गफलत (भाग २)

आदित्य, माझा खास मित्र, सध्या काहीतरी सैरभैर झाल्यासारखे वागतो. एकदम
नक्की सांगायचं झालं तर तो त्या 'झांबीडी' नावाच्या गावाला जाऊन
आल्यानंतरच. त्याच्या लेखाला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे असू शकेल
कदाचित. आणि तसं असेल तर त्यात अशक्य असं काही नाही कारण आपल्या लेखाच्या
प्रसिद्धीसाठी कुठे कुठे फिरला हा माणूस.... पण त्याला योग्य न्याय
मिळाला नाहीच.
त्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो तेव्हाच त्याची अवस्था पाहून मला वाईट
वाटले. खरोखर उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेखन असते त्याचे अर्थात त्याची
मेहनतही तितकीच असते त्या मागे. एकेका दंतकथेचा मागोवा घेत त्याचे
सध्याचे भौगोलिक ठिकाण शोधत त्यातली सूक्ष्मशाने असलेली तथ्ये शोधत फिरणे
म्हणजे नक्कीच दमवणारे काम आहे. पण तो ते आवडीने करतो तरीही त्याच्या
मागचे दुर्दैवाचे शुक्लकाष्ठ काही सुटत नाही.
आता त्या शषाल आणि शेषालच्या दंतकथेबद्दलच घ्या ना ! इतक्या दूर नीलगिरी
पर्यंत जाऊन या माणसाने त्या दंतकथेची शहानिशा केली आणि त्याच्या नशिबी
काय तर भुक्कड अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो म्हणून उपेक्षा, अर्थात
त्यानेही तो काळ्या मांजराच्या फोटोचा स्टंट करायला नको होता म्हणा ! पण
अतिरिक्त ताण पडल्याने असे झालेही असेल.
त्या दिवशी.......... दिवशी कसला रात्री, मी त्याच्याकडे गेलो तेव्हा मला
जे जाणवले ते मी मोकळेपणे त्याला सांगून टाकले खरे पण मलाही आता त्या
प्रकारात रस वाटायला लागलाय. जर त्याच्या घरुन जाताना मला अपघात झाला
नसता तर एव्हाना मी त्या झांबीडीत पोहोचलोही असतो. आता रस्त्यावर गाडी
घसरून अपघात होत नाहीत का कधी ? पण त्या मागेही या माणसाने त्याचे अजब
तर्कट लावले. म्हणे त्या काळ्या मांजराच्या फोटोमुळे हे घडले !
असो तो काही खास मुद्दा नाही पण एकंदरीत आता बरा झालोयच तर त्या झांबीडी
गावाला एक भेट द्यावी असे म्हणतोय ! त्या मूर्ती म्हणजे खरोखर ममीज आहेत
की नुसती फोटोग्राफिक ट्रिक ते तरी पाहायलाच हवं ! एकूणच पुराणातली
शस्त्र आणि अस्त्र हा माझा अभ्यासाचा खास विषय असल्यामुळे जर खरोखर त्या
ममीज पाहता आल्या तर अनुभवात एक नवीन भर पडेल हे नक्की.
हेच ते झांबीडी तर ! आदित्य म्हणाला होता तसंच किचकट गाव दिसतंय खरं. आता
उन्हं कलायला लागलीत त्यामुळे बाकी सगळं सकाळी पाहू, म्हणजे गावं नाही
बरं का ! गाव तर एका नजरेतच आख्खं दिसतंय इतकं लहान आहे. बरोबर टेंट
आणलाय ते एका अर्थी बरं आहे नाहीतर या गावात राहण्याची सोय होण्याची
शक्यता नाहीच. आणि बाहेर राहायचं तर थंडीने गोठून जायची वेळ येईल.
थंडीमुळे असेल पण लवकर जाग आली आणि सूर्य उगवण्याच्या आतच मी टकटकीत जागा
झालो. सकाळची सगळी आह्निकं गावाबाहेरून वहाणार्‍या एकमेव नदीवर आवरून
आता मी त्या मूर्तीकडे जायला तयार आहे. रस्ता अर्थातच एखाद्या
गावकर्‍याला विचारावा लागेल, पण ठीक आहे. तितकी मदत हे गावकरी नक्की
करतील याचा अनुभव आदित्यनेही घेतलाच आहे. मला आता लवकरात लवकर तिथे
पोहोचायचेयच.
सापडले एकदाचे ते मंदिर. ‘इथे जवळच’ म्हणता म्हणता तीन चार मैल चालायला
मात्र लागले, गावातल्या माणसांची सांगण्याची अंतरे नेहमीच फसवी असतात.
आपल्याकडे नाही का ! हाकेच्या अंतरावरची ठिकाणे एखाद मैलावर असतात तसाच
प्रकार. पण इथले दृश्य पाहण्यासारखे नक्कीच आहे. चारही बाजूच्या लहान
लहान टेकड्या आणि मध्येच वाटीसारख्या आकाराचं हे मोकळं पटांगण. याबद्दल
काही बोलला नाही आदित्य ! अर्थात तो इथल्या निसर्गाचा आनंद घ्यायच्या मूड
मध्ये नसणारच. आणि त्या पटांगणाच्या मधोमध लहानश्या घुमटीखाली असलेल्या
त्या जुळ्या मूर्ती सध्यातरी मूर्तीच म्हणतो जर मला वाटतंय तश्या ममीज
असल्या तर पुढची गोष्ट.
माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी आजूबाजूच्या परिस्थितीकडे आणि
अवशेषाकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली. कधी कधी एखादी लहानशी गोष्ट
आपल्या नजरेतून सुटते आणि कदाचित तीच महत्त्वाची असू शकते. त्या
घुमटीच्या भोवती एक चक्कर मारल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने माझ्या लक्षात
आली ती म्हणजे घुमटीची अवस्था फार वाईट होती. जागोजाग ढासळलेल्या
बांधकामाचे अवशेष पसरलेले होते. पण लक्षणीय गोष्ट म्हणजे दोन्ही मूर्ती
जाणू आत्ताच कोरल्याप्रमाणे व्यवस्थित होत्या. आदित्यने घेतलेल्या
फ़ोटोग्राफ़मधे खरोखर काही ट्रिक नव्हती. मूर्ती खरोखर अगदी प्रमाणबद्ध
आकारात आणि रेखीव दिसत होत्या. जाणू आत्ता डोळे उघडतील. माझ्या मनातल्या
स्पर्शास्त्राच्या संकल्पनेने पुन्हा उचल खाल्ली. आता यांच्या
प्रतापाबद्दल मला माहीत असल्यामुळे मी मन शक्य तितके कोरे ठेवण्याचा
प्रयत्न करत राहिलो. मूर्तीचे निरीक्षण संपवल्यावर जरा थकल्यासारखे
वाटले, कुठेतरी जरा विसावा घ्यावा म्हणून आजूबाजूला नजर फिरवली. मोकळ्या
पटांगणाच्या बाजूला दिसलेल्या एकमेव झाडाखाली विसावण्यायोग्य जागा दिसली
मग तिथेच सोबत आणलेली फ़ोल्डींग चटई अंथरून मी विसावलो.
बरोबर सकाळीच तयार करून आणलेल्या चहाचा थर्मास होताच आणि अश्या अडचणीच्या
जागी जाताना मी नेहमी नेत असलेले डबाबंद खाद्यपदार्थही. त्यांचा यथेच्छ
समाचार घेऊन मी एक सिगारेट शिलगावली. धुराची वलये हवेत सोडतानाच मी
आदित्यच्या लेखात वाचलेल्या दंतकथेबद्दल विचार करत होतो. खरोखर त्यात
तथ्य असेल? खरोखर त्या मूर्ती आपल्या मनातली इच्छा पूर्णं करत असतील? आता
याची परीक्षा घ्यायची म्हणजे काहीतरी मागणे आले आणि जर आदित्य म्हणतो
तसे घडत असेल तर ? उगीच विषाची परीक्षा नकोच.
सिगरेट आणि आराम संपवून पुन्हा मूर्तीचे विश्लेषण करायलाच हवे होतेच.
पुन्हा एकदा मूर्तींच्या सहवासात जायच्या कल्पनेने का कुणास ठाऊक अंगावर
शहारा आला.
यथावकाश माझ्या सगळ्या कसोट्या लावून मी दोन्ही मूर्ती तपासल्या. त्या
कसोट्यांबद्दल मी अर्थातच सांगणार नाही, कारण शेवटी ते माझे स्वत:चे गुपित
आहे. पण आता माझी पूर्णं खात्री झालीये की या मूर्ती नाहीतच. आदित्यच्या
दंतकथेत नक्कीच तथ्य आहे या दोघांवर स्पर्शास्त्राचा प्रयोग झाला असावा.
या ममीजच आहेत हे आता नक्की झालंय.
पुरातन काळात आर्य आणि द्रवीड अश्या दोन परस्पर विरोधी संस्कृती
अस्तित्वात होत्या. त्यांच्यात कायम युद्धं होत असत, त्यातल्या आर्य
संस्कृतीकडे अश्या स्पर्शास्त्र, वातास्त्र, वाताकर्षणास्त्र अश्या अनेक
अस्त्रांची माहिती होती. त्या मुळे ते जवळपास अजिंक्य होते. या अश्या
बलाढ्य आर्य संस्कृतीशी लढताना हे दोघे स्पर्शास्त्राला बळी पडले असावेत.
स्पर्शास्त्राचा उपयोग शत्रूला पुतळ्याप्रमाणे एकाच जागी खिळवुन
ठेवण्यासाठी होत असे. यासाठी कदाचित गुरुत्वाकर्षणावर काही प्रक्रिया
करून ते अफाट वाढवल्या जात असावे. या अस्त्राला बळी पडलेली व्यक्ती
गोठल्याप्रमाणे एकाच ठिकाणी अडकत असे. यातून सोडवणे फक्त त्यातल्या
जाणकारांनाच शक्य होते आणि ते ज्ञान द्रवीड संस्कृतीकडे नक्कीच नव्हते.
पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांनी चिरंजीवित्व मात्र प्राप्त केले
असावे.
त्या ममीज समोर उभे राहून मी माझ्याच विचारात गुंतत चाललो होतो. आज
मानवाने केलेली प्रगती, अणुशक्ती, नॅनो टेक्नॉलॉजी या त्या काळात किती
पूर्णत्वाला नेल्या गेल्या होत्या याचे हे धडधडीत उदाहरण होते. ‘ जर काही
करून मला या दोघांना या स्पर्शास्त्राच्या अंमलातुन सोडवता आले तर?’
मनात क्षणभर विचार चमकून गेला. तसे झाले तर कदाचित ज्ञानाचे एखादे
भांडारंच आपल्या समोर उघडल्या जाईल...... विचारांच्या तंद्रीत गुरफटलेलो
असतानाच अचानक बाजूच्या रानातून घुबडाचा घुत्कार ऐकू आला. आणि मी भानावर
आलो. दिवसाढवळ्या घुबड घुत्कारले? मनात अशुभ विचार आल्याशिवाय राहिले
नाहीत. आणि त्याच वेळी माझी नजर समोर गेली.........आणि मी दचकलोच, मी
अजूनही त्याच ममीजच्या समोर उभा होतो. जर आदित्यने मांडलेले विचार बरोबर
असतील तर? माझ्याकडून नकळत का होईना एक मागणे मागितल्या गेले होते. जर ते
‘त्यांनी ऐकले असेल तर?’......... ऐकले असेल तर आणि जर ते पूर्णं
होण्याचा आशीर्वाद दिलाही असेल तर मी काही वावगं मागितलं नव्हतं, खरोखर
जर त्या दोघांना मी यातून सोडवू शकलो तर नक्कीच अशी काही माहिती
मिळण्याची शक्यता होतीच की ज्यासमोर आजचे विज्ञान तीळमात्र वाटेल.
इतका वेळ उन्हात उभं राहिल्यामुळे असेल किंवा आणखी कशाने असेल पण मला जरा
भोवंडल्यासारखे झाले म्हणून मी पुन्हा त्या मघाच्याच झाडाचा आसरा
घेतला...... जरावेळ शांतपणे डोळे मिटून बसल्यामुळे थोडी तरतरी आली. आणि
मनात पुन्हा विचार गर्दी करायला लागले. खरोखर असे आशीर्वाद वगैरे काही
शक्य आहे का? की केवळ काही योगायोग आणि गैरसमजाची मालिका असावी ती?
विचारांच्या नादात आजूबाजूला असलेल्या खड्यांमधले खडे उचलून मी इकडे
तिकडे फेकत होतो. कारण काही नाही फक्त हाताला एक चाळा म्हणून बस्स. असच
एक खडा उजव्या हाताला उडवला आणि खण्णकन आवाज आला. खड्याचा असा आवाज?? मी
पुन्हा खडा तिकडेच फेकला फक्त या वेळी माझे लक्ष त्याच्याकडे होते, खडा
उजव्या बाजूला असलेल्या एका दीड-दोन फूट उंचीच्या दगडाच्या एका चौकोनी
स्तंभावर आदळला होता. हो स्तंभच ! कारण एकाच दगडात घडवलेला नव्हताच तो,
लहान लहान आयताकार दगडांची संरचना होती ती. अर्थात तसेही असले तरी दगडावर
दगड आपटल्याने लोखंडावर आपटल्यासारखा खणखणाट नक्की होत नाही. आता मला
उत्सुकता शांत बसू देईना ! मनातले सगळे विचार विसरून मी त्या स्तंभाकडे
धावलो.
सहजासहजी नजर पडेल अशी जागा नव्हतीच ती आजूबाजूच्या लहान-मोठ्या
दगडामध्ये तो स्तंभ वेगळा असा उठून नक्कीच दिसत नव्हता पण जवळून पाहताना
लक्षात येत होते की तो बनवण्यासाठी किती मेहनत घेतल्या गेली असेल. एकाच
मापाच्या दगडी विटा कोणत्याही तिसर्‍या पदार्थाशिवाय एका रचनेत बसवणे
सोपे काम नक्कीच नाही. पण मला त्या कलाकृतीपेक्षा महत्त्वाचे होते
मघाच्या आवाजाचे उगमस्थान शोधणे......
फार शोधाशोध करावी लागलीच नाही. त्याच स्तंभाच्या एकाच बाजूला एक धातूचे
गोलाकार कडे होते, जुन्या किल्ल्यांच्या, देवळांच्या बांधकामात अश्या
कड्या दिसतात घोडे बांधायला त्यांचा वापर करत असावेत. पण अश्या वस्तूची
या ठिकाणी मी मुळीच अपेक्षा केली नव्हती, कारण त्या काळात केवळ आर्यच
घोड्यांचा वापर करत होते द्रविड नाही. द्रविडांचे वाहन म्हणजे ‘बैल’
त्यासाठी असल्या कड्यांचा वापर होणे शक्य नाही. म्हणजे हा स्तंभ आर्यांचा
तर......... ?
मनात विचार चालू असतानाच एकीकडे माझे निरीक्षणही चालूच होते. त्या
कडीवरची सध्या दिसत असलेली कलाकुसर नक्कीच द्रवीड संस्कृतीची नव्हती. मी
सहजच त्या कडीला हात लावला. अंगातून एक अनामिक शिराशिरी निघून
गेल्यासारखे वाटले. कडी ओढून पाहण्याचा प्रयत्न केला पण ती दगडात पक्की
बसलेली दिसत होती. मग त्या कडीचे बारकाईने निरीक्षण करत राहिलो, ती कडी
इकडे तिकडे हालवताना माझ्या हातून नक्की काय झाले ते मलाही कळले नाही. पण
अचानक जमिनीखालून काही घरघराट ऐकू यायला लागला. दचकून मी बाजूला झालो
आणि पाहता पाहता समोरच्या स्तंभाचे चारही भाग एखाद्या कमळाच्या
पाकळ्यांप्रमाणे उलगडून बाजूला झाले.
एक क्षणभर माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, समोर उलगडलेल्या
स्तंभाच्या गाभ्यातून खाली उतरत जाणार्‍या पायर्‍या स्पष्ट दिसत होत्या.
जाणू एका नव्या विश्वाचे दार माझ्यासाठी उघडले गेले होते..... खाली
उतरावे की नाही या असल्या विचारांसाठी माझ्याकडे वेळ अजिबात नव्हता,
सॅकमधला चार सेलचा मोठा टॉर्च उचलून मी पायर्‍या उतरायला सुरुवात केली.
एक एक पाऊल जपून टाकत पायर्‍या उतराव्या लागत होत्या कारण या असल्या
ठिकाणी छुपे सापळे असण्याची दाट शक्यता असते, आणि ते नक्की कसे कार्यरत
होतील याचाही भरवसा नसतो. एखाद्या क्षणी पायाखालची पायरी सरकून तुम्ही
अंतहीन विवरात कोसळू शकता किंवा कुठल्याश्या कोपर्‍यातुन एखादा विषारी शर
तुमच्या शरीरात शिरून तुम्हाला कायमचा झोपवू शकतो..... सुदैवाने यातले
काही झाले नाही आणि मी शेवटची पायरी उतरून सपाट जमिनीवर आलो. स्पर्शावरून
तरी जमीन फरसबंद असावी असे वाटत होते पण इतक्या दाट काळोखात चार सेलचा
दणदणीत टॉर्च देखील मिणमिणता वाटतो आणि त्याचा एकमेव किरण जमिनीकडे
फिरवून मला समोरच्या बाजूला दुर्लक्ष करायचे नव्हते.
एक एक पाऊल जपून टाकताना नकळत एक हलकासा खटका दाबल्यासारखा आवाज झाला,
एखाद्या गुप्त कळीवर पाय पडल्याने ती कार्यरत झाली असावी. कल्पनेनेच
अंगातले रक्त गोठले, मी शक्य तितक्या त्वरेने जमिनीवर लोळण घेतली. पण मला
वाटले तसे काहीच घडले नाही पण दूर एका टोकाकडून पुढे सरकणार्‍या एका
अंधुक प्रकाशाने माझे लक्ष वेधले. पाहता पाहता त्या प्रकाशाने
माझ्यापर्यंतचे अंतर पार केले आणि आजूबाजूचा गडद अंधारा भाग उजेडाच्या
टप्प्यात यायला लागला एव्हाना प्रकाशाची तीव्रताही वाढली आणि लख्ख सोनेरी
प्रकाशाने आजूबाजूचा परिसर उजळला.
मला आधी वाटलं होतं तशी ती लहानशी जागा नव्हतीच. एक भलाथोरला प्रशस्त हॉल
होता तो. आता टॉर्चची काही गरज नसल्याने तो बंद करून मी एका बाजूला
ठेवून दिला आणि कुतूहलाने आजूबाजूचे निरीक्षण चालू केले. मघाशी मला
जाणवल्या प्रमाणे जमीन फरसबंद होतीच पण छतही एकदम कोरीव होते. जमिनीपासून
छताला आधार देणारे खांब गोलाकार आणि नक्षीदार दिसत होते. पण या पेक्षा
जास्त लक्ष वेधणारी समोरची भिंत होती. तिथे एक कोरीव मूर्ती आपल्या शांत
नजरेने माझ्याकडे पाहतं होती. जरी शांत म्हणत असलो तरी त्या नजरेत एक
विलक्षण जरब होती. त्याच मूर्तीच्या समोर, पायाशी ओळीने मांडलेल्या
भूर्जपत्रांच्या चळती दिसत होत्या. मनोमन समोरच्या मूर्तीला नमस्कार करत
मी त्या भूर्जपत्राकडे झेपावलो.
भूर्जपत्रावरच्या मजकुराकडे आता माझे मन ओढ घेत होते. अश्या
भूर्जपत्रांना फार सांभाळून हाताळावे लागते. एकतर ती फार जीर्ण असतात आणि
कधी कधी त्यांना एका खास वातावरणात ठेवले जाते. आपल्या नेहमीच्या
वातावरणात येताच त्यावरची शाई आपोआप उडून जाते. आणि माझी कोणताही धोका
पत्करायची तयारी नव्हती. मी सरळ तिथेच बसकण मारून ती चाळायला सुरुवात
केली.
भूर्जपत्रांतली भाषा संस्कृतच होती, हे एका अर्थी बरे होते, दुसरी कुठली
पौराणिक भाषा असती तर मला वाचायला कदाचित वेळ लागला असता पण संस्कृत
म्हणजे मला आपल्या मातृभाषेसारखी आहे. त्यामुळे वाचताना काहीच त्रास वाटत
नव्हता. पण त्यातला मजकूर म्हणजे पानागणिक माझ्यासाठी बाँबशेल ठरत होता.
बापरे ! पंचतत्त्वांवर आधारित त्यांची शास्त्र आणि शस्त्रप्रणाली म्हणजे
खरोखर वेड लावणारा प्रकार होता. अणूची संरचना त्यांचे विभाजन या गोष्टी
म्हणजे त्यांच्यासाठी पोरखेळ असावा. होय ! मी नक्कीच एका आर्यदालनात
होतो, त्यांच्या खेरीज इतके प्रगत शास्त्र कुणाचेच नव्हते.
अस्त्रप्रणालीची माहिती असलेला भाग जेव्हा समोर आला तेंव्हामात्र मी
त्यातला शब्द न शब्द मन लावून वाचायला सुरुवात केली. यातही
शब्दसामर्थ्याने पंचतत्त्वांवर ठेवला जाणारा ताबा हेच महत्त्वाचे तत्त्व,
एक उदाहरणच द्यायचे तर एखाद्या ठराविक ठिकाणातला ऑक्सिजन शोषून घेणे हे
वाताकर्षण अस्त्राचे कार्य. त्यासाठी त्यांनी नक्की कोणते उपाय वापरले ते
बहुदा त्यांचे काही कोडवर्ड असावेत कारण त्यांचा अर्थ लागत नाही. पण
आजच्या युगात असे करण्यासाठी किती उपद्व्याप करावे लागतात?
स्पर्शास्त्रासाठी त्यांनी वापरलेले तंत्र म्हणजे शत्रूच्या शरीराजवळच्या
भूभागाचे गुरुत्वाकर्षण प्रचंड प्रमाणावर वाढवणे, यामुळे शत्रूचे वस्तुमान
प्रचंड प्रमाणात वाढून त्याचे चलनवलन बंद पडले नसते तरच नवल !
योगायोगाने (?) स्पर्शास्त्राचा उपाय इथे लिहिलेला सापडला. त्या
भूर्जपत्राकडे पाहतं असताना अंगावरून उगीचच शहारा येऊन गेला. सगळ्या
चित्तवृत्ती सैरभैर व्हायला लागल्या. मनातल्या मनात देवाचे नाव घ्यायचा
प्रयत्न करून पाहिला पण मनाची उलाघाल जरा जास्तच असावी, चित्त स्थिर
होईना !
शेवटी मनातला उरला सुरला धीर एकत्र करून मी त्या मंत्राचा उच्चार केला.
आता यातली किचकट व्यंजने, स्वर यांची मला काहीच कल्पना नव्हती पण न जाणे
कसे काय ते, पण मला मुखोद्गत असल्यासारखा तो मंत्र मला वाचता आला. मी
पुन्हा पुन्हा म्हणून पाहिला पण मनात असूनही मी त्याच्या उच्चारात फरक
करू शकलो नाही..... कदाचित यापुढेही काही अस्त्रांवरचे उपाय असू शकतील या
अपेक्षेने मी पुढे वाचायला सुरुवात केली. पण त्या पुढच्या पानापासून
फक्त आर्य संस्कृतीचा इतिहास या पलीकडे काही नवीन नव्हते. नाईलाजास्तव मी
दुसरे बाड उघडले.
यात मात्र सगळीच तंत्रज्ञानावरची माहिती भरलेली दिसत होती. बहुदा एखाद्या
भौतिकशास्त्राच्या किंवा पदार्थविज्ञानशास्त्रातल्या जाणकारालाच
त्याबद्दल अधिक कळू शकेल म्हणून मी ते बाड सरळ उचलून माझ्या शर्टाच्या आत
कोंबले. आता एक शेवटचे........ बाड नाही म्हणता येणार, कारण त्याची
कातडी बांधणी मुळीच पोथीसारखी वाटत नव्हती. त्याला पुस्तकच म्हणावे
लागेल. पण एव्हाना आजूबाजूचा प्रकाश मंदावला होता आणि टॉर्चची मला परतीचा
रस्ता सापडण्यासाठी गरज होती त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता मी तेही
पुस्तक उचलले आणि परतीचा रस्ता धरला.
वर जाण्याच्या शेवटच्या पायरीवर असतानाच मी तो आवाज ऐकला..... एखादा
लाव्हारस उकळत असावा त्या प्रमाणे, मनात कुशंका दाटल्या शिवाय राहिलीच
नाही. झपाझप पावले उचलत मी एकदाचा शेवटच्या पायरीवर पोहोचलो. आता मात्र
पायाखालची पायरी हालत असल्याची स्पष्ट जाणीव झाली. शेवटची पायरी ओलांडली
मात्र, भूकंप झाल्यासारखी जमीन थरथरायला लागली. मी शक्य तितक्या वेगाने
तिथून दूर झालो. आणि................ माझ्या डोळ्यादेखत मघा उलगडलेला तो
स्तंभ जमिनीच्या पोटात गडप व्हायला लागला. सुन्न मनाने मी समोर पाहतं
राहिलो. मी आत शिरत असताना ज्या बद्दल सतत सावध राहिलो होतो तो छुपा
सापळा हा होता तर ! कदाचित परक्याच्या हाती आर्यांचे ज्ञान भंडार
लागल्यामुळे त्यांचे ते दालन नष्ट केल्या गेल्या असावे. आता पुन्हा तिथे
जाणे शक्य होणार नव्हते हे मात्र नक्की.
सूर्याची किरणे डोळ्यावर पडल्याने मी भानावर आलो. दिवस मावळायला लागला
होता. मला माझ्या गावातल्या तंबूकडे परतणे भाग होते. मी शक्य तितक्या
लवकर माझे सामान आवरले सॅक उचलली आणि परत निघालो........... अं हं !
काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते, पण नक्की काय ते मात्र जाणवत नव्हते.
मनातले विचार दूर सारत परतीचा मार्ग धरला. जाता जाता त्या ममीज कडे एक
नजर टाकावी म्हणून मी त्या बाजूला गेलो आणि ............... समोरच्या
ढासळलेल्या, उजाड रिकाम्या घुमटीकडे पाहतंच राहिलो. त्या ममीज गायब
होत्या....
एखाद्या विजेच्या उघड्या तारेला हात लागावा त्या प्रमाणे सर्वांगातून
झिणझिण्या आल्या. वर्षानुवर्ष या ठिकाणी असलेल्या त्या ममीज अचानक कुठे
गेल्या?
पायातले त्राण निघून गेल्याप्रमाणे मी जमिनीवरच बसकण मांडली.
किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण मला विचारांच्या गरदोळातुन बाहेर यायला
बराच वेळ लागला असावा. आजूबाजूला बरेच अंधारून आले होते. तरी माझ्या
मनातल्या प्रश्नाला उत्तर सापडले नव्हते. त्या ममीज गेल्या
कुठे?.............. काही वेळ असेच उलटसुलट विचारांचे प्रवाह डोक्यात
चालू राहिले आणि अचानक........ अचानक मला आठवले, मी मघाशी त्या दालनात
स्पर्शास्त्राच्या उपायाचा मंत्र उच्चारला होता. एकदा नव्हे पुन्हा
पुन्हा, कदाचित त्या मंत्राची काही ठरावीक आवर्तने व्हायला हवी होती
त्यामुळेच मला तसे करायची इच्छा झाली असावी. मग त्या काळापुरते माझे मन
माझ्या ताब्यात नव्हते की काय....? प्रश्न डोक्याच्या प्रत्येक पेशीला
झटका देत गेला. खरंच असं झालं असेल..?
विचारांच्या नादात मी गावाच्या दिशेने पाऊल उचलले. आणि दुसरा धक्का माझी
वाट पाहतं असावा. मघा ज्या टेकड्यांनी ही जागा वेढलेली होती त्या
टेकड्या...... ! त्या..... त्या जागेवर नव्हत्या. आता मात्र माझा धीर
सुटला शक्य तितक्या वेगाने मी गावाकडे निघालो.
माझ्या टेंट मध्ये पोहोचल्यावर पहिल्यांदा चेहर्‍यावर पाण्याचे हबके
मारले, मनात वेडी आशा होती कदाचित हे स्वप्न असावे ! पण परिस्थितीत काहीच
फरक पडला नाही. आता डोके शांत ठेवून यामागची कारणमीमांसा शोधायला हवी
होती.
नक्की काय घडले असावे या विचारात गढलेला असतानाच मला मी आणलेल्या त्या
भूर्जपत्रांच्या बाडाची आणि त्या कातडी आवरणातल्या पुस्तकाची आठवण झाली.
धडपडत मी सॅककडे धावलो, सॅक उघडण्याच्या भानगडीत न पडता मी सरळ सॅक उपडी
केली. आणि खाली पडलेल्या त्या दोन्ही वस्तूंकडे झेपावलो.
भूर्जपत्रावरचे आवरणं अक्षरश: ओरबाडून काढले. मघाच्या प्रकाराचे गूढ
उलगडले तर कदाचित यातूनच उलगडू शकणार होते. प्रचंड अपेक्षेने मी त्याचे
पान उलगडले आणि तिसरा धक्का मला हालवून गेला, पान कोरे होते. पटापट मी
पुढची पाने उलगडली सगळीच पाने कोरीच. बापरे ! म्हणजे ही खास पुरातन
काळातली खास प्रक्रिया केलेली पाने होती तर ! आता काही सापडणे पूर्णं
अशक्य होते. निराश मनाने मी डोक्याला हात लावून बसलो.... इतक्यात मघाच्या
त्या पुस्तकाची आठवण झाली......
जरा साशंकतेनेच मी ते पुस्तक उघडले पान कोरे असणार ही अपेक्षा ठेवूनच.... !
माझा अंदाज फारसा चुकला नाही, पण अगदी बरोबर मात्र नव्हता. पुस्तक कोरेच
होते मात्र त्याच्या पाहिल्याच पानात एक कागदासारखे दिसणार्‍या
पदार्थाचेच पान ठेवलेले होते, म्हणजे आपण वाचन अर्धवट ठेवताना जशी
वाचनखूण ठेवतो ना ! तसे. त्यावर लिहिलेल्या मजकुराचा लावलेला अर्थ असा,
‘ द्रवीड संस्कृतीच्या शेवटाला कारण ठरलेली एकमेव गोष्ट म्हणजे त्यांनी
दुष्ट अतीमानवी शक्तींचा वापर सुरू केला. याला मायाजाल म्हटले जात असे.
यात माणसाच्या सुप्तमनावर ताबा मिळवल्या जात असे. थोडक्यात माणसाचे मनच
त्याच्याविरुद्ध शस्त्र म्हणून वापरल्या जात होते. यातूनच त्यांनी काही
अमानवी प्रचंड आकारही तयार केले होते ( इथे मला मघा गायब झालेल्या
टेकड्यांची आठवण झाली ) शेवटी द्रवीडांच्या अतीमानवी शक्तींशी लढा द्यायला
आर्य उभे ठाकले. आणि त्यांच्या युद्धाचा परिणाम म्हणून बरेचसे द्रवीड
नष्ट झाले, आणि उरलेले कोणत्याना कोणत्या प्रकारे बंदिस्त झाले. पण.....
पण तरीही जाता जाता त्यांनी त्यांची अतीमानवी शक्ती एकत्रित करून त्यांना
एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, पण तो ही वेळीच लक्षात आल्याने
आर्य जाणकारांनी ती शक्ती बंधनात अडकवली. आणि ती शक्ती
म्हणजेच............... हे पुस्तक’
शेवटले विधान वाचताच माझ्या हातातले पुस्तक नकळत गळून पडले. कसे काय कोण
जाणे पण त्याचे पहिले पान उघडल्या गेले. त्यावरचा मजकूर चक्क देवनागरीत
दिसत होता, पण..... मघाशी तर हे पुस्तक कोरे होते ! आत्ता, हे कुणी
लिहिले?
धक्क्यातून सावरून घेत मी पुस्तक उचलले आणि वाचायला सुरुवात केली.
‘ आम्ही फार मोठा कालखंड याच क्षणाच्या प्रतीक्षेत घालवला आहे. आज आम्ही
मुक्त होत आहोत, आम्ही मुक्त होत आहोत, आमचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न
करणार्‍या प्रत्येक आर्यवंशीयाचा निर्वंश करण्यासाठी. आम्हाला हा आकार
टाकता येणार नाही याची आम्हाला फिकीर नाही. पण आम्ही तुमच्या मनाला पूर्णं
वाचू शकतो, आमच्या प्रत्येक प्रतिकृतीत म्हणजेच प्रत्येक पुस्तकात आम्ही
आमची शक्ती विखरून टाकू शकतो. प्रत्येक पुस्तकामार्फत तुमच्या मनावर ताबा
मिळवू शकतो. आज तुम्हाला वाचवण्यासाठी तुमचे ते श्रेष्ठ आर्यही नाहीत.
आता आम्ही अजिंक्य आहोत, अमर्याद आहोत’
शक्तिपात झाल्यासारख्या अवस्थेत मी उभा राहिलो, हाता-पायातले त्राणच निघून गेले.
भोवंडलेल्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी बराच वेळ लागला. परिस्थितीची
जाणीव होताच मी ताबडतोब ते पुस्तक शोधायला सुरुवात केली. त्याला ताबडतोब
नष्ट करायला हवे होते नाहीतर त्या दुष्ट शक्तींनी जगातली सारीच पुस्तके
आपल्या अमलाखाली आणून सगळ्या जगावर सत्ता गाजवली असती. पण........
........... ते पुस्तक, पुस्तक सापडत नाहीये ! देवा रे ! वाचव आता, हे
पुस्तक आता किती पुस्तकांना भ्रष्ट करेल ते तुलाच ठाऊक.
वर्तमानपत्रात त्यानंतर काही काळाने पहिल्या पानावर आलेल्या बातमीचा भाग :
‘ बहुचर्चित पुराणवस्तु संशोधक ‘निषाद देवनार’ यांना शहरातल्या मानसोपचार
इस्पितळात दाखल केल्या गेले, कालचा संपूर्ण दिवस ते भ्रमिष्टावस्थेत
ठिकठिकाणच्या वाचनालयात जाऊन ‘पुस्तके वाचू नका, ते तुम्हाला नष्ट
करण्यासाठी टपले आहेत’ असा आरडाओरडा करत होते.
"निषाद देवनारच्या वेडेपणाचे हे रहस्य आहे तर !" हातातली निषादची डायरी खाली ठेवत ‘त्या’ने मनातले शब्द जरा जोरातच उच्चारले.
गंमतच आहे खरी असे पुस्तकांना झपाटायला पुस्तक म्हणजे माणूस आहे काय? या
पुरातत्ववाद्यांची डोकी तिरकीच चालतात हे बाकी खरे. याची खरी जागा तो
आत्ता आहे तीच बरोबर आहे.
मनातल्या विचारांची गंमत वाटून त्याच्या चेहर्‍यावर स्मित झळकले आणि डोके
झटकून टाकत त्याने निषादच्या सामानात सापडलेल्या पुस्तकाचे पान उघडले.