"मलाही व्हायचंय अजरामर"
तो सांगत होता
स्वत: असून उत्तुंग
आपल्याला खुजा समजत होता
त्याच्या डोळ्यांतले अश्रू
पडताक्षणी वाफ होत होते
वैफल्याने भावना
पेटून राख होत होत्या
"त्यांच्याकडे जो जातो
उगाळून आणतो गंध
जो मजजवळ येऊ पाहे
होऊन जातो अंध
फुकटचे श्रेय घेतो मी
म्हणे शक्तीचा सागर
मी तर केवळ प्रलयंकर
त्यांचं तेज शीतल
माझी आग भयंकर
जाउद्या मलाही पृथ्वीवर
बनूद्या मलाही
दीपस्तंभ, दयासागर, करुणाकर
दु:खाचा शब्द-ईश्वर
ग्रेस, कुसुमाग्रज, सुर्वे, किंवा माडगुळकर"
इंद्रासमोर उभा राहून सूर्य बोलत होता
पृथ्वीवरील कवीशी आपली तुलना करत होता
त्याच्या डोळ्यांतले अश्रू
पडताक्षणी वाफ होत होते
मनातले वैफल्य साफ दिसत होते