दोन प्रसंग

आपलं जीवन किती अस्थिर झालं आहे ! जणू येणारा प्रत्येक दिवस हीच गोष्ट सिद्ध करतो आहे. जीवनाची कोणतीही अभिव्यक्ती, परिस्थिती असू द्या, तिथे आपण निश्चित आणि निश्चिंत म्हणून एक गोष्ट धड सांगू शकत नाही. एकविसाव्या शतकात, आधुनिक युगाचा मुखवटा वागवत असताना पावलो पावली घडणाऱ्या ह्या काही गोष्टीच त्याची साक्ष देतात.

प्रसंग १. दसरा, धम्मचक्रपरिवर्तनदिनाच्या आदल्या दिवशी नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या  नंदीग्राम एक्स्प्रेसने केलेला प्रवास! रेल्वेचा प्रवास समाजाच्या स्थितीचं, त्यातल्या हेवेदाव्यांचं आणि संघर्षांचं नेहमीच अप्रतिम उदाहरण देत असतो. रेल्वेमध्ये असणारे "आरक्षित" आणि सामान्य "वर्गाचे" डबे जणू याच संघर्षाचे साकार रूप! दसऱ्याच्या आदल्या दिवशी नागपूरकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसला अक्षरश: छळछावणीचे स्वरूप आले होते. प्रत्येक स्टेशनागणिक माणसाचा अविरत लोंढा रेल्वेवर कोसळत होता. आणि ह्या लोंढ्याने सर्व व्यवस्था कोलमडून टाकल्या. झुंडशाहीचं साकार आणि अंगावर येणारं उदाहरण! प्रत्येक स्टेशनागणिक गाडीत स्वत:ला कोंबून घेणारे लोक आणि भावनाशून्य आणि म्हणून सुखात असणारी आगगाडी.

हा प्रसंग केवळ वर्षात एकाच दिवशी असतो का? कोणताही मोठा भावनिक कार्यक्रम, सभा, जयंती असताना हेच चित्र दिसत नाही का? कोणत्याही प्रसंगी इतक्या झोकून देऊन जाणाऱ्या चं कौतुकच करावंसं वाटतं. इतका आत्मबेभानपणा कुठे पाहायला मिळतो? पण ह्या कौतुकाबद्दल मनात असंख्य प्रश्नही खुपसले जातात. जे हे प्रसंग असतील; ज्या जयंत्या असतील; त्यांच्या प्रवर्तकांनी जी शिकवण दिली ती महत्त्वाची का व्यक्तिपूजा आणि बेभान स्वैराचार महत्त्वाचा? आपण जर इतक्या बुद्धिवादाच्या शिकवणी मिळूनही जर व्यक्तिपूजेत तर्र होणार असू तर कुठे तरी नक्कीच गडबड आहे. आणि ती प्रचंड भयानक आहे. संघटित होणे, संघर्ष करणे गैर नाही, आवश्यकच आहे; पण त्यातूनही जर विषमता, अन्याय, दुर्बल घटकांची पिळवणूक होणार असेल तर? आणि इतक्या संख्येने लोक एकत्र येतात, एका उत्साहाने बिकट परिस्थितीतून, हाल अपेष्टा करत जातात हे ग्रेट आहे, पण कशासाठी आणि कोणत्या प्रेरणेने? ह्यात कोणत्या दूरदर्शीपणा किंवा जागरूकतेपेक्षा परावलंबी, निराश आणि पराभूत मनोवृत्तीच जास्त दिसत नाही का? एक प्रकारची अंधश्रद्धाच ना ही. इतक्या बेभानपणे – किंचितही नियोजन, विचार न करता झोकून देणे आणि त्यातून व्यवस्थेवर आणि पर्यायाने त्यातल्या दुर्बल घटकांवर विलक्षण ताण देणे महापुरुषांना पटत असेल का? अर्थात हे प्रश्न वरवरच्या मरण्याबद्दल, वरवरच्या अस्थिरतेबद्दल आहेत. ह्या रोजच्या मरण्यालाही असंख्य गुंतागुंतीचे पदर आहेत.

प्रसंग २. कोणत्याही दिवशीची, कोणत्याही लाइनवरची मुंबईची लोकल. कोणत्याही कारणाने लोकल बंद पडते. असंख्य प्रवाशांचे असंख्य हाल. त्यांना काहीच मर्यादा नाहीत. ह्याला कारणीभूत कोण आणि ह्यामुळे बळी कोण?

हे आणि असे रोजच्या जीवनातले असंख्य प्रसंग काय सांगतात? आपल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनात कोणत्याच प्रकारे सामाजिक व्यवस्था आणि सेवा राहिलेल्या नाहीत. ज्या आहेत; त्या मोडकळीला आल्या आहेत; एखाद्या संहारक युद्धानंतर कोसळून पडणाऱ्या सार्वजनिक सेवांप्रमाणे.

वाहतूक, सुरक्षा यंत्रणा, पायाभूत सुविधा खरं तर सरकारने द्यायला हव्यात. जागतिकीकरणाचा जमाना आला असला; तरी संविधानानुसार भारत अजूनही कल्याणकारी देश आहे. पण प्रत्यक्षात सगळं "कल्याण" झालं आहे! कोणत्याच निकषावर सरकार ह्या जवाबदार्याल किमान सोय होईल इतक्या पातळीवरही पूर्ण करताना दिसत नाही. कोणतीही क्षुल्लक गोष्ट होते आणि सर्व देखावा कोसळतो. आणि आपली व्यवस्थाही असंख्य ठिकाणी गुंतागुंतीची, दुबळी आणि इतकी संवेदनशील झाली आहे की ती ह्या बदलात टिकाव धरू शकत नाही. सरकार किंवा राज्ययंत्रणा ह्या प्रकारच्या साध्या गोष्टींमधून निर्माण होणाऱ्या विदारक समस्यांबद्दल काहीच कृती करत नाही आणि ज्याची किंमत मोजतो आपण.

प्रश्नांच्या ह्या महासागरात काही उत्तरं दिसत आहेत का? काही ठाम, स्थिर आहे की नाही? प्रकाशाची काही बेटं आहेत का? धूसर आणि अंधुक वातावरणात काही दिवे नक्की दिसतात. ते आहेत स्वावलंबीपणाचे. वर उल्लेखलेले प्रसंग, सर्वत्र सतत होणारे अत्याचार, अनाचार, हिंसा आणि स्वैराचार ठामपणे हेच सांगतात, सरकार, शासन नावाची यंत्रं आता बंद पडली. गेले त्यांचे दिवस. आता त्यामध्ये काही जान राहिली नाही. म्हणून त्यावर अवलंबून आशाळभूत बनण्यापेक्षा वेळ स्वत: कृतिशील होण्याची आली आहे. जितकं होता येईल, तितकं स्वयंपूर्ण होण्याची आहे. स्वत: सर्व काही करायची आहे. मग कोणतीही सेवा, सुविधा आणि गरज असेल. परावलंबीपणापेक्षा त्या प्रवासात कमी तणाव, कमी संघर्ष आहे. अशी उदाहरणं म्हणजेच स्वावलंबनाचे प्रयोग. आणि सार्वजनिक तंत्रज्ञान, जे पैसा, ऊर्जा, साधनसंपत्ती ह्यांचं खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण करेल आणि आपल्याला जास्तीत जास्त स्वावलंबी बनवेल. अशीच काही उदाहरणं म्हणजे अण्णा हजारे, पोपटराव पवार, प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, गांधीजी आणि बरेच..... 

- निरंजन वेलणकर
ब्लॉगवर आपले स्वागत आहे.