अलास्का

'Mirror lake'... अलास्कामधल्या 'Mirror lake' च्या काठावर आम्ही उभे होतो. समोर आरस्पानी सरोवर... पाणी अगदी शांत आणि निश्चल! हलकासुद्धा तरंग नाही कुठे! वाऱ्याची झुळूक नाही. जणू समाधी लावून बसलेलं शांत सरोवर! पलीकडच्या काठावर एक मोठा डोंगर होता. मस्त हिरवागार झालेला! त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं होतं. अतिशय सुस्पष्ट, स्थिर.... किंचितही न डळमळलेलं.... डोंगराची चढत जाणारी तिरकी रेषा पाण्यात उतरती झाली होती इतकंच.. पण ती ही खऱ्या डोंगराच्या चढणी एवढीच सुरेखित... आकाशातल्या कृष्णधवल मेघांचे रंग तसेच्या तसे उमटले होते. त्यामागे व्यापून राहिलेली निळाई... ती ही उतरली होती पाण्यात! जणू एक आकाश खऱ्या आकाशात आणि दुसरं जमिनीवर उतरून आलेलं असावं.... काठावरची टुमदार कौलारू घरं, दाट झाडांची ओळ.... सारं काही उलटं दिसत होतं; पण असं काही तंतोतंत प्रतिबिंबित झालं होतं की जणू एखादा खूप मोठा आरसा जमिनीवर लांबपर्यंत पसरून ठेवलाय आणि त्यात अवघ्या सृष्टीची प्रतिमा उमटलीय... पाण्याचं अस्तित्व नव्हतंच जणू तिथे! 

बाजूलाच खरं तर एक मोठा रहदारीचा रस्ता होता. तिथली गर्दी, वाहनांचे आवाज ह्या कशाचंच त्या आरशाला आणि त्यात डोकावून पाहणाऱ्या सृष्टीला जराही सोयरसुतक नव्हतं... निःसीम शांततेचा अनुभव घेत नि तीच शांतता आणि प्रसन्नता सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला देत, ते सरोवर निवांत पहुडलं होतं.... 

बराच वेळ उभे होतो काठावर... दोघंही तेच अनुभवत होतो. नेहमी माझी इतकी बडबड चालू असते... पण त्या क्षणी निःशब्द होते. आणि एरवी शांत असणारा माझा नवरा... तो उत्स्फूर्तपणे बोलून गेला,"मनही जर इतकं शांत, अविचल झालं, तर स्वतःचं आणि सगळ्या विश्वाचं प्रतिबिंब उमटेल." 

'Mirror lake' च्या काठावरून पाय निघत नव्हता. ह्याहून रम्य काही असूच शकत नाही, असं वाटत होतं... पण निघणं भाग होतं कारण पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचं होतं.

पुन्हा एकदा गर्दीनं गजबजलेल्या रस्त्याला लागलो. मोठ्याला, उंच इमारती भराभर मागे पडायला लागल्या. माणसाच्या तथाकथित प्रगत झालेल्या जीवनाच्या सगळ्या खुणा जाणवायला लागल्या... काही वेळापूर्वीचा तळ्याकाठचा तो अनुभव... स्वतःला स्वतःशी जोडणारा... आणि आताचा हा शहरी कोलाहल... आपणच निर्माण केलेल्या तणावांची जाणीव करून देणारा... सुट्टी संपली की ह्या सगळ्यातच आपल्याला परत जायचं आहे, ह्याची नकोशी आठवण झालीच!

काही वेळ गेला असेल आणि रस्ता जरा अरुंद झाला. एक मोठ्ठं वळण लागलं आणि त्यानंतर समोर दूरवर पसरलेला मोठा जलाशय दिसला. वळणानंतर इतक्या अनपेक्षितपणे ते दृश्य सामोरं आलं, की मी अवाक होवून बघत राहिले.. सूर्यास्त झाला होता.. आभाळ भरून आलं होतं... करडे नि पांढरे कितीतरी ढग एकमेकांत गुंतून लांबवर पसरलेले होते. त्यांच्या प्रतिबिंबांमुळे पाणी झाकोळून गेलं होतं. सगळ्या वातावरणाला एक करडी झाक होती... समोरच्या डोंगरांवर धुक्याची लाट उतरली होती. अक्षरशः नजर खिळवून ठेवणारं दृश्य होतं! संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळल्यानंतर अंधार पडेपर्यंतचा तो थोडा अवधी... त्या वेळचा उजेड कधी संपूच नये, असं वाटलं.... आणि "turn again arm" च्या काठावरून नजाकतीनं वळणं घेत जाणारा तो रस्ताही... 

अवघ्या तास, दोन तासांपूर्वी Mirror Lake पाशी डोळ्यांचं पारणं फिटलं, असं काहीतरी वाटून गेलं होतं, आणि हा अनुभव तर त्याहूनही उत्कट होता. अगदी अनपेक्षितपणे मिळाला होता, म्हणून मी पार हरखून गेले होते! खरं तर, दिवसभर भटकल्यामुळे दोघंही दमलो होतो, झोपही येत होती, पण डोळे बंद करून झोपेच्या स्वाधीन होणं, म्हणजे त्या क्षणांना मुकण्यासारखं होतं... ते जमलं नाही! जे दिसत होतं, ते डोळे फाडून बघत राहिले. जे बघत होते, ते शब्दांत बांधण्याचा मनाशीच प्रयत्न करत राहिले. पण ते ही जमलं नाही... थोड्या वेळात अंधार पडला की त्या दृश्याची साथ संपणार, अशी हुरहूर वाटायला लागली... 

            स्तिमित करून टाकणारा असा निसर्ग इतका अनुभवला त्या पाच, सहा दिवसांत.... जिथे नजर जात होती, तिथे काहीतरी सुंदरच बघायला मिळत होतं... कुठे नाजूक फुलांचे गुलाबी घोस, कुठे दूरवर पसरलेल्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, कुठे उंच, निमुळत्या, उतरत्या पानांच्या झाडांचं हिरवं रान, कुठे डोंगरांमधल्या उतारावरून संथ वाहत येणारी, गोठलेली शुभ्र हिमनदी... नितांतसुंदर निसर्गसौंदर्य नुसतं सगळ्या दिशांना! झाडं, पानं, फुलं, नद्या, डोंगर ह्यांची अशी सुंदर मांडणी की जणू तो विधाता विचारत असावा,"बघायचंय रूप? बघायचाय थाट आणि सृष्टीचं सौंदर्य? घ्या.. किती पाहिजे तितकं..!" किती वेचणार आपण? काय काय साठवणार डोळ्यांत? काय काय जपणार आठवणींमध्ये? आपलं खुजेपण जाणवतं राहतं... निसर्ग देत राहतो. आपण उगीचच कसले कसले अभिमान बाळगून जगत असतो. 

हिमनदी(Glacier) इतकी अप्रतिम दिसू शकते, ह्याचा पहिल्यांदा अनुभव घेतला. पूर्वी भूगोलाच्या पुस्तकात चित्र पाहिलेलं होतं. हिमनदी कुठे, कशी तयार होते, वगैरे वाचलं होतं. पण तिच्यातला तो पांढराशुभ्र बर्फ, मधूनच परावर्तित होणारा निळसर प्रकाश... कधी उन्हातलं चमकणं, कधी धुक्यातलं हरवणं..... त्या हिमनद्यांचं सौंदर्य इतकं भरभरून पाहायला मिळालं! मोठ्या बोटीतून फेरी मारून आलो. दोन्ही बाजूंना कितीतरी हिमनद्या. एकदा तर हेलिकॉप्टरमधून चक्क glacier landing केलं! थेट हिमनदीतच उतरलो. साडेसात हजार फुटांवर... हेलिकॉप्टरनं अगदी अलगद उतरवलं. समोर सगळीकडे नुसता पांढरा समुद्र... स्वच्छ आणि शुद्ध... बाजूलाच काही अंतरावर तंबू दिसले, वरपर्यंत चढाई करत आलेल्या गिर्यारोहकांचे.. मला काही वेळ अपराध्यासारखं वाटत राहिलं उगीचच... हेलिकॉप्टरमधून येऊन प्रदूषणाला हातभार लावल्यामुळे... पूर्वी एकदा आम्हीही गेलो होतो असेच glacier पर्यंत चढत... हिमाचलमधल्या ‘मणिमहेश’ला. आधी कितीतरी दिवसांपासून तयारी केली होती. मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता. पहाटे उठून चढायला सुरुवात केली होती नि माध्यान्हीला पोचलो होतो glacier वर. शेवटच्या चढणावर जाम वाट लागली होती. एकमेकांना बळ देत पोहोचलो एकदाचे. हवेनंही चांगली साथ दिली होती. पाऊस, वादळ वगैरे न आल्यामुळेच शक्य झालं होतं. एवढे दिवस ज्यासाठी तयारी केली, मनापासून कष्ट घेतले, ते शिखर गाठलं होतं! त्याचाच आनंद केवढा होता... त्या आनंदात हिमनदीचं सौंदर्य पाहायचं राहूनच गेलं होतं बहुतेक.. कारण आठवणी होत्या त्या चढाईच्या, तिथल्या निसर्गाच्या नव्हत्याच! ह्यावेळी मात्र जे बघायला मिळालं ते अप्रतिम होतं! पर्वतांच्याच उंचीवरून उडण्याचा आनंद नवीन होता. 

मग पुन्हा एकदा, दूर समोरच्या डोंगरामध्ये अशीच एक सुंदर हिमनदी बघायला मिळाली. कयाकींगला गेलो होतो. कयाकीत आम्ही दोघंच... ठरवून एका लयीत वल्ही मारत होतो. बरोबर समन्वय साधला जात होता. कयाक सपासप पुढे पळत होती. पाण्यावरची ती गार हवा.. भोवताली दिसणारं दृश्य.. ती लय... तो वेग... ती साथ... झिंग चढली होती! बरंच अंतर कापून गेलो असू.. एका छोट्या टेकाडाच्या पायथ्याशी कयाक थांबवली. वाटाड्या सोबत होता. तो त्या टेकाडावर वरपर्यंत जाणार होता. आम्हीही निघालो. झाडाझुडपांतून, काट्यावेलींतून हळुवार चढत जाणारी वाट होती. शेजारी झऱ्याची साथ होती. दगडगोट्यांवरून खळाळत पाणी वाहत होतं, वाऱ्यावर तुषार उडत होते, सोबतीला दोन, तीन पक्ष्यांचा किलबिलाट.... अगदी निर्भेळ असा निसर्गाचा अनुभव... बाजूच्या वेलींवरच्या नाजूक हिरव्या पानांचा तजेला आपसूकच मग मनात भिनत गेला...    

दर दिवशी असं नवीन काहीतरी मिळत होतं. आत्ताचा अनुभव सुंदर की ह्या आधीचा? तुलना करण्यात तसा काही अर्थ नव्हताच. बोटीमध्ये उभी होते तेव्हा समोरच्या काचेच्या खिडकीतून पाण्यातला प्रकाशाचा नाच बघायला मिळाला... हिमनदीच्या पायथ्याशी बोट थांबली होती. सूर्य माथ्यावर होता. लखलखीत ऊन होतं. बर्फावरून परावर्तित झालेली असंख्य किरणं पाण्यावर पडत होती. पाणी नुसतं चमचमत होतं. शेकडो पेटत्या फुलबाज्यांचे असंख्य प्रकाशकण पाण्यातून उडत आहेत, असं वाटत होतं. संमोहित झाले होते. चमकणाऱ्या त्या पाण्याकडे एकटक बघत राहिले. क्षणभर सारं काही थांबल्यासारखं वाटलं. वेळ, विचार, भावना, जाणीवा, सगळंच.... 

हाच निसर्गातला आनंद असतो बहुतेक.. सगळ्या विचारांना, ताणतणावांना क्षणार्धात विसरून जाण्याचा... अशा वातावरणांत एक प्रसन्न शांतता मिळाल्यासारखी वाटते. रोजच्या त्याच त्या, कधी कधी जेरीला आणणाऱ्या चक्रात फिरून जड झालेलं डोकं अचानक हलकं, रिकामं झाल्यासारखं वाटतं. कशामुळे होत असेल असं? निसर्गात एक raw appeal असतं म्हणून? की ताण हा बऱ्याच वेळा आपण माणसांनीच निर्माण केलेल्या गोष्टींमुळे असतो म्हणून? का, कशामुळे हा भाग वेगळा... ती कारणमीमांसा नाही केली तरी निसर्गातल्या अशा अनुभवांतून मिळणारं समाधान, चैतन्य कमी होत नाही!   

जीवनगंधा