वैषम्य

मळक्या; उरात जखमा; ते लेकरू अडाणे
शामल अशांत वेळी मातेस बिलगलेले
माता-कुशीत दूजे त्याचे अकांत रडणे
पोटात कोंब तोही; सारे कसे भुकेले

डोळ्यात खोल करुणा स्वामित्व लोपलेले
ना गोत; ना किनारा आशेत हरवलेले
व्याकूळ काळजाचे; हे; रोप दीनवाणे
परसात वेदनेच्या बांधून शकट गेले

अस्वस्थ मी भिडस्त माझेच गाइ गाणे
ओठी चणे दयेचे, अवघे दुरून पाही
डोहात आंसवांच्या चंद्रसवे नहाणे
देहास ज्ञात नव्हते निर्वस्त्र हे रहाणे

ही जात माणसांची कैसी अशी विखारी
बांधे कुणी मनोरे कोणी न पायरीही
मातीतले स्वरूप मातीस ना विचारी
देठास विषम काटे सुमनेहि पाठमोरी

........................अज्ञात