तुम्हीच तर ठरवायच

जाईच्या मांडवात
का काँक्रिटच्या तांडवात
शंभर कौरवात का
फक्त पाच पांडवात
कुणी कुठं रहायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

पिझ्झा कोकचा आहार
का बर्गर चिप्स बहार
मऊ भात पिठल्यावर
गावरान तुपाची धार
पोट कसं भरायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

रोज दारू पिण्यात
अन् बेहोष जगण्यात
का विठूच्या भजनात
देह भान विसरण्यात
सूख कशात बघायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

मंत्री पदाचा साज
कानाखाली आवाज
का अमरण उपोषणाचा
आण्णाजींचा रिवाज
कुणाकडून शिकायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

दीर्घायुष्यी बनणे
अन् पिकता पान गळणे
दवबिंदूसमान थोडंच
पण  चमकत चमकत जगणे
ध्येय काय ठेवायचं?
तुम्हीच तर ठरवायचं

स्मरायचाय गुरूमंत्र
की जुनेरं प्रेमपत्र
जगत जगत शेवटचं
आयुष्याचं सत्र
कशात किती रमायचं
तुम्हीच तर ठरवायचं

निशिकांत देशपांडे.  मो.क्र. ९८९०७ ९९०२३