हलकं फुलपाखरा सारखं आयुष्य
स्थिरावण्यासाठी
कोठून आणू जडपणा ?
वजन वाढणं या वयात
किती आवश्यक ...?
किती अनावश्यक .....?
इतकी वर्षं व्यायाम करून
डोकं कसं हलकं झालय
वर खालीची भावना
शीर्षासनातही नष्ट झाल्ये
मग हलके हलके पाय
पोलियोने लुळे पडलेले
का धरतील जमिनीला....?
का धरतील स्वप्नांना ...?
स्वप्नात दंग होण्यासाठी
लागतं हलकं शरीर
पण पाय मात्र जड हवेत
मातीचेच मातीचेच .....
नाहीतर लंबकासारखी
आंदोलनं अटळ आहेत
इकडून तिकडे , इकडून तिकडे
चावी असेपर्यंत, चावी असे पर्यंत.