चैत्राची पालवी

वितळलेले ओठ एकीच्या क्षणी
वेग वेगळा धूर वेग वेगळ्याच चुलीत
गाडलेलं आभाळ अंगणाच्या कोपऱ्यात
उन्ह शोधत गारवा नाल्याच्या काठी

ग्रीष्माचा काळ ह्याच्या त्याच्या पोटात
नांगरलेलं काळीज आषाढाच्या आशेवर
रडणार मूल तहानेच्या पोटी
कोरडे खाट डोळे मधोमध काळीच्या

मातीचाच रगडा मातीच्याच पायाखाली
उगवतीचा सूर्य मावळतीच्या पलीकडे
वाजणारा पावा लांब डोंगराच्या कुशीत
नदीकाठच्या बाभळीवर चैत्राची पालवी