काव्यातच मी हरवुन जावे.....

काव्यातच मी हरवुन जावे.....

प्रापंचिक या असो अडचणी
शरीर, मन हो अन्य दडपणी
क्षणात तेथुन हळुच निघावे
काव्यातच मी हरवुन जावे.....

जरी जवळ ना शीत चांदणे
फुले, निर्झरे, हिरवी कुरणे
शब्दातुन येता सामोरी
काव्यातच मी हरवून जावे.....

असो प्रियेशी लटके भांडण
वा कोणाशी कधी दुर्भाषण
ओंजळीत या सौख्य वसावे
काव्यातच मी हरवुन जावे.....

सुहृदांची ती काव्ये वाचीत
नवीच होते दुनिया अलगद
चांदण्यात त्या मुक्त फिरावे
काव्यातच मी हरवुन जावे.....

जुनी असो वा नूतन काव्ये
काव्यगुणरसे शोभित पुष्पे
सुगंधात या नित्य नहावे
काव्यातच मी हरवुन जावे.....