अनिर्णयाचा द्वारपाल

अनिर्णयाचा द्वारपाल काल मला भेटला होता
अनिर्णयाचं चक्र फिरत होतं त्याच्या डोक्यावर

म्हणाला,
वाटलंच मला तू येशील इथवर
तुझ्यासारख्या माणसाचं प्राक्तन आणतंच त्याला
असो
आता आलाच आहेस
तर बस घटकाभर
इथून पुढे जाण्याआधी दोन क्षण विश्रांती घेतलेली बरी
बरंच ऐकलं असशील,
पलीकडच्या जगाबद्दल
अलीकडच्या जगातील माणसांकडून
जी कधी या दारापर्यंतसुद्धा पोचली नाहीत

अरे, असा बावचळू नकोस
सगळंच काही खोटं नसेल ते म्हणाले त्यातलं
आणि काही जण गेलेत ना पलीकडे
त्यांना सोडतेवेळीस
पाहिलंय मी डोकावून
किलकिल्या दारातनं
डावीकडचं आणि उजवीकडचंसुद्धा
आणि एक सांगू का ?
नाही, तू विचारलं नाहीयेस
पण सांगतो
अलीकडच्या जगातील शब्दांच्या खेळावर
विश्वास ठेवू नकोस हं
त्याहून फार पलीकडे आहे पलीकडचं जग

पण काय रे ?
ठरलंय ना तुझं ? 
डावं की उजवं ते ?

 मी हसलो फक्त क्षीणपणे

म्हणजे तुझंही त्याच्याचसारखं की काय?
हत्ती मेला का माणूस या प्रश्नापायी
आयुष्य होरपळून घेणाऱ्या त्या राजासारखं


द्वारपाला, तू पाहिली आहेस ना पण दोन्ही जगं
तूच का नाही दाखवत योग्य दार मला ?
थकलोय रे मी इथवर चालून

वा वा ! मीच सांगू म्हणतोस हे रहस्य ?
अनिर्णयाच्या द्वारपालास विचारतोस तुझ्या आयुष्याच्या निर्णयाबद्दल ?

एकदम गगनभेदी हसला तो
अन् क्षणार्धात
अग्निच्या ज्वाळांनी भस्म होऊन गेलं त्याचं शरीर
एक अनामिक कळ उठली
माझ्या मस्तकातून
अनिर्णयाचं दातेरी चक्र स्थिरावलं होतं
माझ्या मस्तकावर

मीच झालो होतो
अनिर्णयाचा द्वारपाल