन दिवस
मला शब्दशः काही सुचत नव्हते, माझ्या लेखाचे कागद मी पुन्हा पुन्हा तपासले
पण मला त्यात काळ्या मांजराचे चित्रच काय एखादा काळा ठिपकाही दिसला नाही.
मग त्या दोघांना त्यात असे का दिसावे? पुन्हा पुन्हा ह्याच विचाराने
अस्वस्थ होत मी टी.व्ही. समोर चॅनल बदलत बसलो होतो आणि त्या बातमीने माझे
लक्ष वेधले. बातम्यांमध्ये त्या संपादकांचे नाव ऐकले आणि मी ती बातमी पूर्णं
पाहिली.

ते संपादक रोजच्या प्रमाणे सकाळी बाहेर फिरायला गेलेले
असताना एका झाडाची भलीमोठी फांदी अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्याला
जबरदस्त मार लागलेला आहे आणि दोन्ही खांदे फ्रॅक्चर झाले आहेत असा साधारण
त्या बातमीचा सारांश होता. म्हणजे ही शक्यताही संपली म्हणायची.

नाही
म्हणता माझ्या मनात एक संशयाची पाल चुकचुकलीच माझे वरिष्ठ आणि हे संपादक,
दोघामध्येही एक साम्य होते, दोघांनाही माझ्या लेखाच्या अखेरीस काळ्या
मांजराचे चित्र दिसले होते.

ताबडतोब मी माझ्या लेखांच्या कागदांकडे
धाव घेतली, आणि सगळे लेखन दुसर्‍या कागदावर उतरवले न जाणो त्या कागदातच
काही दोष राहिला असावा.

संपूर्ण रात्र अशी लिखाणात घालवल्यावर मला
पहाटे पहाटे अचानक झोप लागून गेली. जाग आली तेव्हा समोरच्या खुर्चीत माझा
जुना मित्र तेच कागद चाळत बसला होता. तरी नशीब मी त्या लेखाच्या मूळ
कागदांना रात्रीच जाळून टाकले होते. मला जाग आल्याचे पाहताच तो माझ्याकडे
पाहतं तोंडभर हसला.

" काय रे? कधी आलास ? आणि मला उठवले का नाहीस?" मी विचारले.

" तासाभरापूर्वीच आलोय पण तुला झोपलेला पाहिला तो ही असा बाहेर सोफ्यावर म्हटलं स्वारी रात्रभर जागी असणार म्हणून नाही उठवले रे"

"तरीपण........." पुढे काय बोलावे ते सुचलेच नाही.

" असू दे रे ! मी तुला उठवणारच होतो, पण समोर हे कागद दिसले, सहज चाळले फार सुरेख वर्णन केलेयस यार ! "

" हो तसे आहे खरे"

" हा तुझा नवा शोधनिबंध वाटत?"

" नाही असेच सहज लिहिलेय रे"

" असो, जे काही लिहिलेयस ते खरंच अप्रतिम आहे रे, मला सांग असे घडले असेल का रे या दंतकथेनुसार?"

"माहीत नाही पण तिथे त्या दोघांच्या मूर्ती आहेत खर्‍या"

एव्हाना
तो फोटो निरखायचे काम करत होता. म्हणून मी त्याच्या निरीक्षणात व्यत्यय
आणला नाही, कारण हा सुद्धा एक पुरातत्त्व विषयात गती असलेला माणूस आहे.

" काय रे? त्या मूर्ती किती उंचीच्या आहेत रे ? साधारण?"

"साडेसहा सात फुटाच्या असतील, का रे?"

" तू कधी पुरातन मूर्तीत इतके बारकावे पाहिलेस काय रे ? म्हणजे तू म्हणतोस तश्या समाध्यांमध्ये तरी?"

"म्हणजे?"

" हे बघ!" हातातल्या मूर्तींच्या फोटोवर बोट ठेवत तो म्हणाला" यांचे डोळे पाहिलेस? त्यावरच्या पापण्या?"

"त्यात काय वेगळे आहे?"

"नीट पाहिले असतेस तर जाणवले असते, पापण्यांवरचे केसही स्पष्ट दिसतायत. तश्याच हातांवरच्या रेषा सुद्धा"

" त्याने काय साधतेय?"

"खूप काही, बघ ना ! त्यांच्या उजव्या हातांच्या मुठीच्या शिरा फुगलेल्या दिसतायत"

"बरोबर आहे, पण तुला नक्की काय म्हणायचेय?" आता मलाही उत्कंठा लागली होती.

" उंची आणि शरीराचे प्रमाण योग्य, चेहऱ्यावर थिजलेले भाव जसेच्या तसे, जणू आत्ता डोळे उघडतील असे वाटणारे"

" हो त्या मूर्तिकाराची कला जबरदस्त असावी मलाही मूर्ती पाहताच असे वाटलेले"

" इतका काळ गेला पण कुठे टवका सुद्धा उडालेला नाहीये"

" तुला नक्की काय म्हणायचेय"?

" या मूर्ती नाहीतच असे म्हणायचेय मला"

" मग काय आहे?" उत्कंठेने कळस गाठला.

" या ममीज असाव्यात म्हणजे हे ते दोघेच असावेत प्रत्यक्षांत"

" ते कसे शक्य आहे? ते दोघे तर युद्धात मारले गेले असे म्हणतात"

" तुला पौराणिक युद्धे कशी व्हायची हे माहीत आहे ना?"

"अर्थात, शस्त्र आणि अस्त्र यांनीच"

" तू कधी स्पर्शास्त्राचे नाव किंवा वर्णन ऐकलेस का?"

" हो, त्याने माणूस एका जागी स्तब्ध होत असे, म्हणजे तुला म्हणायचेय की ..............."

"होय या दोघांवर त्याच अस्त्राचा प्रयोग झाला असावा"

"ते कसे शक्य आहे? तसे असते तर कुणीतरी त्यांना त्यातून मुक्त केले असतेच ना !"

"
शक्यता कमी आहे कारण हे अस्त्र फक्त एकाच गटाकडे होते याची तोड
दुसर्‍याकडे असणे शक्य नाही, पुढे त्यांचा प्रसार झाला तेव्हा ते इतरांना
माहीत झाले"

" बाप रे ! म्हणजे ते इतकी वर्षे त्याच स्थितीत गोठलेले आहेत?"

"शक्य आहे तू लिहिलायस तो कालखंड पाहता त्याकाळी असे होणे शक्य आहे"

"मग त्यांच्या मारल्या गेल्याची माहिती चुकीची आहे की काय? दंतकथेत नंतर पडलेली भर?"

"तो तुझा प्रांत आहे, मला फक्त पौराणिक अस्त्रामध्ये माहिती आहे"

" मग त्यांच्या शक्ती अजून काम करत असतील का?"

" का नाही ? शेवटी शरीर गोठले तरी मन कार्यरत राहणारच ना?"

"बाप रे ! म्हणजे त्यांच्या आशीर्वादाबद्दलही खरेच असणार"

"असू शकतील, बरं ते राहू दे आता जरा चहा कॉफी काही देणार आहेस की........."

" सॉरी यार, विसरलोच होतो"

मी नोकराला हाक मारून चहा आणायला सांगितला.

" पण त्यांच्यात असे काय आहे की तिथले गावकरी तिकडे जायलाही घाबरतात? मला तरी तसे काही दिसले नाही"

" पण काही कारण असल्या खेरीज गावातली ही रांगडी माणसे अशी घाबरणार नाहीत हे खरे" त्याचा मानवी स्वभावाचा अभ्यास जबरदस्त होता.

"मग फक्त आशीर्वाद देणे या खेरीज तिथे काहीच घडायची शक्यता नाही, आणि तो नाही मागितला तर मग तो चुकायची भितीच नाही ना ! "

" असे आपण म्हणतो पण देवळात गेलास की देवासमोर तू काहीही न मागता किंवा अपेक्षा न ठेवता तू उभा राहू शकतोस का रे ?"

" बाप रे ! म्हणजे आपल्या मनातलं सुद्धा तिथे ओळखले जात असावे?........."

"शक्य
आहे, या गावातल्या माणसांना एखाद्या गोष्टीबद्दल काही वाईट शंका आली तर
ते सरळ ती गोष्ट किंवा ती जागा टाळतात त्या मागची कारणमीमांसा शोधत बसत
नाहीत तो त्यांच्या स्वभावाचाच एक भाग आहे"

"म्हणजे ते म्हणतात त्यात तथ्य असावं ! "

"शक्य आहे....."

इतक्यात चहा आला आणि बोलण्यात खंड पडला, त्या नंतर गप्पा सुरू झाल्या पण विषय वेगळे होते.

बर्‍याच
गप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या आणि माझा तो मित्र तासाभराने जायला
निघाला. मी ही त्याला दारापर्यंत सोडला, आपल्या टू व्हीलरवर बसता बसता
त्याने विचारले

" आणि काय रे ? तू त्या लेखाच्या शेवटी काळ्या मांजराचा फोटो लावलायस तो काढून टाक, शोभत नाही तिथे."

माझी जणू दातखीळ बसली मी काही बोलू शकायच्या आत तो गाडी चालू करून निघूनही गेला.

कालच
मी त्या मित्राला हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटून आलोय म्हणजे मी कालापासून खरंतर
तिथेच होतो. मला भेटून निघाल्या नंतर पुढच्याच वळणावर एका वाळूच्या ट्रक
मधून सांडलेल्या वाळूवरून त्याची गाडी घसरली आणि त्यात त्याच्या शरीराच्या
डाव्या बाजूला जबरदस्त मार बसला. डाव्या गुढघ्याची वाटी सरकल्याने त्यावर
शस्त्रक्रिया करावी लागली. त्या खेरीज डाव्या हाताची कातडी पार सोलल्या
गेलीये त्यामुळे कमीत कमी पंधरा दिवस तरी तो जायबंदी झालाय.

मला
अजूनही त्या लेखावरच्या मला न दिसणाऱ्या फोटोचे रहस्य उलगडले नाहीये, मला तो
का दिसत नाही बाकीच्यांना का दिसत असावा? बरं ज्यांना दिसतो त्यांच्या
बाबतीत अश्या घटना का घडाव्यात? हा त्या मूर्तीसमोर मनात आलेल्या
विचारांना गफलतीने मिळालेला आशीर्वाद तर नसेल? मग तो कुणी दिला असावा?
शषाल की शेषाल ? बरेच प्रश्न मला शांत बसू देत नाहीयेत म्हणून आता शेवटचा
मार्ग म्हणून मी सगळा लेख जसाच्या तसा इथे इंटरनेटवर प्रसिद्ध करतोय.
कदाचित इथे तरी काही लोक वाचतील कदाचित त्यामुळे माझ्या या विचित्र
अनुभवाला वाचा फुटेल. आणि इंटरनेट वर असल्यामुळे कागदाचा प्रश्न नाही
म्हणजे त्या मला न दिसणाऱ्या फोटोचा प्रश्नच नाही, आणि तो दिसल्यामुळे जे
अपघात होतायत त्यांपासूनही बाकीच्यांना सुटका मिळेल. एकूणच हे माध्यम फारच
चांगले पडेल निदान या लेखासाठी तरी...... नाही का ?

images.jpg