दिवाळ पहाट@सारसबाग, पुणे.

पहाट माझा दिवसातला सगळ्यात आवडता काळ. पहाट आवडायला प्रत्येकाची निराळी कारणं असतील पण मला पहाट आवडते कारण मला ती अगदी दुर्मिळ. चुकून कधीतरी लवकर जाग आली तर किंवा काही कामानिमित्तच लाभणारी...पण एकदा लाभली की कधी संपूच नये अशी वाटणारी. जरा सुजलेल्या..चिपळं आलेल्या डोळ्यांनी..सकाळी सकाळी पडलेली स्वप्न पुसटशी आठवत, स्वत:शीच हसत, तिचं ते शांत सौम्य रूप अनुभवताना येणारी मदहोशी दिवसभर पुरते. त्यातल्या त्यात दिवाळ पहाट म्हटली की मग काय.. सोने पे सुहागा...मणी-कांचन..., दुग्ध-शर्करा योग वगैरे वगैरेच..

दिवाळ पहाटेची उत्सुकताच एवढी होती की ३.१५ ला च जाग आली. अंघोळीला गरम पाणी ठेवताना आठवलं घरात एक उटण्याचं पाकीट पडलंय. म्हटलं ट्राय करूया..पण त्यावरील बेसनाच्या व डाळीच्या पिठाचं मिश्रण वगैरे करून त्याचा लेप तयार करावा विधी वाचून ते पाकीट मी होतं तिथेच ठेवून दिल..म्हणजे चप्पल-बुटांच्या जवळ. कारण घरात चांगल्या ठिकाणी ठेवलेली एखादी वस्तू ४-५ दिवसांहून अधिक त्याच जागेवर आढळल्यास ती आमच्या मित्र शीनोद्वारे टाकाऊ गृहीत धरून, कचरेवाल्याच्या हवाली करण्यात येते. (आईने आग्रह करून करून पाठवलेल्या दिवाळीच्या फराळापासून तर पाहुण्यांच्या टी-शर्टस पर्यंत अनेक गोष्टी आतापर्यंत याला बळी पडल्या आहेत..सॉक्स्..बनियन वगैरे गरीब लोकं तर रोजचेच जातात....म्हणूनच की काय आमचा सौरभ दर ३-४ दिवसांनी त्याच्या झोपण्याची जागा बदलत असतो). त्याउलट अशा ठिकाणी ठेवलेल्या वस्तू वर्षानुवर्षे तशाच राहतात. पुढल्या वर्षी आलीच कुणी लेप तयार करून देणारी तर.. (आणी हा विचार करत असतानाच माझ्या 'लग्न का करावं' या कारणांच्या लिस्ट मध्ये अजून एक कारण सामील झालं..) 

तयारी करून टू व्हीलरवर निघालो ते सरळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीजवळच थांबलो. असं काही ठरवलं नव्हतं पण सकाळच्या त्या पवित्र वातावरणात संपूर्ण फुलांनी सजविलेल्या, दिव्यांच्या प्रकाशात लख्ख उजळून निघालेल्या मंदिरातील रत्नजडित बप्पाचे दर्शन घेण्याचा मोह होणार नाही अशी व्यक्ती दुर्भाग्यशालीच म्हणावी. सकाळचे ४ वाजले होते, तेवढ्या पहाटे पांढरा शुभ्र सदरा, पायजमा व गांधी टोपी घालून, जणू दांडीयात्रेला निघाल्याच्या वेगात चालणार्‍या एका पुणेरी आजोबांना रस्ता विचारून मी सारसबागेला पोहचलो

गाडी पार्क केली आणि शिगेला पोहचलेल्या उत्साहात आत जायला लागलो तोच, सेहवाग बाद झाल्यावर भारतीय संघाचा रन रेट जसा मंदावतो तसा माझा वेग मंदावला. कारण होतं, मोरपंखी रंगाची स्लीवलेस कुर्ती, मरून कलरची ओढणी व सलवार घातलेली.... बांगड्या, नेकलेस, ब्रेसलेट इ. नी जणू लग्नाला आलेल्या थाटात सुसज्ज, एक सुंदर गोरीपान तरुणी.. हाताची घडी घातलेली (थंडीमुळे असेल कदाचित), एक पाय जरा वाकवून दुसर्‍या पायावर जागच्या जागेवर डोलत, मैत्रिणींसोबत गप्पात रंगलेली... पण कोण कोण तिच्याकडे चोरून बघतोय हे अचूक टिपत असलेली "ती" व तीच्या १७-१९ वयोगटांतील जवळ जवळ वरील वर्णनाप्रमाणेच सजलेल्या ४-५ मैत्रिणी घोळका करून बागेच्या फाटकाजवळच उभ्या होत्या

माझ्या अंतर्मनातून आवाज आला..अजूनही वेळ गेलेली नाही..माघारी फीर..प्रफुल ..घरी परत जा ....परत जा... 

माझ्या मनाची अस्वस्थता पण अगदी स्वाभाविकच होती कारण मी धाडसच तसं केलं होतं. त्या प्रेमी युगुलांनी, मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यांनी तुडुंब भरलेल्या सागरात एकटं येण्याचं धाडस.. येत्या ३-४ तासात अश्या कितीतरी 'ती' मला दिसणार होत्या..म्हणजे माझी अवस्था ब्यांकेतल्या क्याशीयर सारखी होणार होती. नोटांच्या ढीगार्‍यामध्ये बसून हवी ती नोट हव्या तितक्या वेळा मोजू तर शकतो पण कितीही बिकट परिस्थिती असली तरी एकही नोट खिशात घालता येत नाही. फक्त एवढंच नव्हे तर आत मला मुलींवर कमेंट्स पास करणारे. हुल्लडगिरि करणारे मित्रांचे घोळके, शेजार्‍यांना, नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यास अगदी आजी, आजोबांसोबत आलेली, उत्सुक कुटुंब भेटणार होती... आणि हे सगळं पाहताना मनात आठवणींचा एक महापूर येणार होता.. माझ्या मित्रांच्या, शेजार्‍यांच्या आणि नातेवाईकांच्या आठवणी....

पण मी बागेच्या मध्यावत असलेल्या गणरायाचं दर्शन केल्याशिवाय तरी तिथून जाणार नव्हतो. मग ठरवलं की बाप्पांच दर्शन होईपर्यंत तरी इकडे तिकडे नजर फिरवायची नाही. मंदिरात पोहचलो आणि सकाळची स्नानादी पूजाविधी सुरू असतानाच्या, उजव्या सोंडेच्या, पांढर्‍या शुभ्र बाप्पाच्या दर्शनाचा तो अनुभव इथे शब्दात व्यक्त करणं मला शक्य नाही. त्या ठिकाणी पावित्र्य आणि सौंदर्याचा अनोखा संगम घडून आला होता. मंदिराचा परिसर रांगोळ्यांनी व दिव्यांनी सजविण्यात येत होता. शिवाजी महाराजांपासून ते स्त्रीभ्रुण हत्येविरोधात जनजागृती करणार्‍या मोठमोठ्या रांगोळ्यांनी संपूर्ण उद्यान भरून गेलं होतं. त्या रांगोळ्या बघून वाटलं रात्री २-३ वाजेच्याही आधीपासून ही मंडळी तेथे जमली असावी. उद्यानातील तलाव, पायवाट, ओटे, बहुतांश मोकळी जागा पणत्यांनी व मेणाच्या दिव्यांनी उजळून दिसत होती. फ्यान्सी फटाके फोडली जात होती...आकाशात दिवे सोडली जात होती.... फुलांच्या रांगोळ्या काढल्या जात होत्या. बापांच्या दर्शनामुळे की सकाळच्या बागेतल्या अंधारामुळे (वरून आज मी चष्माही नव्हता घातला), पण बागेच्या फाटकाजवळ आलेले विचार आता मला अस्वस्थ करीत नव्हते. तलावात किंवा नदीत पाण्यात शिरताना सुरवातीला जसा जीव घाबरतो, धडधडतो पण एकदा चिंब भिजलं की पाण्याशी सलगी होऊन बाहेर निघायची इच्छा होत नाही तशीच काही माझी अवस्था झाली होती.

६ वाजले होते, आता हळू हळू उजळायला सुरवात होत होती. बर्‍यापैकी प्रकाश पडला होता आणि त्याचबरोबर गर्दीही वाढत होती. हजारो लोकं सहज मावतील  एवढ्या मोठ्या उद्यानात आता आत यायला जागा नव्हती. उद्यानात दिवाळ पहाटेची गाण्यांची कार्यक्रम सुरू झाली होती. प्रकाशाबरोबर व वाढत्या गर्दीबरोबर आलेल्या मंडळींनी दिवाळीला केलेली खरेदी त्यांना पाहताच ध्यानात येत होती. जवळजवळ सर्वच मंडळी पारंपरिक वेषभूषेत नटले-सजलेले होते. स्त्रीवर्गात साडी आणि पंजाबी ड्रेस चे प्रमाण अधिक होते. नुकताच एका दिवाळी अंकात वाचनात आले की फारशी फ्याशन करण्याची म्हणजेच अंतर्वस्त्र दर्शविणारी बहिर्वस्त्र घालण्याची परवानगी नसणार्‍या मुलींना थोडं अंगाबरोबर फिटिंग,थोडा मोकळा गळा, थोडी उघडी पाठ, तोकडी कमीज आणि फार फार तर स्लीवलेस टॉप अशी बंडखोर फ्याशन करण्याची संधी या पंजाबी ड्रेसमुळेच मिळते. इथेही तसाच काहीसा नजारा दिसत होता. मुलांचं काय खाली जीन्स असो, पायजमा असो की सुरवार असो वरती कुर्ता घातला की त्यांचा पारंपरिक पोशाख तयार.

बागेच्या गर्दीतील मजा, मधून मधून कानावर पडणारी पुणेरी मुलींची "तू आधी का नाही सांगितलं, मी त्याला शिस्तीत शिव्या घातल्या असत्या" असली वाक्प्रचार आणि बागेतील दिवाळ पहाटेच्या त्या संगीतमय कार्यक्रमाचा अनुभव पुन्हा कधीतरी..

त्या दिवशी त्या बागेत मात्र सर्वत्र फक्त उत्साह आणि आनंद दिसत होता.

प्रफ़ुल..