ध्येयासाठी....

ध्येय उंचावले तशी-
आशावादाने मान टाकली अन
गळालेला तो रस्त्याच्या कडेला जाऊन बसला!
मला जपत, सांभाळत
पुढे जाण्याची त्याची हिम्मत संपली असावी!

संधीसाधू निराशा टपूनच होती
आपल्या सावटाचं घोंगडं घेऊन..
थंड झालं सगळं.
माझ्या गात्रांसहित...

कड्याकपरींतून घुमत,
ध्येयाचा आवाज उमटला
निराशा तर निराशा, पकड तिचा हात आणि गाठ मला!

पुढच्या वळणावर, ओझरतंच दिसलं,
आशावादही आमच्यामागे येत होता-

लंगडत....