काचविरहित चष्मा

   
          चष्मा हा शब्द मराठी भाषेत कसा घुसला कळत नाही,कारण मूळ फारसी वा उर्दू भाषेतही या शब्दाचा अर्थ उपनेत्र हा नसून नजर असा आहे.  चष्मेबद्दूरचा अर्थ वाईट नजर दूर राहो असा आहे. आणि त्या भाषेत चष्माला शब्द आहे ऐनक.  मराठीत पूर्वी वापरात असलेला आरशी वा चाळशी  बाद करून आपण हा चुकीचा शब्द स्वीकारला.चाळिशीमागे  वय झाल्याची जाणीव अध्याहृत असल्यामुळे तो नाकारला गेला हे समजू शकते पण उपनेत्र हा शब्द तर कितीतरी कर्णमधुर आहे तरीही हा उच्चारायलाही फार सुलभ नसलेला धेडगुजरी शब्द आपण रूढ केला.व तोच फार प्रचारात असल्यामुळे वापरणे भाग आहे. 
        आपल्याला चांगले दिसावे म्हणजे दृष्टिदोष दूर व्हावा म्हणून आमच्यासारखे लोक चष्मा लावतात पण हॉंगकॉंग मध्ये मात्र इतरांच्या दृष्टीला  आपले रूप आपण चांगले दिसावे म्हणून  चष्मे लावण्याची फॅशन चालू झाली आहे . लहानपणी वडिलांचा चष्मा घालण्याची खूपच हौस मलाही होती. त्यांची चाळिशी लावून चालू लागलो की आपण मोठे झाल्याचा भास व्हायचा( आता मात्र मोठे झाल्याची खंत वाटते). चालताना काचेतून पाहिल्यावर जमीन उतरती दिसायची व घसरतो की काय अशी भीती वाटायची तरी त्यातही मजा वाटायची.  पण तशी मजा या तरुण तरुणींना वाटत आहे म्हणून ते चष्मे वापरतात अशातला भाग नाही. कारण ते जे चष्मे घालतात  त्यांना  काचाच नसतात  काचांशिवाय नुसत्या चौकटीच डोळ्यावर अडकवून ते चालतात. आपल्या व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी ते असे काचविहीन चष्मे वापरतात म्हणे. अगदी ज्यांना दृष्टिदोष आहे तेही स्पर्शभिंगे बसवून वरून ही असली चष्म्याची चौकट वापरतात. त्यामुळे आपण अधिक रुबाबदार किंवा सुंदर दिसतो असे काहींना वाटते.
        काहीचा आपण चष्मा लावल्यावर आपण असलेल्या वयाहून लहान दिसतो असा समज असतो तर  काहींना आपण अगदीच पोरकट दिसतो आणि  चष्मा लावल्यास जरा प्रौढ वाटू अशी कल्पना चष्मा लावण्यामागे असते.  त्यामुळे अशा अनेक चौकटी ते जवळ बाळगतात व गरजेनुसार किंवा आपल्या वेषभूषेस शोभून दिसेल अशी चौकट परिधान करतात थोडक्यात चष्म्याची काचविरहित चौकट हा त्यांच्या वेषभूषेचा एक भागच बनली आहे.
           चू फून ही ३२ वर्षाची तरुणी हाँगकाँग रेडिओवर सकाळी निवेदिका म्हणून काम करते तिच्या मते आपल्या डोळ्याभोवती निर्माण झालेली काळी वर्तुळे त्यामुळे झाकली जातात.पण मग नुसती चौकट वापरण्या ऐवजी साध्या काचेचा चष्मा ते का वापरत नाहीत ? एक कारण म्हणजे नुसत्या  चौकटीचे वजन खूप कमी असते त्यामुळे काचेच्या चष्म्यापेक्षा हा चष्मा हलका असते. आणि दुसरे कारण धुक्यात , पावसात , बाष्पयुक्त वातावरणात काचेवर पाणी जमा होऊन समोरचे कमी दिसू लागण्याचीही शक्यता असते.एका तरुणाच्या मते काचेमध्ये आपले प्रतिबिंब दिसलेले त्याच्याकडे येणाऱ्या  काही मुलींना आवडत नाही त्यामुळे तो नुसती चौकट वापरणे पसंत करतो.. १९९० मध्ये जपानमध्ये ही फॅशन आली आणि ती संपुष्टात आली. आता ती हाँगकाँगमध्ये मूळ धरत आहे. या लाटेमुळे  ऍंडी युंग चा खिसा मात्र फुगत चालला आहे. कारण हाँगकोंग मधील एका बोळकंडीतील जार्डीन बाजारातील हा विक्रेता एका चौकटीला चार पासून  सात डॉलरपर्यंत  किंमत लावून अशा  वीस फ्रेम्स   दररोज  विकतो . त्याची खरेदीची किंमत असते  फक्त अडीच  डॉलर्स. मी आपला वाहत्या गंगेत हात धुवून घेतोय असे तो म्हणतो कारण त्याला माहीत आहे ही लाट  काही फार दिवस टिकणार नाही. आपल्याकडे ती आली आहे का ? कोण जाणे.
        आता गूगलने एक नवीन चष्मा बाजारात आणण्याचा घाट घातला आहे. हाही काचरहित आहे.दोनतीन दिवसापूर्वीच त्यांनी आपले हे गुपित उघड केले आहे. हा चष्मा म्हणजे डोळ्यावर चढवता येण्यासारखे  पारदर्शक पटल असणार आहे. दिसायला ते चष्म्यासारखे असले तरी प्रत्यक्षात त्यात काचा नसणार तर तो संगणकाचाच अवतार असणार म्हणजे डोळ्यावरील हा पटल संगणकाचे काम करणार. तो घालणाऱ्या व्यक्तीला त्यावर भूपृष्ठावरील मार्ग किंवा जागा यांचे नकाशे पाहता येणार किंवा आंतरजालासारखीच इतर माहितीही उपलब्ध होणार.त्यावर ध्वनि नियंत्रणही असणार व त्यावरून हे चष्मा वापरणारा संदेश घेऊ वा पाठवू शकेल.थोडक्यात चष्मा वापरणारी  व्यक्ती संगणकच डोळ्यावर चढवणार असे दिसते.डोळ्यांवर हे मायापटल असले तरी त्यामुळे सत्य जगताचा विसर मात्र तो घालणाऱ्या व्यक्तीस पडणार नाही असा अनुभव हा चष्मा प्रत्यक्ष वापरणाऱ्यांनी व्यक्त केला आहे.एक तरुण तर या संशोधनावर फारच खूष आहे. तो म्हणतो एकादी गोष्ट ( की तरुणी ) दिसली आणि तिचे छायाचित्र खेचण्याची मला लहर आली तर उगीच कॅमेरा काढा उघडा तो योग्य अंतरावर व कोनात स्थिर करा इतकी सगळी कटकट यामुळे वाचणार कारण मनात आले की त्या चष्म्याच्या वर असलेले एक बटण दाबले की बस्स निघाला फोटो शिवाय हे गुपित माझ्यापुरतेच राहील हे वेगळेच.
        गूगलचे स्पर्धक ऍपल यांनीही असाच संगणक बाजारात आणण्याची तयारी केली आहेच हे उघडच आहे.पाहूया आपल्याकडे पण असे चष्मे केव्हा मिळायला लागतात ते !