आपण रांगेत आहात, कृपया प्रतीक्षा करा

"लिमिटेड ऑफर... लिमिटेड ऑफर... " ह्या कर्कश आरोळीमुळे माझ्यासारखेच माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या मनातले भाव मला त्यांच्या त्रासिक चेहऱ्यावर लगेच टिपता आले...! कपाळावरच्या आठ्या उलगडवताना एकच गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती ती म्हणजे ह्या रंगीत भिंती, स्वच्छ पुसलेल्या टाइल्स, मंद एअर फ्रेशनर आणि सोबतीला एअरकंडीशनर च्या थंडगार वातावरणाचा फरक सोडल्यास आजकालच्या मॉल मध्ये आणि मंडई किंवा मार्केटयार्ड मध्ये  बहुतेक सारेच साम्य आहे.

लहानपणापासून स्वस्त आणि मस्त गोष्टी हव्या असतील तर मंडई/मार्केटयार्ड किंवा मग रविवारात... हे समीकरणं पक्कं मनात बसलं होतं... हळू हळू जनरेशन बदलत गेली... आणि आम्ही मोठे होईपर्यंत आमच्या डोक्यातल्या मंडईची जागा स्पेन्सर्स/मोअर अश्या मॉल्सने घेतली, रविवाराची जागा बिग-बझार आणि डीमार्ट नामक कंपन्यांनी आधीच बळकावलेली होती,  आणि ह्या सर्व उपलब्ध पर्यायांमध्ये भर पडली ते रिलायंस, वॉलमार्ट असल्या मोठ्या उद्योगांच्या उडी मुळे...!!

स्वतःहून मॉल ची पायरी कधी चढलो मला नक्की आठवत नाही की.. परंतु त्या भव्य दिव्य इमारतीत घुसण्याची हिंमत होण्यासाठी खिशात किमान १००० रुपये तरी असले पाहिजेत असं तो लवाजमा पाहिल्यावर खूपं आधीपासून वाटत होत... कॉलेजमध्ये गेल्यावर त्यातल्या त्यात उच्चभ्रू मित्र-मंडळींनी आम्हाला एकदा सोबत येण्याचे आमंत्रण दिले होते आणि आम्ही ती संधी साधली....

मित्रांसोबत फिरताना जाणवले की ह्या एका इमारतीतच सगळे काही असते, पाश्चात्त्य संस्कृतीचा चांगला भाग घ्यावा, त्यातले हे सुपरमार्केट असे मित्रांनी ज्ञानवर्धन केले..  आणि खरंच की - खालच्या मजल्यावर सगळे खाद्यपदार्थ, पहिल्या मजल्यावर कपडे, दुसऱ्या मजल्यावर गृहोपयोगी वस्तू, आणि तिसऱ्या मजल्यावर  गिफ्ट आर्टिकल्स आणि बाकी बरेच काही...

गेल्या ४-५ वर्षांत 'मॉल' संस्कृतीत खूपच मोठा बदल घडून आला आहे... आधी मॉल मध्ये मदतीला लोक पुढे येऊन सहकार्य करायचे, मग हळू हळू -- "तुम्ही तुमचे पहा... आवडेल ते घ्या... जेवढे दिसते तेवढेच असते!  तुम्ही सुज्ञ आहात आणि आम्ही बिझी आहोत" -- अश्या वागणुकीतून लोकं आपापली खरेदी करताना दिसू लागले,   अजून काही दिवस गेले आणि पुन्हा जुने दिवस आले पण, थोड्याश्या फरकाने... आता मॉल अटेंडंट फ्री असायचे पण ते एकत्र टोळक्याने गप्पा मारत असायचे... "तुम्हाला काही अडलं तर विचारा, सांगतो... " ही मुजोरी आजकाल तर सर्वोच्च पातळीवर गेली आहे, - आजकाल हे सगळं तर चालूच आहे पण जोडीला मार्केटिंगचे प्रभावी हत्यार जोरदार उगारले जाते.

तुम्हाला अमुक पाहिजे ना? आमच्याकडून घ्या... आम्ही तमुक फ्री देतो! आमच्या मॉल ची वैशिष्ट्ये म्हणजे, आम्ही सगळी कार्डस स्वीकारतो - संपूर्ण इमारत एअरकंडिशनड - लिफ्ट - एक्सचेंज ऑफर - १० बिल काउंटर्स - वगैरे वगैरे....

आजकाल तर काही काही मॉल मध्ये लक्ष्मीरोडवर पथारीवाले बसून ओरडतात तसेच पण युनिफॉर्मवाले अटेंडंट इथे हातात माइक, गळ्यात कर्णा बांधून जोरजोरात ओरडतात... कधी रिन-सर्फ-टाईड विकतात, तर कधी बासमती तांदूळ, तेल, आटा'ची घोषणा करतात..

इथली अजून एक मजा म्हणजे ह्या ऑफर्स इतक्या आकर्षक वेष्टनात असतात की आपण एक घ्यायला जातो आणि ४ घेऊन परत येतो... अख्खी इमारत फिरणे आणि मग आपल्याला हवे ते घेणे, जे नको पण कधीतरी लागू शकेल आणि स्वस्त आहे म्हणून घेऊन ठेवणे.. आणि जे लगेच नाही पण पुढच्या आठवड्यात लागणारच आहे, मग ऑफर नसेल त्यामुळे आत्ताच घ्यावे असे सर्वसाधारण लोकांचे ताळेबंद चालतात!

आता ह्या असल्या आमिषांना आम्ही बळी पडतो खरे,   नेहमीच चांगल्या ऑफर असतात असे नाही, पण कधीतरी एखादी 'डिल' चांगली मिळूनही जाते... परंतु सर्वात कंटाळवाणा भाग म्हणजे बिलींग काउंटर वर आपले बिल होईपर्यंत १० लोकांच्या मागे रांगेत उभे राहणे...!!  

आपण कोणाला फोन केला आणि तो दुसऱ्या कॉल वर बिझी असेल तर - "आपण रांगेत आहात, कृपया प्रतीक्षा करा"  अशी टेप यायची -तसलाच फील येतो.. म्हणजे ह्या मॉल मध्ये खरेदी करायला २ तास आणि बिलिंग साठी १. ५ तास अश्या हिशोबानेच येथे जावे :)

सार्वजनिक टॉयलेट्स, दवाखान्यातला आपला येणारा नंबर, पाण्याच्या टँकरची लाइन ,   ATM Transaction आणि कोणतीही बिले भरतानाच्या वेळी कायम  मनात येणारा प्रश्न "आपल्या पुढचा माणूस एवढा काय वेळ खातोय? " ह्या वेळी देखील अंतर्मनातून बाहेर डोकावतोच...!!

तुम्ही कितीही प्रेमाने वागलात, आणि हसून पुढे आलात तरीही बिलिंग काउंटरवरचा माणूस मख्ख चेहऱ्याने तुमच्याकडे पाहत राहतो... बिलं चे पैसे सांगून, - " २, ५ रु. सुट्टे असतील तर बघा, कॅरीबॅग पायजे का? -२ रु एक्ष्ट्रा पडतील" हि स्टॅंडर्ड पाठ केलेली ओळ म्हणतो... आणि उरलेल्या सुट्ट्या पैशांच्या ऐवजी एक्लेअर्स, मेलोडी अशी चॉकलेट्स आपल्या हातावर ठेवते.... कहर म्हणजे आपण ती चॉकलेट्स स्वीकारली आहेत का नाही ह्याची दखलही न घेता तो तुम्हाला दुर्लक्षित समाजाच्या यादीत टाकून पुन्हा त्याच वैतागाने समोरच्या भाऊगर्दीला हाळी देतो... "सामान वर काढून ठेवा... मेंबरशिप कार्ड असलं तर आधी सांगा... इ. इ.

हे असे सगळे अनुभव घेऊन रांगत रांगत का होईना आणि अखेरीस त्या 'रांगेतून आपण बाहेर पडतो'..... हातातले वजन वाढवून आणि पाकिटाचे कमी करून!!

शाळा संपली, कॉलेज संपलं, नोकरी चालू झाली... पण रांग काही सुटत नाही  !! -- इथे वपुंच्या 'एकबोटेंची पोरं/बदली' गोष्टीतल्या वाक्याचा प्रत्यय आला... " गाव बदललं तरी नशीब बदलतं नाही "!! आणि ह्याबरोबरच  बिलाचा आकडा, बदलती परिस्थिती, आणि एकंदरीत सगळीकडचे बदलते वातावरण पाहून चंद्रशेखर गोखल्यांची चारोळी एकदम अंतर्मुख करते -->

घर शोधताना गाव हरवावं
तसं झालंय माझं
मी अधांतरी, आणि माझ्यावर
या अंतराळाचं ओझं....

--

आशुतोष दीक्षित.