प्रेरणा…

प्रेरणा…

माझ्या वहीच्या पानांमधुनी येशील का तू उतरूनी भूवर ।
उपमा-रूपक-छंदांमधुनी सांग सखे तू लपशील कुठवर ।।
 
अंगणात या नीलनभाच्या येती उतरूनी स्वप्नथवे ।
अशाच अनुपम उषासमयी पेरलेस तू स्वप्न नवे ।
स्पंदनांत मग या हृदयाच्या झंकारून तू गेलीस क्षणभर ॥
माझ्या वहीच्या पानांमधुनी येशील का तू उतरूनी भूवर ।।
 
गतप्राण जणू तुजविण होती माझ्या गीतांमधले सूर ।
उदासवाणा चंद्र झुरे मग तारेही जणू विरह आतूर ।
चित्र तुझे शब्दांत रेखिता श्वासही माझे होती सुस्वर ॥
माझ्या वहीच्या पानांमधुनी येशील का तू उतरूनी भूवर ।।

समजून सारे गूज मखमली मनास माझ्या अगम्य तू ।
शब्दस्वरांतून मूर्तिमंत जरी अमूर्त गहन सुरम्य तू ।
तूच प्रेरणा, तूच कल्पना, तूच चेतना भावमनोहर ॥
माझ्या वहीच्या पानांमधुनी येशील का तू उतरूनी भूवर ।