इंडियन आयडॉल...

इंडियन आयडॉल...
आमचा आबा,
आयुष्याच्या रिएलिटी शो मध्ये आला
तेव्हा कुणीच घेतली नव्हती त्याची दखल.
त्याच्या कणखर बाण्याला
दिली नव्हती कुणीही खच्चून दाद…
त्याच्या लढाऊपणाचं कधी
तसं नव्हतंच कुणालाही कौतुक,
आणि  त्याच्या असण्याबद्दलही
झाले नाहीत कधीच कु्ठले वाद…

वांझोटी जमीन, पावसाच्या कळा,
बबडीचं लगीन आन बारक्याची शाळा,
म्हातारीचा दमा, लाईटीच्या येळा…
सुकलेली विहिर आन कर्जाच्या झळा..
नियतीच्या कसोट्यांवर
तो झुंजतच राहीला आरपार.
पडत राहीला, उठत राहीला
पण लढत राहीला झेलत मार.
आपल्या जखमांचं भांडवल करून
कधी बघ्यांच्या पायाशी रडला नाही…
दुष्काळाच्या एपिसोडला त्यानं राहावं तगून
म्हणून एस एम एस चा कृपाळू पाऊस
त्याच्यासाठी कधीच पडला नाही.
त्याची लाडाची बैलजोडी,
दावणीची सावळी गायवासरं…
सोनंनाणं आन घरदारामागं
एकेक करून सारी वावरं,
अशा सगळ्या लाईफलाईनी संपल्यावर
हळहळलं नाही बघणारं कुणी…
आणि पारावर फास घेऊन
या शो मधून एलिमिनेट होताना,
आलं नव्हतं अगदी टिपू्सभरही
कुठल्या महागुरूंच्या डोळ्याला पाणी…

~
तुम्हाला म्हणून सांगतो…
तो चमचमत्या कपड्यातला तरूण,
जरी होर्डिंगवर बेगडी हसत उभा होता.
वास्तवाच्या या वाहिनीवरचा
खरा आयडॉल आमचा आबा होता…