असेही एक गाव होते !

ते एक आटपाट नगर होते. छोटेसेच जेमतेम पाच हजार वस्तीचे, म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने खेड्यातच जमा होण्यासारखे. पण एका संस्थानच्या राजधानीचे गाव होते.आणि राजाही तेथे वास्तव्य करत होता. त्यामुळे  त्या नगराला वेगळीच शान होती.मायाबाजार     चित्रपटात " विझले रत्नदीप नगरात आता जागे व्हा यदुनाथ " हे गीत लिहिताना कविराज गदिमांना याच नगरीची याद आली असणार. काही झाले तरी या नगरीच्या "अंबाबाईच्या परडी" तील नैवेद्य त्यांनी खाल्ला होता ना !शिवाय स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीही या नगरीत रात्री रस्ते विद्युतद्दीपांनी झळकत.स्वातंत्र्यदिनानिमित्त राजवाड्यासमोरील दीपमाळ संपूर्ण विजेच्या दिव्यांनी चमकत होती आणि तरी राजाने त्यापूर्वीच राज्यत्याग करून जनतेच्या हाती सत्ता सोपवली होती.

गावात शिरण्यापूर्वीच यमाई देवीच्या मंदिराचा कळस दिसू लागे. गावात शिरताना प्रथम दोन बाजूस दगडी खांब असलेल्या वेशीतून प्रवेश करावा लागे व लगेच भव्य क्रीडांगण डाव्या बाजूला दिसू लागे. फाल्गुन महिन्यात शिमग्याच्या निमित्ताने येथे निरनिराळ्या खेळांचे सामने होत त्याना शिमगास्पोर्टस असे म्हणत. इतर वेळी शाळेतील मुलांचे सामने पण याच मैदानावर होत. मैदानाच्या टोकाला व्यायामशाळा होती. थोडे पुढे आले की उजव्या बाजूस मूळपीठ देवीच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता दिसतो. या रस्त्यावरून जाताना प्रथम दत्तमंदीर लागते ते प्रसिद्ध गायक व व्हायोलिनवादक पं. गजाननबुवा जोशी यांचे पिताजी पं. अनंत मनोहर जोशी यानी आपल्या आध्यात्मिक गुरूच्या स्मरणार्थ बांधले आहे. त्या मंदिरात आश्विन व॥ पंचमीस अतिशय मोठा संगीत महोत्सव होत असे. त्या महोत्सवात भारतातील त्यावेळच्या बहुतेक प्रथम दर्जाच्या गायक वादकांनी हजेरी लावली होती. आता त्या मंदिरासमोर मोठा हॉल रस्त्याच्या विरुद्ध बाजूस बांधला आहे व हा उत्सव तेथे होतो.

तेथून थोडे पुढे गेले मूळपीठ देवीच्या डोंगराच्या पायऱ्या लागतात.या डोंगरावर सकाळी नेमाने जाणाऱ्या लोकांना महाराजांचे दर्शन हटकून व्हायचे कारण भल्या पहाटे ३ वाजता उठून समंत्र सूर्यनमस्कारांचा व्यायाम करून व दुग्धपान करून मूळपीठ देवीच्या दर्शनास जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. काळ्या फरशीच्या जवळ जवळ दहाबारा  फूट लांब व दीड फूट रुंदीच्या पाचशेहून अधिक पायऱ्या व एकदम सर्व पायऱ्या चढून दम लागेल म्हणून मध्ये शंभर फूट लांबीचे सपाट भाग (लंबक) देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत नेतात.प्रत्येक सपाटीच्या सुरवातीस दोन बाजूस सुंदर संगमरवरी पुतळे. त्यात जय विजय अधिक लक्षात राहणारे.

पहिल्या सपाटीवर उजव्या बाजूस वळले तर अतिशय सुंदर वस्तुसंग्रहालय दिसते. महाराजांनी देशोदेशीच्या मनमोहक,ऐतिहासिक वस्तूंचा केलेला संग्रह येथे अतिशय कलापूर्णतेने जतन केला आहे. त्यात वेगवेगळ्या धर्तीचे पुतळे,राजा रविवर्मा, धुरंधर, आलमेलकर अशा निरनिराळ्या प्रसिद्ध चित्रकारांच्याव शिल्पकारांच्या कलाकृती, नाणी, भांडी अशा अनेक वस्तूंचा संग्रह केलेला आहे. त्या इमारतीसभोवतीच्या बागेतही अनेक संगमरवरी पुतळे आहेत. त्यात एक उल्लेखनीय म्हणजे सहा ऋतूंचे संगमरवरी पुतळे व प्रत्येक पुतळ्याखालील चबुतऱ्यावर त्या ऋतूचे वर्णन करणारे काव्य सुंदर अक्षरात कोरलेले !

वानगीदाखल एकच काव्य देतो

हेमंत आला तशी थंडी आली
घेऊन ऊर्णास निवारियेली
शेकावया शेगडी पेटवीली
बाला सुखाने बहू शोभवीली

व चबुतऱ्यावर समोर शेकोटी पेटवून शेकत बसलेल्या बालिकेचा सुंदर पुतळा.

मूळपीठ डोंगराकडे न वळता डाव्या बाजूला वळल्यास गावात प्रवेश व्हायचा . सुरवातीस त्यावेळी भव्य वाटणारी इमारत होती "त्र्यंबक कलाभवन " असे तिच्यावर कोरलेले होते. ते एक प्रकारचे कलादालन होतें. येथेही आवारात अनेक संगमरवरी पुतळे व आतल्या भिंतीवर काही सुंदर पेंटिंग्ज टांगलेली होती.नंतर ती इमारत शैक्षणिक कामासाठी वापरण्यात येऊ लागली.त्याच्यापुढील भाग पंचवटी. त्यात एक सुंदर राममंदीर शिवाय महाराजांच्या वडिलांची समाधी होती. पंचवटीच्या पुढे आले की बाजाराची जागा इथे आठवड्याचा बाजार मंगळवारी भरत असे. तेथून पुढे एक छानशी बाग होती. तिला विशाल बाग असे म्हटले जाई . मध्यभागी डाक बंगला होता व बाग विविध फुलांनी फुललेली असे. तसेच सरळ पुढे आल्यावर मोठा तलाव लागतो. असे दोन तलाव शेजारी शेजारी होते पण आता त्यातील एकच पाण्याने भरलेला असे. या तळ्याच्या काठी आमची प्राथमिक शाळा होती.

नगराच्या मध्यभागी राजवाड्याशेजारी यमाई देवीचे गावातील मंदीर आहे. समोर एक उंच दीपमाळ व एक छोटी दीपमाळ.संस्थानची राजधानी असल्याने कारणपरत्वे निघणारा छबिना आणि दसरयाचे सीमोल्लंघन इतरत्र पहायला न मिळणारे हे सोहळे गावकराना मोठ्या उत्साहाचे असत. छबिना म्हणजे वाजत गाजत देवीचा मुखवटा गावात मिरवीत नेणे त्यामुळे गावातील सर्व प्रजाजनांना देवीचे दर्शन स्वत:च्या घरासमोर घेता येत असे.जणु देवी प्रत्येक घरात पायधूळच झाडत असे.आणि आलेल्या दैवी सुवासिनीची ओटी भरण्याची सुवासिनींची इच्छा पुरी होत असे.पौष महिन्यात हा छबिना अधिक थाटामाटाने निघत असे.अग्रभागी संस्थानचे दोन सजवलेले हत्ती,त्यांच्यामागे चार घोडे व त्यावर ऐटीत बसलेले घोडेस्वार,त्यातील मागील घोड्यांवर दोघे राजपुत्र,त्याच्यामागे दोन सांडणीस्वार आणि त्यापाठोपाठ नगारा, शिग,चौघडा,ढोल सनई,ताशा अशा वाद्यांच्या गजरात आई अंबाबाईची पालखी येताना दिसत असे. हा सगळा सोह्ळा पहाण्यासारखा असे.

दसऱ्याचा सणही मोठा वैशिष्ट्यपूर्ण असे.दसऱ्याच्या पूर्वी मूळपीठवर यात्रा भरायची आणि अष्टमीला महाराज स्वत: येऊन पेढे ,बत्तासे, खोबरे उधळायचे आणि ते तुकडे वेचण्यास मुला माणसांची झुंबड उडायची.दसऱ्याच्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास सजवलेला हत्ती वाड्यासमोर यायचा.वाड्याच्या प्रांगणात सैनिकी कवायत व्हायची आणि त्यानंतर ढोलाच्या तालावर बॅंडपथक "जय अम्बे हो प्रतिनिधिस सुचिर सुखदा "हे गीत वाजवले जायचे आणि सजवलेल्या हत्तीवरील अंबारीतून महाराजांची स्वारी शिलंगणासाठी निघायची.अंबारीत लहान राजपुत्र अगर पुत्री यांपैकीही कोणी तरी असायचे.त्याचबरोबर छबिन्याच्या मिरवणुकीचा बहुतेक जामानिमा असायचा.ही मिरवणूक गावातून मूळपीठ देवीच्या डोंगराच्या डाव्या बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत जायची.

त्या जागेवर सोने म्हणून वाटायच्या आपट्याच्या डहाळ्यांचा ढीग रचलेला असायचा.तसेच मैदानावर नेमबाजीसाठी पत्र्याचे डबे टांगून ठेवलेले असत.काही विशिष्ट अंतरावरून त्या डब्यांवर बंदूकीच्या गोळ्या झाडण्यात येत.गोळी कोठे लागली हे आम्हाला क्वचितच कळे पण त्यानंतर शिंग फुंकले जाई आणि सगळे आपट्याच्या डहाळ्यां वर तुटुन पडत आणि त्यात मिळालेल्या पान किंवा डहाळी तुऱ्यासारखी आपल्या शिरोभूषणात ऐटीने खोचत.हा सीमोल्लंघनाचा भाग झाल्यावर पुन्हा मिरवणूक वाड्यापर्यंत येऊन कऱ्हाडदेवीसमोरील मंडपात सर्व मानकरी व प्रजाजन जमा होत.  प्रथम महाराजांकडून सोन्याचे (आपट्याची पाने) आदान प्रदान होत असे.त्यानंतरदेवीसमोर राजगायक गायन सादर करीत.पं.अनंत मनोहर जोशी (पं.गजाननबुवा जोशी यांचे पिताजी ) हे राजगायक होते.पण आमच्या काळात वयोमानपरत्वे ते निवृत्त झाले होते

राजवाड्यात स्थापन केलेल्या देवीला कऱ्हाड देवी असे नाव होते त्या देवीसमोरील मंडपसद्दृश्य जागेत आषाढ मासी महिनाभर कीर्तन महोत्सव होत असे.त्यात महाराज स्वत: कीर्तन करत त्यांचे कीर्तन पहाण्याचा योग मला आला नाही पण अनेक प्रसिद्ध कीर्तनकार तेथे येत तसेच गावातील लहान मोठ्या कलाकारांनाही कीर्तन करण्याची संधी मिळत असे.पं.गजाननबुवा जोशींच्या व्हायोलीनवादनाची सुरवात अशीच महाराजांच्या कीर्तनास करावयाच्या साथीतूनच झाली.

या मंदिराच्या उजव्या बाजूस एक मोठा मंडप ज्यास नवरात्र मंडप म्हणत. नवरात्र मंडपात होणारी नाटके आणि इतर कार्यक्रमही मोठे रंगतदार असत आणि त्यातील महत्वाच्या कार्यक्रमास महाराज स्वत: उपस्थित रहात.महाराजांचे चिरंजीवही कधी कधी या नाटकात भाग घेत आणि अतिशय सुंदर अभिनय करत.महाराज स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यानी  रामायण महाभारतातील प्रसंगावर काढलेली अतिशय सुंदर चित्रे अजूनही यमाई मंदिराची शान वाढवतात.

पंचवटीतील राममंदिराशेजारी समाधीस्थळावर असलेल्या मोठ्या सभामंडपात अनेक नामवंत व्यक्तीची व्याख्याने झाली,त्यात फक्त आचार्य प्र.के अत्रे सोडले तर त्यावेळचे सर्व ख्यातनाम लेखक,वक्ते येऊन गेले.आचार्य अत्रे यांनी मात्र "साष्टांग नमस्कार " हे सूर्यनमस्काराची (महाराजांच्या मते) कुचेष्टा करणारे नाटक लिहिल्यामुळे त्याना संस्थानात प्रवेशबंदीच होती.त्यामुळे अत्रे औंधात प्रथम आले "श्यामची आई" या त्यानी सानेगुरुजींवर काढलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पण ते महाराजांच्या निधनानंतरच !

सर्वत्र सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या कालावधीत भरणारी शाळा संस्थान खालसा होण्यापूर्वीच्या काळात मात्र सकाळी ८ ते ११ व दुपारी दोन ते पाच अशी भरत असे.सकाळीप्राथमिक शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या इमारतीच्या पटांगणात उभे राहून प्रार्थना व मनाचे श्लोक म्हटले जायचे .प्रार्थनेचे वैशिष्ट्य हे की प्रत्येक वाराची प्रार्थना वेगळी असे. सोमवारी "नमन प्रभुपदा " तर मंगळवारी "मंगल दिन हा " आणि बुधवारी "वंदन त्या ईशा" या तीन प्रार्थना अजून आठवतात.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रार्थनांना वेगवेगळ्या रागदारीतील चाली असत.वर उल्लेखलेल्या प्रार्थना झिंझोटी,बिहाग आणि भीमपलास या रागात संगीतबद्ध केलेल्या होत्या.

 सकाळच्या शाळेतील मधल्या सुट्टीत राजवाड्याशेजारील यमाई देवीच्या मंदिराच्या भव्य मंडपात शाळेतील सर्व विद्यार्थी सूर्यनमस्कारासाठी जमत आणि त्यांच्या मंत्रोच्चाराने मंडप दणाणून जात असे. दुय्यम शिक्षणाची शाळा श्रीयमाई श्रीनिवास विद्यालय या नावाने प्रसिद्ध होती आणि या शाळेत अतिशय प्रसिद्ध व्यक्तींनी शिक्षण घेतले. त्यापैकी एक म्हणजे कविवर्य ग. दि. माडगुळकर. याच शाळेत "गुरुदक्षिणा" या नाटकातील त्यानी केलेल्या वक्रदंताच्या भूमिकेचे राजाने कसे खदखदा हासून कौतुक केले व त्याना " बाळ तू टाकीत जा " असा सल्ला दिल्याचे त्यानी आपल्या "औंधाचा राजा " या लेखात उल्लेख केला आहे. या शाळेतच शिकलेले दुसरे महनीय व्यक्तिमत्व म्हणजे पां. स. तथा सानेगुरुजी. भारताचे अनेक ठिकाणी राजदूत म्हणून राहिलेले बॅ. अप्पासाहेब पंत हे तर महाराजांचे पुत्रच असल्यामुळे याच शाळेत शिकणार हे उघडच होते. याशिवाय "तराळ अंतराळ " या आत्मवृत्ताचे लेखक , मराठवाडा विद्यापीठाचे एके काळचे कुलगुरू डॉ. शंकरराव खरात हे याच शाळेचे विद्यार्थी.ग. दि. मांचे बंधू व्यंकटेश हेही काही काळ या शाळेत शिकले.

हायस्कूलमध्येही शाळा भरताच प्रार्थना होत असे ती म्हणण्यासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक त्यातल्या त्यात मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या आणि सरस्वतीचे मोठे तैलचित्र लावलेल्या सरस्वती हॉलमध्ये जमत.हायस्कूलमध्ये गेल्यावर जी प्रार्थना आम्ही सरस्वतीवंदना म्हणून म्हणत होतो ती म्हणजे अलिकडे "आलाप" या १९७७ मध्ये निघालेल्या अमिताभ बच्चन यांच्या हिंदी चित्रपटातील " माता सरस्वती शारदा " हे गीत ! आश्चर्य म्हणजे शाळेच्या सुरवातीपासून हे गीत ज्या चालीवर गायले जात होते तीच चाल " आलाप" मध्येही वापरण्यात आली आहे. शाळेकडून विद्यार्थ्यांना द्यावयाच्या प्रगतिपुस्तकावर तसेच संस्थानात तयार होणाऱ्या वह्यांवर छापलेले असे " शील, शरीर , अध्ययन " आणि " योगः कर्मसु कौशलम "  संस्थानचा छापखाना नगरातच  होता. याच छापखान्यात पं. सातवळेकर यांचे " कल्याण " मासिक छापले जायचे.

शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहाची सोय होती. याच वसतीगृहात सानेगुरुजी व ग. दि. मा. यानी काही दिवस राहून अंबाबाईच्या परडीतला प्रसाद म्हणजे वसतीगृहातील भोजन घेतला होता. भोजनगृहात एक फळा ठेवलेला असे व त्यावर दररोज एक श्लोक लिहिलेला असे. स्वतः महाराज कधीतरी भोजनगृहात येत व एकाद्या विद्यार्थ्याला श्लोक म्हणायला सांगत.

अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद या एवढ्याश्या छोट्या गावाशी संबंधित सहा व्यक्तींनी भूषवले. त्या म्हणजे स्वतः महाराज बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी, ग. दि. माडगूळकर , व्यंकटेश माडगूळकर. गो. नी. दांडेकर ,शंकरराव खरात व ना. सं. इनामदारं !

वस्ती बरीचशी जातिनिहाय असली तरी मिश्र वस्ती बऱ्याच ठिकाणी असे. ब्राह्मण आळीतच अगदी दोन ब्राह्मणांच्या घराच्या मध्ये एक मशीद होती. आम्ही काही काळ राहत असलेला वाडा ब्राह्मणाचा असून गुरव गल्लीत होता, तर आमच्या शेजारी मोठा वाडा होता त्याचे मालक मुसलमान होते व दिवाळीचा सण ते आमच्यापेक्षा अधिक उत्साहाने साजरा करत आणि रमजानला शिरखुरमा खायला त्यांच्याकडे ज्या अगत्याने बोलावत तितक्याच उत्साहाने दिवाळीच्या फराळालाही.दिवाळीत त्यांचा किल्लाही प्रेक्षणीय असे. त्यांच्या शेजारील गृहस्थ गोंधळी होते शिवाय ते शिंपीकामही करीत आणि त्यावर ताण म्हणजे पं. अनंत बुवा जोशी यांच्या सेवानिवृत्तीनंतर दसऱ्याला देवीपुढे शास्त्रीय गायनासाठी हजेरी लावण्याचा मानही त्याना मिळाला होता, तसेच महाराजांच्या कीर्तनास हार्मोनियमची साथही ते करत.

शतायुषी रामूअण्णा किर्लोस्कर,वेदमहर्षी पं.सातवळेकर,गोनीदा,ना.सं.इनामदार, यांच्या वास्तव्याने औंधनगरी पुनीत झाली होती.दुर्दैवाने महाराजांच्या नंतर औंधात रहाण्यात त्याना स्वारस्य उरले नाही. पं.सातवळेकरांनी पारडीस तर गोनीदांनी तळेगावला प्रस्थान केले.किर्लोस्करांना  संस्थानातील कुंडल( आताचे किर्लोस्करवाडी) या गावातील जमीन कारखान्यासाठी महाराजांनी उपलब्ध करून दिल्यामुळे लक्ष्मणरावांचे मोठे बंधू रामूअण्णा मात्र औंधात राहिले आणि त्यांच्यामुळे अनेक प्रसिद्ध किर्लोस्करांचे पाय औंधाला लागले.पण त्यांच्यानंतर मात्र औन्धात महनीय व्यक्तींचे वास्तव्य अपवादानेच घडले.  आता त्या  व्यक्ती तर  नाहीतच पण  काही प्रथा आणि स्थळेही  नष्ट झाली  आहेत त्यामुळे म्हणावे लागते " असेही  एक गाव होते"