मुस्लिम देशांतील धर्मनिरपेक्षतावाद

दूरगामी परिणाम असणार्‍या ट्युनीशियामधील निवडणुका संपून बरेच दिवस झाले
आणि आता लक्ष इतरत्र द्यायची वेळ आली आहे. त्यात काळजाचा थरकाप उडविणारी
गद्दाफीची निर्घृण हत्त्या, तुर्कस्तानमधला भूकंप आणि युरोपवरील आर्थिक
संकट यांचा समावेश होतो. पण ट्युनीशियामधील निवडणुकांचा प्रभाव मात्र
निःसंशयपणे त्या देशाच्या सीमांच्या पलीकडेही पडणार आहे.

अरब राष्ट्रांत स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची ज्योत प्रज्वलित करण्याचे
(ज्याला मीडियाने "अरबी वसंत ऋतू" असे नाव दिलेले आहे) श्रेय
ट्युनीशियामधील जनतेच्या उठावालाच जाते. या उठावाची ठिणगी ट्युनीशियामध्येच
पडली आणि तिने तिथल्या हुकुमशहाचा बळी घेतला. तेंव्हां अरबी जगातली
पहिली-वहिली निवडणूक घेण्याचा मानही त्या देशाला मिळावा हे उचितच आहे. जरी
"एन्नाहादा (पुनरुज्जीवन पक्षाला)" या कट्टर नसलेल्या पण "इस्लामी"
असलेल्या पक्षाला निर्णायक बहुमत मिळाले नसले तरी अपेक्षेप्रमाणे तो पक्ष
ही बहुरंगी निवडणूक २१७ पैकी ९० जागा जिंकून आणि एकूण मतदानाच्या ४१ टक्के
मते मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला.

या इस्लामी पक्षाच्या विजयामुळे ट्युनीशियामधील धर्मनिरपेक्ष लोकांत आणि
पाश्चात्य राष्ट्रांत अनेक शंकाकुशंका आहेत तर इतरांना हा विजय म्हणजे एक
अपरिहार्य परिणामच वाटतो. अनेक वर्षे राज्य केलेल्या झैन-एल अबेदीने
(Zein-el Abedine) या हुकुमशहाच्या कारकीर्दीत विरोधी पक्षाला क्रूरपणे
चिरडण्यात आले होते आणि कुठल्याही राजकीय पक्षाला धडपणे काम करू दिले गेले
नव्हते. एन्नाहादा ही चळवळही एक सामर्थ्यशाली पण भूमिगत चळवळ होती आणि या
चळवळीने अशा क्रूरपणाला टक्कर दिली, त्यांच्या सभासदांना अटक झाली, त्यांचा
छळ करण्यात आला व दडपशाही मार्गाने त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे प्रयत्नही
झाले. या पक्षाचे नेते रशीद घान्नूची यांनी आपल्या आयुष्याची २० वर्षे
इंग्लंडमध्ये हद्दपारीत काढली होती आणि गेल्या जानेवारीत ते मायदेशी परत
आले होते.

’एन्नाहादा’च्या हुकुमशाहीच्या आणि भ्रष्टाचाराच्या तत्वाधिष्ठित विरोधाकडे
पहाता आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर धर्मनिरपेक्ष पक्षांमधील अनागोंदी
कारभाराकडे पहाता एन्नाहादा पक्षाचा विजय होणे अपेक्षितच होते.
ट्युनीशियातील फ्रेंच भाषिक दैनिक "ल ताँ (Le Temps)"ने लिहिल्याप्रमाणे
"डाव्या पक्षांतील आपापसातील फाटाफुटीमुळेच त्यांचा पराजय झाला!"

ट्युनीशियामधील धर्मनिरपेक्ष लोकांच्या मनात घर करून राहिलेली भीती बाहेर
काढून टाकण्यासाठी ट्युनीशियामधील स्त्रियांनी जी सामाजिक उन्नती करून
घेतली आहे तिला ’एन्नाहादा’ पक्षापासून कांहींच भीति नसल्याचे त्या
पक्षाच्या प्रवक्तीने स्पष्ट केले. स्त्रियांनी बुरखा वापरण्याची किंवा
त्यांना न आवडणारा पोषाख वापरण्याची सक्तीही करण्यात येणार नाहीं असे तिने
जाहीर केले. तिने पुढे असेही सांगितले कीं त्यांच्या पक्षाचे धोरण जास्तीत
जास्त स्त्रियांनी काम करावे असेच आहे. कामाच्या जागी लैंगिक समानतेवरही
त्यांच्या पक्षाचा कटाक्ष आहे असे तिने जाहीर केले.

खरे तर एन्नाहादा पक्षाने स्फूर्ती घेतली आहे तुर्कस्तानमध्ये सत्तेवर
असलेल्या "न्याय आणि विकास पक्ष (AK)" या सौम्य इस्लामी पक्षाकडून! रेसेप
एर्डोगान यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष एक दशकापेक्षा जास्त वर्षें सत्तेवर
आहे आणि त्या पक्षाने तुर्कस्तानचे आर्थिक सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर
वाढविले आहे. तुर्कस्तान हा देश आता या भागातली एक महत्वाची राजकीय शक्ती
बनलेला आहे. मी (म्हणजे श्री. इर्फान हुसेन) तुर्कस्तानला गेली पन्नास
वर्षें भेट देत आलेलो आहे पण माझ्या शेवटच्या भेटीत माझे डोळे जणू खाड्कन
उघडले. या देशात आर्थिक भरभराट पूर्वी कधीही झाली नव्हती अशा वेगाने होत
आहे आणि इस्तंबूल हे एक सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र बनू लागले आहे आणि
त्यामुळे तिथे सार्‍या जगातून जास्त-जास्त पर्यटकही येऊ लागले आहेत.

आता एन्नाहादा किंवा न्याय आणि विकास पक्ष (AK) या पक्षांची पाकिस्तानमधील
धर्माधिष्ठित पक्षांशी तूलना केल्यास एकाद्या कालचक्रात अडकलेला एकादा
डायनोसोरच डोळ्यासमोर येतो! मुत्ताहिदा मजलीस-ए-अमल (MMA)[१] गठबंधन खैबर
पख्तूनख्वा प्रांतात सत्तेवर असताना त्याने तो पक्ष कसा मध्ययुगीन कालातला
आहे हे आपल्याला दाखवून दिले आहेच. त्यांना आधुनिक सत्यतेची कांहींही
कल्पनाच नाहीं हेही दिसून आलेले आहे. पाकिस्तानच्या प्रमुख धर्मनिरपेक्ष
पक्षांनीसुद्धा राज्यकारभाराबाबत आपल्याला निराश केले असले तरी इस्लामी
धर्माधिष्ठित पक्ष अजीबातच विकसित झालेले दिसत नाहींत.

या पक्षांचा निवडणूक जाहिरनामा म्हणजे "कुठला नियम मोडल्यास काय शिक्षा
होईल" या धर्तीवर बनविलेली एक शिक्षांची यादीच वाटते. त्यांनी मुस्लिम
धर्माचे "काय केलेले चालेल आणि काय केलेले चालणार नाहीं" अशा तर्‍हेच्या
नियमावलीतच जणू रूपांतर केलेले आहे. पण त्यात आध्यात्मिकता आणि चिंतन/मनन
यांवर कसलाही भर दिलेला नाहीं. त्याहून पुढे पाहिले तर असे दिसून येते कीं
हे पक्ष अर्थशास्त्र, शास्त्र व सामाजिक सत्यपरिस्थिती याबाबत अगदीच
अनभिज्ञ आहेत. त्यांच्यात फक्त स्त्रियांना घरात डांबून ठेवण्यापुरतीच एकी
आहे आणि ते अगदी कट्टर सांप्रदायिक आहेत. त्यामुळे मुशर्रफ यांनी
गडबड-गोंधळ करून घेतलेली २००२ची निवडणूक सोडल्यास जवळ-जवळ प्रत्येक
निवडणुकीत या पक्षांचा धुव्वा उडालेला आहे यात नवल ते काय?

पाकिस्तानमधील फारसे न शिकलेले मुल्ला-मौलवी एन्नाहादा किंवा AK पक्षांना
पाखंडीच समजत असतील. ट्युनीशिया आणि तुर्कस्तान हे मद्यपानाबद्दलही सहिष्णू
आहेत कारण त्यांना माहीत आहे कीं मद्यपानावर बंदी घातल्यास पर्यटक येणार
नाहींत आणि या देशात पर्यटकांकडून मिळणारे उत्पन्नच विदेशी मुद्रा
मिळविण्याचे मुख्य साधन आहे.

मी (म्हणजे श्री. इर्फान हुसेन) जेंव्हां पहिल्यांदा तुर्कस्तानला गेलो
होतो त्यावेळच्या मानाने आज तुर्कस्तानमधील जास्त जास्त स्त्रिया आपले केस
डोक्यावरून वस्त्र घेऊन झाकू लागल्या असल्या तरी कित्येक स्त्रिया आजही
अंगप्रदर्शन करणारे पाश्चात्य कपडे वापरणार्‍या आहेत. आज कुणी काय कपडे
वापरावे या वैयक्तिक निवडीबद्दल बाऊ करणारे जे मुल्ला-मौलवी पाकिस्तानात
आहेत तसे तुर्कस्तानमध्ये नाहींत. याउलट तालीबानी नेतृत्व कपड्यांना आणि
चेहेरेपट्टीला किंवा रूपाला फारच वेगळ्या पातळीवर नेतात. पुरुषांना दाढी
करायला मज्जाव करणारे आणि आपल्या घोट्याच्या वरच्या अंगाच्या एकाद्या
इंचाचेही प्रदर्शन करणार्‍या स्त्रियांना छडीच्या माराची शिक्षा देण्याची
तरतूद करणारे नेतृत्व समाजाला परत ७ व्या शतकात नेत आहे. मग आजच्या
अफगाणिस्तानी जनतेत बहुसंख्य लोक तालीबान पुन्हा सत्तेवर येण्याच्या
विरोधात आहेत यात नवल ते काय? आणि एकदा पाश्चात्य फौजा परत गेल्यावर कीं
तालीबानी पुन्हा सत्ता काबीज करतील याची सामान्य जनतेला भीतीच आहे. बर्‍याच
पाकिस्तानी लोकांना या तालीबानी लोकांबाबत कौतुक आहे ही गोष्ट फारच
घाबरवणारी आहे. तालीबानचे कौतुक असलेल्या पाकिस्तान्यांना तालीबानच्या
राजवटीत कांहीं दिवस ठेवले पाहिजे म्हणजे त्यांना आज पाकिस्तानात
मिळणार्‍या व्यक्तिस्वातंत्र्याचे कौतुक वाटू लागेल.

एन्नाहादा पक्षाच्या वर उल्लेखलेल्या प्रवक्तीने जाहीर केले कीं एन्नाहादा
हा राजकीय पक्ष असून तो धार्मिक पक्ष मुळीच नाहींय्. अनेक वर्षे विरोधी
बांकांवर बसलेल्या ट्युनीशियन सांप्रदायिक पुस्तकी विचारवंतांना कळले आहे
कीं या युगात आणि या क्षणीं ते अशा तर्‍हेचे आचरण किंवा कल्पना, स्वप्नें
लोकांवर त्यांच्या मर्जीविरुद्ध जबरदस्तीने लादू शकत नाहींत. या उलट
पाकिस्तानातील कट्टर धर्माधिष्ठित पक्षांना लष्कराकडून सदैव कृपाछत्र किंवा
आश्रय मिळालेला आहे आणि त्यामुळे आपल्या सांप्रदायिक कल्पना लोकांवर
लादण्यात या कट्टर धर्माधिष्ठित पक्षांचे कांहींच जात नाहीं! "मुस्लिम
ब्रदरहुड" किंवा त्या संघटनेच्या इतर शाखा स्वायत्तपणे वावरतात, पण
पाकिस्तानी मुल्ला-मौलवी नेहमीच लष्करशहांचे कनिष्ठ सहचर म्हणूनच वावरले
आहेत. त्यामुळे त्यांना कधीच आपली मतप्रणाली किंवा आपली कार्यपद्धती
नव्याने पारखून पहायची गरजच भासली नाहीं.

एन्नाहादा हा पक्ष सध्या डाव्या आणि उदारमतवादी/प्रगतीवादी पक्षांशी युती
करून संमिश्र सरकार बनविण्याच्या दृष्टीने वाटाघाटी करत आहे. ही युती जर
संमिश्र सरकार बनवून स्थिर शासनयंत्रणा जनतेला देण्यात यशस्वी झाली तर एक
मुस्लिम राष्ट्र २१व्या शतकात परिणामकारक शासन देऊ शकते हे ट्युनीशिया
सार्‍या जगाला एक उदाहरण म्हणून दाखवू शकेल आणि त्याला यशस्वी न व्हायला
कांहींच कारण नाहींय्. तुर्कस्तानने प्रगतीपथाची दिशा आणि पद्धत आधीच
दाखवून दिली आहे.

मुस्लिम धर्म हे पाकिस्तान्यांसाठी एक परिचित असे प्रभावी चिन्ह आहे आणि
म्हणून मुस्लिम धर्म पाकिस्तानच्या राज्यपद्धतीत व्यक्त होणे हे योग्यच
आहे. पण सांप्रदायिक मुल्ला-मौलवीं आजच्या आधुनिक युगाचा संदर्भ लक्षात न
घेता आपल्या धर्माच्या शिकवणींचा शब्दशः अन्वयार्थ लावतात. यात त्यांचे
स्वतःचे अपूर्ण व मर्यादित ज्ञान आणि शिक्षणच व्यक्त होते.

धर्माने मुस्लिम असूनही तुर्कस्तानच्या राज्यघटनेची कोनशिला असलेली
धर्मनिरपेक्षता स्वीकारणे यात कसलाही विरोधाभास नाहीं हेच ट्युनीशियाने आणि
तुर्कस्तानने दाखविले आहे. इतर धर्मांना सामावून घेण्याची आणि सहिष्णुतेची
प्रवृत्ती असल्याशिवाय कुठलाच समाज धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाहीं. सर्व
धर्माच्या लोकांना मुस्लिम समाजात मोकळे वाटले पाहिजे. जोपर्यंत आपले
(पाकिस्तानचे) धर्माधिष्ठित पक्ष अशा विचारप्रवाहांशी एकरूप होत नाहींत
तोपर्यंत ते पक्ष असंबद्ध आणि अग्राह्यच रहातील.

The above Marathi write-up is translation of original English article "Secularism in Muslim societies" written by Mr Irfan Husain and was first published by DAWN on October 31, 2011

Original article can be read at

दुवा क्र. १