समुद्र किनारा

ती मोहक रात्र, तो पूर्ण चंद्र
अजूनही आठवतो तो विशाल समुद्र
त्याच्या संथ आणि स्वच्छंदपणात,
तो बोलत होता, सांगत होता काहीतरी
भूतकाळ आणि भविष्य मग उमलत होते अंतरी

माझे मन मलाच नव्याने उमलत होते
भावनांचा खेळ, मन मनाशीच मांडत होते
नव्या आकांशांचे पंख मिळत होते
मिठीत सामावलेल्या क्षितिजाचे समाधान वाटत होते
त्याच्या विशालतेत लपलेल्या संथपणासमोर
स्वतःचे अस्तित्व मात्र लहान वाटत होते

रात्र कधी सरूच नये असे वाटत होते
त्या मधुर कल्पना काळजात रुतू देत
भावनांच्या असंख्य लाटा बंद डोळ्यात साठू देत
हातात हात न घेता माझ्या हास्यातून तिला सर्व कळू देत
हि गोड आठवण अशीच कायम संगतीला राहू देत

त्याच्या पात्रात अहंकार मिटत होता
मनात प्रेम आणि वात्सल्याचा अंकुर फुटत होता
कोणी येईल, कोणी असेल, सगळे काही ठीक होईल
परत नवा प्रकाश, नवा सूर्य उगवेल
मन मनालाच सांगत होते
विलक्षण समाधान आणि कडवा आनंद
हळूच स्मित हास्यातून उमलत होते