काहीतरी हरवलंय !

बऱ्याच दिवसांपासून तो काहीतरी शोधत होता. पण नक्की काय शोधायचं आहे हेच त्याला माहीत नव्हतं. पण त्याचं काहीतरी हरवलं मात्र नक्की होतं.
घरचं अन्न गोड लागत नव्हतं आणि बाहेरचं खाऊन खाऊन वीट आला होता. पूर्वी मित्रांबरोबर जाऊन दुर्गांची कॉफी प्यायला खूप मजा येत होती. म्हणून तो बऱ्याच वेळेस तिकडे गेला. बघायला लागला की कॉफी पिताना काही सापडतंय का. पण आता ती कॉफी पण पाणचट वाटायला लागली होती. पूर्ण ग्लास पण कसाबसा संपत होता. त्यात बर्फाचे काही तुकडे लागायला लागले होते.

त्याला वाटलं की बुद्धिबळाचा सेट जिथे ठेवलाय तिथे काहीतरी सापडेल. तो बुद्धिबळाचा पट आता धुळीनं माखला होता. त्यानं सोंगट्यांच्या खोक्यात पाहिलं. काळ्या राजाच्या डोक्यावर असलेला तुरा अगदी तकलादू झालेला. त्यानं पट मांडला. नेहमीप्रमाणे स्वतःशीच खेळ मांडला. प्रत्येक चालीत पूर्वीइतका जोष वाटत नव्हता. प्रत्येक चाल सुद्धा खूपच कमकुवत वाटत होती. शेवटी तोच जिंकला. पण हरला पण तोच.

मग त्यानं कपाटातून खगोलशास्त्राची पुस्तकं बाहेर काढली. त्या पुस्तकान्च्या पानांमध्ये तो धुंडाळायला लागला काही सापडतंय का. त्या पुस्तकांना नेमकी आता वाळवी लागली होती. सगळी पुस्तकं अगदी फेकून देण्याच्या अवस्थेला आली होती. ती साफ करायला उशीर झाला होता. ती फेकून देण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता.

शाखेत बघूया काही मिळतं का, असं म्हणून तो शाखेत गेला. पण तिथे पण त्याला काहीच मिळालं नाही. दिसली ती फक्त मोकळ्या मैदानावरची शांतता. तो हताश मनानी परत फिरला.

त्याला वाटलं कॉम्प्युटर मध्ये एखादी फाइल शोधू. किंवा नेट वर शोधू. गूगल काही न काहीतरी प्रतिसाद देईलच. काहीतरी मिळेलच सर्च करून. तो घरातल्या कोम्प्युटरपाशी गेला. पाहतो तर मॉनिटर वर खूप धूळ लागली होती. मॉनिटरवर चिकटवलेला गणपती दुर्लक्षित झालेला. कीबोर्ड वरची बटण अडकत होती. कॉम्युटर जरा झटकून मग त्यानं गूगल उघडलं. पण अपल्याला काय शोधायचं आहे तेच त्याला माहीत नव्हतं. देणार तरी काय तो गूगल ला सर्च करण्यासाठी !
मग तो म्हटला की जरा एफ् बी वर टाईमपास करू. पण फेसबुक आणि जीमेल ची नोटीफ़िकेशन्स आता जुनाट आणि कंटाळवाणी वाटत होती. शेवटी त्यानं हताशपणे संगणक बंद करून टाकला.

ऑफिस मधल्या कामाचा पण खूप कंटाळा आलेला त्याला. तेच तेच कंटाळवाणं काम करून बोर झालेला. विरंगुळा म्हणू कॅरम खेळायला गेला. कॅरम सुद्धा आता कितीही बोरिक पावडर ओतली तरी खडबडीतच वाटत होता.

खूप शोधाशोध करून त्याच्या हातात निराशाच येत होती. लोकांच वागणं बदललंय हे त्याला कळून चुकलेलं. पूर्वी आइच्या हतचा जो मार खाल्ला तो त्याला त्या क्षणाला आठवत होता. पण आज तर आईचे धपाटेही मिळत नव्हते आणि ताई बरोबर पूरवीसारख भांडता येत नव्हतं. कामामधल्या चुका पाठीशी घालणारा पूर्वीसारखा मित्र वजा मॅनेजर पण आता ऑफिस मध्ये नव्हता.

दिवसेंदिवस त्याची घुसमट वाढतच होती. नक्की काय हरवलंय ते अजूनही समजत नाहीये त्याला. कोणती व्यक्ती ? छे छे. अजिबात नाही. कमीत कमी त्याच्या ओळखीतलं कोणीही त्याच्याकडून हरवलं नव्हतं.
कदाचित आकाशातले ग्रह आणि तारे असतील. किंवा मग बुद्धिबळाच्या सोंगट्या असतील. कदाचित ते शाखेतल्या लहान लहान शिशूंचा निरागसपणा असेल. रस्त्यावर खेळताना ज्या फळीन तो उंचच्या उंच छकड्या ठोकायचा ती फळी हरवली असेल. किन्वा मग "जावा" ची पूर्वीसारखी असणारी जादू तो शोधत बसला असेल.
अजूनही त्याला काही उमगत नाही. खूप दिवसांपासून हा त्याचा शोध चालूच आहे. पण तो हार मानणारा नाही. त्याची जिद्द हा शोध संपवल्याशिवाय ऐकणारी नाही.