अजून फक्त पाच मिंटं

अजून फक्त पाच मिंटं, मला झोपू दे
झोपेचे सुख, अजून जरासे, मनात साठवू दे 
स्वप्नामध्ये भिरभिरणारे, मुक्त मुग्ध हे मन,
स्थळ-काळ वेळाचे सारे, तोडूनी  बंधन,
कशाचेही कुणाशीही, जोडत असते नाते,
एकामधून दुसऱ्यामध्ये, रमत गमत हे जाते.
शेवटचे एक, स्वप्न अपुरे, पूर्ते करू दे !
काय होते स्वप्न ते, जरा आठवू दे ! .... अजून फक्त पाच मिंटं ... 
सुरू आहे, पांघरुणाखाली, काहीसे चिंतन,
चार विचार डोक्यात घेउनी, करू दे जरा मंथन.
विचारांचा जाणीवांशी, बसतो आहे मेळ
आयुष्याचे मर्म गवसण्या, हीच आहे वेळ
सुखी अशा, जीवनाचा आज, मार्ग सापडू दे !
सारेच प्रश्न, एकदाचे का, सोडवून  टाकू दे ! .... अजून फक्त पाच मिंटं ...
तेच हे, तेच ते, बदलत नाही काही 
घड्याळाचा काटा मात्र, फिरतच  राही 
रियालिटी शो, आयुष्याचा, सुरू झालाय खरा 
चॅनेल हा, लावतो मी, थोड्या वेळाने जरा 
हा रहाटगाडा ओढायचे बळ एकवटू दे   
पुन्हा नव्याने माझ्यासाठी सकाळ उजाडू दे  .... अजून फक्त पाच मिंटं .