आठवणीतले गाव --पारनेर ..!!

पायातले रबरी बूट काढून जमिनीवर आपटून मोठा आकांत तांडव सुरु केला होता मी .
शाळेचा पहिला दिवस..!!
त्या कोंडवाड्यात मला कोंडून ठेवण्याचा माझ्या पालकाचा चंग मी हाणून पाडण्याचा निकराने प्रयत्न करीत होतो
खूप लालूच दाखविली जात होती .
अश्रुंचे धरण फुटले होते. त्यात आई बाबा वाहून जातील असे वाटत होते.
शेवटी त्यांनी ब्रम्हास्त्र काढले.
डोळे वटारले.रागावले.
आणि मी घायाळ झालो.
स्वाधीन झालो.
शाळेच्या घाण्याला जुंपला गेलो
शिक्षक आम्हाला कोणी बाई होत्या.
दुखात कोवळे सुख होते
अ - अननसाचा
ब - बदकाचा
क -कमळाचा
बबन उठ कमल उठ
चला सगळे उठा .झाडाना पाणी द्या .
अभ्यास सुरु झाला
मजा वाटू लागली. मित्रामध्ये खोड्या सुरु झाल्या .लपाछपी सुरु झाली.
ज्या शाळेत जायला आकांत केला त्या शाळेत मी मुकाटपणे जाऊ लागलो
काही मुले मित्र झाली.
काही आवडली काही नकटी झाली
पारनेरची आठवण आली की मला हे सगळे आठवू लागते. तसा लहान होतो. पाच वर्षाचा कसाबसा असेल.
बाबांची बदली पारनेरला झाली होती .
एक मोठ्च्या मोठे घर भाड्याने घेतले होते.
घराचा मुख्य दरवाजा उखळीचा होता .दिंडी दरवाजा म्हणाल तरी ते योग्य वाटेल.
मग छोटा आयताकृती मातीचा चौक.
ह्या घराला एल टाईपच्या आकाराची पडवी होती.
त्याच्या तिन्ही टोकाला छोट्या खोल्या होत्या .
घराच्या पुढील भागाच्या रुममध्ये बैठक केलेली.
समोरच्या खोलीमध्ये घरच्या मुलांना बसा- उठायला अभ्यासाला केलेली.
आणि सुरवातीची खोली मला वाटतेय ती अडगळीची असावी .आणि व्हरांड्यातून आत शिरलेल्या खोलीत किचन असावे.
मागे पण अर्थात मातीचा खूप मोठा चौक होता.
त्या चौकामध्ये मस्त अशी बाग होती.
निरनिराळी फुलझाडे ,गिलके ,दोडके कारले ह्यांच्या वेली होत्या
मधूनच झुळझुळ वाहणारा एक छोटा पाट  पण केला होता.
ते सर्व बघायला मोठी मजा वाटत होती .
आम्ही तेथे खुपच्या खूप वेळ बसत असू. त्या पातातले  पाणी बघत असू.
ते वाहते झुळझुळ पाणी बघावयास मजा वाटे. वाटायचे की तेथून कधी उठूच नये .
ती बाग म्हणजे मला स्वप्न वाटे.
एके दिवशी मी शाळेत गेलो होतो.
कधीतरी घरी आलो. बघतोतर मागची सगळी बाग उध्वस्त झाली होती.
तेथे मोठे जनावर निघाले होते. आई घाबरली होती .नि सगळी बाग तोडण्याचा निर्णय झाला होता.
माझी बाग हरवून गेली होती
तेथे मातीचे छोटे अंगण झाले होते. कोपर्यात तुळस केविलवाणेपणे उभी होती .
खूप वाईट वाटले.
ह्यावर काय उपाय होता ..?
थोड्याच दिवसात मी हे सगळे विसरून गेलो.
आईने तेथे रिंग खेळण्यासाठी दोन खांब नि जाळी लावली होती
मग मीपण तेथे कधीकधी रिंग खेळत बसे.
पोपटी रंगाची रबरी रिंग अजूनही मला कधी दिसू लागते.
ती उजाड बाग आठवली की आताआताशी माझे काळीज भरून येते
अजूनही पारनेरची आठवण आली की आपण स्वप्नात हरवून जातोय असे वाटू लागते.
आई सकाळी सकाळी चौकात छान असा सडा घालून त्यावर रांगोळी काढीत असे .हे दृश्य मला कधीतरी र्दिसू लागते
नि पारनेर मला आठवून जाते.
शाळेतही मोठी गंमत असे. बाई मला कधीच रागावत नसत. माझे लाड करीत
एकदा मात्र बाई माझ्यावर रागावल्या नि त्यांनी माझा गाल चिमटीत पकडला
त्याची कहाणी अशी घडली.
आमच्या वर्गात एक मिठाईवाल्याचा मुलगा होता.[ असे मला वाटते आहे] अतिशय घाणेरडा . तो त्याच्या नाकातील सगळी संपती मित्राना दाखवून खायचा . खूप किळसवाणे वाटायचे ..एकदा मला वाटते त्याने गाठी शेव आणली नि वर्गात सगळ्याना वाटू लागला. त्याने मला पण ती गाठी शेव दिली .मी पण ती घेतली. मुठीत ठेवली. नि त्याकाळी बसायला मोठमोठे पाट होते मी मोका साधून ती शेव त्या पाटाखाली फेकली. आणि नेमके त्या बाईनी हे बघितले . त्या जवळ येऊन मला म्हणाल्या
बाळां ती शेव का फेकली...?
माझ्या डोळ्यातून गंगा जमुना सुरु झाल्या.
मी रडत सगळे सांगितले.
तर बाई म्हणाल्या तुला खायची नव्हती तर घ्यायची नाही. पण अशी फेकायची नाही .
नि त्यांनी माझा गाल चिमटीत पकडला .
पारनेर आठवले की ही आठवण अजूनही मला चिमटीत पकडते.
आमच्या घरा समोर एक दाढीवाला बाबा राहायचा. त्याला ३-४ मुले होती . मुलांची आई अतिशय गरीब स्वभावाची. मला आठवतेय त्यांचा मुलांच्या खेळण्यातील लोखंडी ,छोट्या छोट्या चुली छोटे छोटे तवे नि काय नि काय बनविण्याचा छोटा कारखाना होता. घरची परिस्थिती गरिबीची वाटत होती . तो माणूस विक्षिप्त नि विक्षिप्त वाटत होता. तो वेडा असावा अशी माझी ठाम समजूत होती .त्या बाई आमच्या घरी खूप वेळा येऊन बसत . कधी कधी त्यांच्या डोळ्यात पाणी पण दिसत असे .
आमच्या घराजवळ नागेश्वराचे मंदिर होते. शंकराचे मंदिर. तेथे पायर्या पायर्यांची एक मोठी विहीर होती . अशी विहीर मी तर प्रथमच बघत होतो .बापट आजोबा ज्यांना काही दिसत नव्हते ते रोज शंकराच्या मंदिरात जायचे . नि एक दिवस चमक्तार झाला बापट आजोबाना चक्क दिसू लागले. नागेश्वराचा शंकर त्याना पावला असे सगळीकडे झाले.
खूप काळ लोटून गेला .मागच्याच वर्षी सहज गम्मत म्हणून आपली जुनी गावे कशी दिसतात म्हणून बघावयास गेलो .पारनेरला गेलो. आमचा वाडा नाही दिसला ,नागेश्वराचे मंदिर मात्र दिसले. विहीर फार जून नि केविलवाणी वाटली .
देवळाच्या प्रवेशद्वारा जवळ छोटे घर होते. मला चांगले स्मरतेय त्या घरात मामाचा एक मित्र राहत होता. सहज मी तेथे डोकावलो . त्याना जुनी आठवण सांगितली .माझे ऐकून त्यांना बरे वाटले. ते पण जुन्या काळात हरवून गेले. मग . त्यांनी मोठ्या अगत्याने आमचे स्वागत केले. चहा दिला 
सहज बोलता बोलता त्या दाढीवाल्या बाबाची आठवण काढली. आणि ते वेडसर होते काय..? असे सहज बोलून गेलो .
म्हणाले --नाही नाही साहेब तो वेडा नव्हता . थोडासा विक्षिप्त होता ईतकेच. आयटीआय झाला होता. त्याने छोटा कारखाना पण टाकला होता.
म्हणालो -आहेत का ते ..?
गृहस्त म्हणाले -ते जाऊन काळ उलटला.
तेवढ्यात एक बाई समोरून गेली. ठेंगणी ठुसकी. म्हणाला
ती पोर चाललीयना ती त्याच्या नातवाची बायको .त्यांनी तिला बोलावून आमची ओळख करून दिली.
आम्ही आमची काय ओळख सांगणार ..?
त्यांचा निरोप घेऊन आम्ही देवळात गेलो. देवळात काहीतरी कार्यक्रम होता, त्या बाईनी अम्हाल बघितले. थांबा जराशे म्हणाली. नि एका खोलीत जाऊन द्रोणभर गव्हाचा शिरा आणून दिला. गव्हाचा गुळ घातलेला शिरा रंगाने एकदम काळा काळा होता .प्रसाद म्हणून मी थोडासा तोंडात टाकला.
 
प्रसाद खपेणा . काय करावे कळेना .
मनात विचार आला -
कसा खाणार ..?
कुणाला देणार ..?
कोठे गाय दिसतेय का बघू लागलो .
कोठे गाय पण दिसेना .
मला तर प्रसाद खपत नव्हता.
काय करावे कळत नव्हते 
बैचैन वाटत होते. 
नि मला एकदम शाळेतल्या बाई आठवल्या 
नि कोणीतरी चिमटीत गाल पकडतोय असे वाटून गेले 
गप्प शांत झालो .देवळाच्या पायरीवर जाऊन बसलो 
देवाला नमस्कार केला. 
प्रसाद मुखात  सारला 
एक एक घास संपवून टाकला. 
कधीतरी एकटा   असलो की पारनेरची आठवण दाटून येते.
नि नियती काहीतरी असावी असे वाटून जाते......!!