कठोपनिषद तिसरी वल्ली

चयन अग्नीचे केले ऐशा ब्रह्मज्ञानी  जनांहीं ।

सांगितले जे सांगतो शब्द अधिक तो नाही ॥१॥

शरीरात या बुद्धिगुहेमधिं असती दोघे बसले।

जीव शिव असे स्वस्थ त्यांत शिव न करी कर्मची कसले ॥२॥

जीव भोगितो कर्मफलातें त्यातें नच शिव शिवतो ।

छाये ऐसा म्हणुनी जीव तो प्रकाशापरी शिव तो ॥३॥

येता काही आड, शकेना प्रकाश पुढती जाया ।

तेणें भासे तम तेथ तया बोलती लोकी  छाया ॥४॥

पार पसरता प्रकाश सारा तेथे न उरे काही ।

मिळोनी जगती, छाया  म्हणुनी पदार्थ एकही नाही ।।५॥

छाया लोपे प्रकाश होता ज्ञानोदयीं तसाच ।

लय पावुनियां शिवीं जीव तो उरे एक शिव साच ॥६॥

अज्ञानाचा पडला जोंवरी झटुनी दूर न सारी ।

छाये ऐसा स्वतंत्र भासे तोच जीव संसारी ॥७॥

अनुभव घेउनी यापरी त्याही कथिली उपासना ही

साकल्ये म्या कथिली तुज ते, त्यांत न्युनता नाही ॥८॥

नव्हे तयांचा केवळ बाळा! अनुभव माझाही तसा ।

त्यांचे ऐसा ज्ञानलाभ तो झाला माते हितसा  ॥९॥

अग्नी होतसे, चयन तयाचें करिता यजमानासी ।

इष्ट सिद्धीला सेतू भवतलीं  ऐसा भीती सर्वथा नाशी  ॥१०॥ 

      ब्रह्मज्ञानची सेतू भवजलीं त्यावरी चढोनी जावे ।

निजमन निर्भय ठेवावे की न लगे येथ भिजावे  ॥११॥

दुर्लभ तरी बा! अलभ्य नोहे ज्ञानकला ही सकलां ।

बुद्धिबलानें केवळ अपुल्या यम ती जाणो शकला  ॥१२॥

पथ संसृतिचा आक्रमावया निजदेह रथापरी तो ।

स्वर्गा, नरका, मोक्षातें वा गमन कुठे तरी करतो  ॥१३॥

जीवात्मा हा बसुनी राहिला यजमान तसा वरती ।

सारथी म्हणुनी बुद्धी बैसली यथेच्छ रथ ती परती ॥१४॥

शरीर रथ हा, अश्वांऐसा ओढी इंद्रियगण तो ।

मन हे त्यातें जोडी म्हणून त्यातें रशना म्हणतो ॥१५॥

रुपरसादिक विषयांमधुनी आत्मा निघावयाचा ।

विषय सर्व ते, म्हणुनी म्हणती, मार्गची होय तयांचा ॥१६॥

रथ हा यापरी चाले आता कथितों तुजला मर्म ।

न करी आत्मा स्वयें  एकला लोकी स्वल्पही कर्म ॥१७॥

देहेंद्रियगण यांसह आत्मा तेणें कर्म करावे ।

न्यायेंची दिसे यास्तव त्यांसह तेणें सर्व भरावे  ॥१८॥

केवळ आत्मा कर्ता नोहे नोहे भोक्ताही तसा ।

तत्त्वज्ञांचा सिद्धांत असा कथितों तुजला हितसा  ॥१९॥

विज्ञानाचा लेश न ज्याला ज्याचे मन वश नाही ।

सारथी होता स्वस्थान च्युत कोण धरी रशना ही? ॥२०॥

दुष्ट ह्याही ज्यापरी फिरता  सारथिला न बघावे ।

इंद्रिय गण तो अवश तयाचा त्यापरी  यथेच्छ धावे  ॥२१॥

विज्ञानाचा लाभ होउनी होई मन वश जरी ते ।

अबल इंद्रिये सकलांचेंही बल काय तिथे करितें? ॥२२॥

रथी बसुनियां जसा सारथी रशना ओढी सोडी  ।

इष्ट तयांचें वळखुनी चाले तशी हयांची जोडी     ॥२३॥

   
सकल इंद्रिये असती बळा! वश ज्या अश्वापरी ती ।

ग्रहण विसर्जन विषयाचे मग इच्छेनुसार करिती  ॥२४॥

मन वश नाही अशुची जाहला जो नर दुरिताचरणें ।

विज्ञानाची त्याचे ठायी कैची आशा करणे!      ॥२५॥

ज्ञानावांचुनी तेणें कैसे मोक्षपदातें जावे ।

तेणें काले मरोनी जावे कोठे तरी उपजावे ॥२६॥

शुद्ध राहुनी मन वश ठेवुनी ज्ञानामृत जो प्याला ।

मोक्ष मिळोनी जन्ममृत्यूचा फेरा सुटला त्याला   ॥२७॥

ज्ञानबलाने अविलंबें तो त्या स्थानातें पावे ।

प्राप्त जाहल्या जेथोनी कधी लागे नच परतावे ॥२८॥

सारथ्य करी रथी बसुनियां जयाचिया विज्ञान ।

पवित्र हृदयी अखंड नांदे तसेच समाधान      ॥२९॥

विश्वव्यापक परमात्मा जो पद जे श्रेष्ठ तयाचें ।

देहरथांतुनी तेणें तेथे राहायचे               ॥३०॥

पथिं न थांबता अडखळता वा धडधडां रथ चाले।

इष्ट आपुलें स्थान निश्चयें गाठी स्वल्पाची काले ॥३१॥

विवरुनी पुनरपी तुज हे कथितों आत्मा हा यजमान ।

बुद्धी, इंद्रिये, मन यांचा गण केवळ सेवक जाण ॥३२॥

पुरी म्हणो वा देहातें या तेव्हा इंद्रियगण तो ।

जाया याया सदैव उघडी दारे असती म्हणतो ॥३३॥

ज्ञान इंद्रियां शब्दस्पर्शादिक विषयांचे आहे ।

इंद्रियांचियां पार म्हणोनी गणविषयांचा राहे  ॥३४॥ 
श्रवण सेविती शब्दांते वा स्पर्शातें  की आंग ।

मनाविणें परी तयां इंद्रियां कार्य होय का सांग? ॥३५॥

इंद्रियांचियां द्वारा यापरी बोध मनाला व्हावा ।

बोधाचा संभार मने मग बुद्धीपुढे लावावा     ॥३६॥

यजमानाच्या आज्ञेवांचुनी न करिती कार्ये कोणी ।

अनुष्ठिती ते कार्य इंद्रिये आज्ञा ती ऐकोनी    ॥३७॥

स्वयें न आत्मा आज्ञा करी परी कार्ये करावयाची ।

निश्चय होता पोचवी वार्ता सारी मनची तयाची ॥३८॥

बोधन करुनी मन विषयांचे उगा बुद्धीशी राहे ।

आज्ञा होते काय तयाची जणों वाट की पाहे   ॥३९॥

कार्य असे की अकार्य याचा बुद्धी विवेक करी ती ।

स्वमत निवेदी आत्म्यालागीं नित्याची हे रीती     ॥४०॥

अनंत जन्मांतरिचे असती मतिवरी जे संस्कार ।

तदनुरुप ती करी उचिताचा वा न करी पुरस्कार  ॥४१॥

बुद्धीद्वारा मनासी सुचवी आत्मा मग  कामे ती ।

निरोप देता मने, इंद्रिये सर्व सिद्धीला नेती     ॥४२॥

निरुपावया मजसी लागला क्रम हा जितुका वेळ ।

तितुका न तया कामी लागे हा तो त्यांचा खेळ  ॥४३॥

इंद्रिय, त्याचे अर्थ, मन तसे, मती हे सर्वही दास ।

वरिष्ठ असती क्रमे जयांचा अखंड देही वास      ॥४४॥

त्यावरी आत्मा, महान म्हणती ज्या हिरण्यगर्भही जागे ।

प्रथम उपजुनी रचिली जेणे सर्व सृष्टी हे मागे ॥४५॥

          
अव्यक्तात्मा श्रेष्ठ तयांहुनी सर्वांवरी करी पेणें ।

क्रम हा पुढला सहैव कथिला पूर्ण निरूपण जेणे ॥४६॥

पुरुष त्याहुनी श्रेष्ठ असे वा! तो परमात्मा जाण ।

सीमा गती वा परम असे तो श्रेष्ठ न त्याहुनी आन ॥४७॥

ज्ञान तयाचें न कुणा, आत्मा भुती सर्व असोनी ।

गूढ असे तो नुमगे नयनां करिता शोध कसोनी ॥४८॥

श्रेष्ठ तशी मती सूक्ष्म जयाची सूक्ष्माचे ज्या ज्ञान ।

बोध तयाचा निश्चित होउनी त्या होय समाधान ॥४९॥

मती सूक्ष्म तशी व्हाया कथितों उपाय तुजला  भावे।

ज्ञान तयाचें जेणे बाळा! सहजची तुज लाभावे   ॥५०॥

देहरथावरी  सारथ्य करी बसुनी निरंतर बुद्धी ।

यास्तव किजे तिची प्रयत्ने सर्वां आधी शुद्धी   ॥५१॥

सारथी चुकता आड जाउनी उलटाच पडावा ।

क्लेश रथिला व्हावा, किंवा रथ मार्गांत अडावा ॥५२॥

इष्ट स्थल ते तिने रथिचें जाणोनी घ्यावयाचे ।

रथ, हय रक्षित कौशल्याने तेथेच न्यावयाचे   ॥५३॥

जोडायचे हय रशनेशीं तरी चाले रथ पथीं तो ।

लय पावावी तेवी इंद्रिये मनी, युक्ती तुज कथितों ॥५४॥

बुद्धिमधीं लय तेवी मनाचा अव्यक्तात्म्यांत मती ।

पर पुरुषी लय किजे त्याचा निश्चित पथ हे गमती ॥५५॥

बुद्धी पावतां लय आत्म्याशी कर्मांनुरूप जरी ती ।

अभ्यासे तरी सावध होउनी सारथ्य होय करिती ॥५६॥          
विषय पाहता मोहित होउनी ते मिळावायासाठीं ।
इंद्रियगण तो धावू लागे हय ऐसा त्या पाठी  ॥५७॥
लक्ष न इष्ट स्थलिं जरी ठेउनी सारथी दक्ष न पाहे।
हय फिरती तो कसाही रथ तरी अखंड चालतची राहे ॥५८॥
मंद म्हणुनी जरी हय बदली ते मिळवी वा नवाच ।
सवय हयाची न सुटे  तोवरी सिद्धीस वानवाच ॥५९॥
वेतन वाढो, कामही वाढो, चिंता न सेवका हि।
धनव्ययें धनी जरी रोडला त्यास नसे शंकाही ।।६०॥
धनी म्हणोनी दक्ष असावा तो सारथी असाची ।
आवरोनी घे कामे हयशीं तरी प्रगती मग साची ॥६१॥
बसावयाला रथ तो हवा हवी हयांची जोडी ।
इष्टस्थानीं पोचे तोवरी कोण तयातें सोडी ॥६२॥
विषय हा मुळी पथ सांगितला ज्यातुनी रथ हा जायचा ।
करू ये कसा? विघ्न म्हणोनी त्याग सर्वथा त्याचा ॥६३॥
नाना जन्मार्जित कर्माची माती जे की पडली ।
ऐके ठायी मिळवुनी त्यांची मूर्ती असे हि घडली ॥६४।।
पडतां झडतां भिंतीवरती माती ठायी ठायी ।
लिंपुनिया घर अगत्य अपुलें उभे न ठेविती कायी? ।।६५।।
प्राप्त जाहला, कर्मेची तसा, राखावयाचा देह ।
कर्मावांचुनी उभा न राहे यांत नको संदेह ॥६६॥
कर्मे आली, विषयही आले यापरी जरी तुज पाशी ।
ध्येय अंतरी वागविसी तरी बांधिती का तुज पाशी? ॥६७॥
क्रीडा करिता बालक कंदुक आपटिती भूवर ते।
स्पर्श करुनी तो भुते वेगें तसाच मागे परते  ॥६८॥
इष्ट स्थान मिळे तो फिरतो, स्थिर तो कधी न राहे।
उद्धार करील उचलुनी वाट पुन्हा की पाहे      ॥६९॥
परी मातीचा गोळाक्षितिवरी दिधला जरी टाकोनी ।
तेथे चिकटे, न मुळीच सुटे, उचली ना त्या कोणी  ॥७०॥
प्राप्त विषय ते भोगायचे, ध्येय न विसरायचे ।
कंदुकापरी सहज भवजलीं तेणेंच तरायाचें   ॥७१॥
प्राप्त न होती जगती भोगती न कुणी त्या विषयांस ।
तुज कथितों परी प्राप्त तेच जे मिळती विनाप्रयास  ॥७२॥
'यत्नावांचुनी परी जरी' म्हणसी ' हालेना तो पान ।
देह धारणा कशी करावी जगवावे ते प्राण? ' ॥७३॥
अवश्य  बाबा! देहधारणा; तदुपेक्षा ते पाप ।
मीही जाणतो भक्ष्य न वदनी येउनी पडे अपाप ॥७४॥
तूच सांग मज धडपड जगती देहधारणा का ही? ।
अंतरी त्यांच्या दुजा तिजविणें हेतू नसे का काही?   ॥७५॥
रती मिष्टान्नी नैसर्गिक परी चिंतन अंतरी तेच ।
उदर भरे तरी वाटे याला व्हावे अजूनी रितेच ॥७६॥
आज मिळे ते उद्या मिळावे भेद वरी भू रुचती ।
खातां खातां रुची सौख्याच्या विविध कल्पना सुचती ॥७७॥
स्वास्थ्य निरंतर असो म्हणोनी लागे धनार्जनासी ।
सुखी कुणातें बघुनी करितसे मत्सर इतर जनांशीं ॥७८॥

 करिती   धनार्जन झटुनी कशाची त्या मर्यादा नाही  ।
वेंचिती  बहुविध  भोगी  सारे, विरळची ते दानाहीं      ॥७९॥
 मिळे मेनका तरी आणखी हवी होय रंभा या            ।
ध्यास घेउनी प्रयत्न बहुविध लागे आरंभाया               ॥८०॥
स्त्री स्पर्शावी, अवलोकावी दूर न असो कदाही        ।
भरोनी जाव्या गमे तियेच्या रुपेंची दिशा दाही           ॥८१॥
कितीक समरीं हेतू एक तो की मिळवावी रमणी          ।
धारातीर्थी पतन पावले  लढुनी किती विरमणी             ॥८२॥
स्वास्थ्य निरंतर व्हावे म्हणुनी संपादिली धरा ति         ।
स्वास्थ्य हेच की विलास व्हावे अखंड दिवसा राती       ॥८३॥
भूमीसाठी  समरें  केली  त्या   देवदानवांही                 ।
तीच कल्पना पुढे गिरविली उचलोनी मानवाही           ॥८४॥
व्हावे आपण सार्वभौम की कुणी नसावा अरी तो      ।
 महत्त्व अपुलें वाढवावया धडपड सारी करितो             ॥८५॥
 नव्हे नव्हे ही देह धारणा; प्राप्त नव्हे हे कर्म. ।
देहधारणा बालक करिती न कळुनी आतील वर्म         ॥८६॥
क्षुधा लागतां शिशू मातेशी स्तन प्यायला  जावा ।
करी दृढ धरितां, चुरितां, पिळितां अंतरी नच लाजावा  ॥८७॥
तृप्ती पावतां सोडुनी जाई हांसे, खिदळे, नाचे ।
क्षुधा उठे तो स्मरण अंतरी न तया स्तनपानाचे           ॥८८॥
 कुणी सुंदरी बघुनी म्हणेना करू तिचे स्तनपान ।
 कुरूपही निज मातेपाशी त्या होय समाधान               ॥८९॥

  प्राशन न करी अधिक मिळे  तरी वृत्तिमात्र तो धरितो
।वृत्ती लोपतां कारणांतरीं विषण्ण होई तरी तो   ॥९०॥
भूक लागतां शोधू लागे, मातेला बोलावी
।बोलविता ती स्वयें अन्यदा, तिस परत तो लावी ॥९१॥
देहधारणेवांचुनी भोगी शिशुतें नाही  चाड।
पुरवू लागे वाढे तैसा निजेंद्रियांचे लाड  ॥९२॥
उदरपुर्ती तो यत्नें किजे, वृत्ती नेमिल्या म्हणुनी
।सृष्टी निर्मितां, वर्ण योजिले स्वाभाविक गुण गणुनी  ॥९३॥
सांभाळावे आचार तसे वर्णाश्रमास विहित ।
विसरुनी अपुले ध्येय न जावे होय जयें आत्महित ॥९४॥
क्रमप्राप्त मग विषयभोग ते भोगावे, न त्यजावे ।
इंद्रियासवे आत्मत्वें परी त्यांत न गढोन जावे ॥९५॥
प्रारब्धाचे भोगची यत्ने जरी म्हणसी टाळावे ।
अशक्य हे तो; रागद्वेषी परी मन न विटाळावें ॥९६॥
विषयसुखी सुख मानुनी हर्षे दुःखी विषाद पावे ।
प्राप्त्तिवृद्धिला सुखाचिया मग सहजची तयें जपावे ॥९७॥
विषयी रंगुनी तदर्थ यापरी यत्न करीत जरी सुटला ।
आत्मज्ञानी मनन कराया अवसर त्या मग कुठळा? ॥९८॥
भोग भोगितां आत्मा कर्ता, त्यापरी त्या विपरित ।
बुद्धी होउनी, वागू लागे हे जगतांची रीत ॥९९॥
आत्मदर्शनीं बुद्धी आरसा लागे पुढे धरावा
।मलिन होय तरी; पाहवयाचा यत्न किमर्थ करावा? ॥१००॥     

विवेकोदकें स्वच्छ करीना  मल धुवुनी स्वकरांहीं ।

ज्ञान न होता मरे तोंवरी भोगी लोळत राही       ॥१०१॥

प्रारब्धाचा भोग सरतसे तनू त्यागितां; परी ते ।

संचित वाढे; त्यांतुनी काही तनू सिद्ध नव करितें   ॥१०२॥

नूतन सदनीं जातां अपुलीं संचित धन वसनें ती  ।

जुने सांडिती घर; परी विसर न करिता, संगे नेती ॥१०३

नूतन देही प्रवेश करिता बाळा! जीव तसा रे।

बाहेर पडे पूर्व देहिंचें घेउनी संचित सारे        ॥१०४॥

जन्ममृत्यूची जीवामागे यापरी परंपरा हे।

अनादी आहे तशीच पुढती अखंड चालत राहे ॥१०५॥

विचार करिता अनर्थास या कारण एकची वाटे ।

बुद्धी न पाहे, स्वैर धावता इंद्रियण हा वाटे ।।१०६॥

आधी अपुलीं म्हणुनी इंद्रिये ध्यास जयां विषयांचा।

बुद्धीद्वारा आवरोनियां घ्यावा व्याप तयांचा    ॥१०७॥

आत्मचिंतनी मन लावावे, मतीही तयांसवें ती ।

अर्थासह इंद्रिये स्वभावें त्याच्यामागे येती     ॥१०८॥

आत्मा एकची विषय असावा यापरी सकाळाला हो ।

बाळा! ऐंशी स्थिती हाच मुळी त्या ज्ञानाचा लाहो ॥१०९॥

आप आपल्या विषयी इंद्रिये जरी मगही रहाटावीं ।

कर्तृत्वाची मुळी नसावी जाणीव तया ठावी ॥११०॥

घरी चालता व्यवहार जसा स्वस्थपणाने पाहे ।

प्रसन्नवदनें दीप; न कसली अंतरी चिंता वाहे॥१११॥

तसा असावा अलिप्त देही राहुनी इतरांपरी तो ।
भोग भोगितां न गमावे त्या आपण काही करतो? ॥११२॥
यत्न सिद्धीला जातां मग का हर्ष तया वाटावा? ।
अयशीं कैंचा खेद तरी तया न मुळी जो त्या ठावा ॥११३॥
आत्म्यामाजी लय पावावी यापरिस इंद्रिये ती     ।
बुद्धीद्वारा सावध होती, तरी ती कामा येती        ॥११४॥
तुला न केवळ सकळांलाही माझा बोध असाच ।
उठा! उठा! रे! डोळे उघडा बघा स्वहितपथ साच ॥११५॥
शरण रिघा रे! आचार्यांतें बोध तयांचा उचला ।
ज्ञान करुनी घ्या आत्म्याचे त्या उपाय हा मज सुचला ॥११६।।
बिकट मार्ग हा, शस्त्राची की तीक्ष्ण जणों धारा हे ।
लंघन कुठले? पुरुष कोण रे? निकट उभा तरी राहे ॥११७||
  वीर पुरुष परी तीक्ष्ण याहूनी शस्त्रही धरोन हाती ।
 कौशल्याने तळपत रणी राहती ॥११८।।
 अशक्य म्हणुनी यास्तव कोणी यत्न न सोडवा।
मनी निश्चयुनी अभ्यासाने परमपुरुष जोडावा ॥११९॥
 स्पर्श कराया येना त्यातें, शब्दही कानी न पडे, ।
रूप नसे तरी दर्शन त्याचे कैसें नेत्रांस दर्शन घडे? ॥१२०॥
 जिव्हेनं रस घेऊ म्हणसी परी तो कसा गिळावा? ।
घ्राणाचा का विषय होउनी हुंगायास मिळावा? ॥१२१॥
आदी न त्याला, अंत न त्याला, पावेना चलनातें।
 स्तृष्टी रची जो, त्यांशी याचे जनकत्वाचे नाते ॥१२२॥
 केवळ मतिचा विषय असे तो असे काय तुज ठावे? ।
आत्मज्ञासाठीं बाबा! यास्तव तिने झटावे ॥१२३॥
 ज्ञान तयाचें होता, ठसता, तन्मय होउनी जाय।
स्पर्शाया त्या काळालाही शक्ती असे मग काय? ॥१२४॥
 बोध यमाचा नचिकेत्या हा श्रवणी ज्याचे जातो ।
पढतो वा जो, ब्रह्मलोकी त्या बुध पावे पुजा तो ॥१२५॥
 शूची होउनियां परम गुह्य हे श्राद्धी ब्रह्मसमाजीं ।
ऐकविता ये अनंत फल रे! सत्य वैखरी माझी ॥१२६॥